Delhi University Professor Ratan Lal : प्राध्यापकाची गुन्हा रहित करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली !

ज्ञानवापीतील शिवलिंगावरून वर्ष २०२२ मध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे प्रकरण

रतन लाल

नवी देहली – वाराणसी येथे ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या देहली विश्‍वविद्यालयाच्या रतन लाल या प्राध्यापकाला पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्याच्या विरोधात खटला प्रविष्ट (दाखल) करण्यात आला. तो रहित करण्यास देहली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. रतन लाल यांच्या वक्तव्याचा सामाजिक सलोख्यावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे उच्च न्यायालयाने मान्य केले.

न्यायालयाने म्हटले आहे की, रतन लाल यांनी सादर केलेल्या युक्तीवादात तथ्य नव्हते ज्याच्या आधारे आरोपीविरुद्धचा गुन्हा रहित केला जाऊ शकतो. प्रथमदर्शनी असे दिसते की, प्राध्यापक रतन लाल यांचा हेतू केवळ एका धर्मियांच्या भावना दुखावण्याचा होता. प्राध्यापकपदावर असलेल्या व्यक्तीच्या या टिपण्या अशोभनीय आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

रतन लाल देहली विश्‍वविद्यालयातील इतिहास विभागाचे साहाय्यक प्राध्यापक आहेत. मे २०२२ मध्ये जेव्हा ज्ञानवापी प्रकरणात हिंदू शिवलिंग शोधण्याविषयी बोलत होते, तेव्हा रतन लाल यांनी त्याच्या एक्स आणि फेसबुक खात्यांवर एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. १४ मे २०२२ या दिवशी केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते, ‘जर हे शिवलिंग असेल, तर असे दिसते की कदाचित् भगवान शिवाचीही सुंता झाली होती.’ रतन लाल यांनी या पोस्टमध्ये एक हसणारे व्यंगचित्रही जोडले होते. यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले. आता त्यांनी गुन्हा रहित करण्याची मागणी केली होती जी फेटाळून लावण्यात आली.

संपादकीय भूमिका

२ वर्षांत या प्राध्यापकाला शिक्षा होणे अपेक्षित असतांना अजूनही तो गुन्हा रहित करण्याची मागणी करतो, हे न्यायव्यवस्थेसाठी चांगले लक्षण नाही !