‘LIC’ Unclaimed Funds :‘एल्.आय.सी.’कडे ८८१ कोटी रुपयांचा निधी दावा न केल्याने पडून !

मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात् एल्.आय.सी.कडे वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ८८० कोटी ९३ सहस्र रुपयांची रक्कम पडून आहे. मुदत ठेवीचा (फिक्स्ड डिपॉझिटचा) कालावधी पूर्ण होऊनही त्यावर कुणी दावा न केल्यामुळे ही रक्कम खात्यात पडून असल्याचे सांगण्यात आले.

सरकारी माहितीनुसार एकूण ३ लाख ७२ सहस्र विमा पॉलिसीधारकांनी त्यांच्या ‘मॅच्युरिटी बेनिफिट’चा लाभ घेतलेला नाही. म्हणजेच ३ वर्षांच्या मुदतीनंतरही या पॉलिसींच्या निधीवर कुणीही दावा केलेला नाही. नियमानुसार ज्या ‘पॉलिसींच्या मॅच्युरिटी’ रकमेचा दावा कुणीही केलेला नाही, ती रकम ‘दावा न केलेल्या’ (अनक्लेम्ड्) खात्यात जमा केली जाते. १० वर्षे या रकमेवर कोणताही दावा न केल्यास ती ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये समाविष्ट केली जाते.