Tripura CM On B’desh Electric Bill : बांगलादेशाला आणखी किती दिवस वीजपुरवठा चालू ठेवू, हे ठाऊक नाही !
बांगलादेशाकडून २०० कोटी रुपयांची थकबाकी येणे शेष
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाला आम्ही वीजपुरवठा करत असून त्याने सुमारे २०० कोटी रुपयांची थकबाकी दिलेली नाही. थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. आम्हाला आशा आहे की, तो थकबाकी भरेल जेणेकरून वीजपुरवठा खंडित होणार नाही, अशा शब्दांत त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी बांगलादेशाला चेतावणी दिली आहे. ‘बांगलादेशाने थकबाकी न भरल्यास आम्ही किती काळ वीजपुरवठा चालू ठेवू शकू, हे मला ठाऊक नाही’, असेही ते म्हणाले. ‘इलेक्ट्रिसिटी ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या माध्यमातून त्रिपुरा स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेड बांगलादेशाला ६० ते ७० मेगावॅट वीजपुरवठा करते. यासाठी बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डासमवेत करार करण्यात आला आहे. त्रिपुराने मार्च २०१६ पासून बांगलादेशाला वीजपुरवठा चालू केला.
मुख्यमंत्री साहा पुढे म्हणाले की, त्रिपुरामध्ये वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी अनेक यंत्रसामग्री बांगलादेशातून किंवा चितगाव बंदरातून आणण्यात आली होती. त्रिपुरा सरकारने करारानंतर देशात वीजपुरवठा प्रारंभ केला. ’
त्रिपुरा उत्तर, दक्षिण आणि पश्चिम दिशांकडून बांगलादेशाने वेढलेले आहे आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय सीमेची लांबी ८५६ किलोमीटर आहे, जी त्याच्या एकूण सीमेच्या ८४ टक्के आहे.
संपादकीय भूमिकाभारतात एखाद्या व्यक्तीने ३ मास विजेचे देयक भरले नाही, तर वीज आस्थापन तात्काळ त्याची जोडणी तोडते; मग सध्या हिंदूंवर अत्याचार करणार्या बांगलादेशाच्या संदर्भात भारत अशा प्रकारचे निर्णय घेण्यास का घाबरत आहे ? हे अनाकलनीय आहे ! |