Sharia Courts In UK : ब्रिटनमध्ये चालू आहेत ८५ शरीयत न्यायालये !
धर्मनिरपेक्ष संघटनांनी दुसरी धार्मिक न्यायव्यवस्था स्थापन करण्यावर व्यक्त केली चिंता
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये सध्या ८५ शरीयत न्यायालये कार्यरत आहेत. ब्रिटन पश्चिमेची इस्लामी राजधानी म्हणून उदयास येत असल्याचा दावा प्रसारमाध्यमांकडून करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये रहाणार्या मुसलमानांवर या शरीयत न्यायालयांचा मोठा प्रभाव आहे. न्यायालये विवाह, घटस्फोट आणि कौटुंबिक प्रकरणांवर त्यांचे निर्णय देतात. ‘नॅशनल सेक्युलर सोसायटी’ने न्यायव्यवस्थेला समांतर अशी दुसरी धार्मिक न्याय व्यवस्था स्थापन करण्यावर चिंता व्यक्त केली आहे.
ब्रिटनमध्ये वर्ष १९८२ मध्ये चालू झाली शरीयत न्यायालये
प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार ब्रिटनमध्ये वर्ष १९८२ मध्ये पहिल्यांदा शरीयत न्यायालय चालू करण्यात आले होते आणि आज त्यांची संख्या ८५ झाली आहे. ‘निकाह मुताह’ (आनंद विवाह) करण्याचा प्रकार ब्रिटनमध्येही झपाट्याने वाढत आहे. निकाह मुताह अंतर्गत, तात्पुरता विवाह ३ दिवस ते एक वर्ष टिकतो. ही महिलाविरोधी प्रथा मानली जाते.
ब्रिटनमध्ये एक लाख विवाहांची नोंदणी झाली नाही
शरीयत न्यायालये इस्लामी विद्वानांच्या समितीची बनलेली असतात. यात बहुतेक पुरुष असतात. ही एक अनौपचारिक संस्था आहे, जी धार्मिक गोष्टींमध्ये आणि निकाह, तलाक (घटस्फोट) आणि ‘खुला’ (पत्नीकडून पतीला तलाक देणे) यांच्या संदर्भात निर्णय देते. ब्रिटनमध्ये १ लाख विवाहांची नोंदणी नागरी अधिकार्यांकडे झालेली नाही. हे निकाह शरीयत न्यायालयांत झाल्याचे समजते.
भविष्यात गंभीर परिणाम होतील ! – नॅशनल सेक्युलर सोसायटी
नॅशनल सेक्युलर सोसायटी नावाच्या संस्थेने ‘भविष्यात याचे गंभीर परिणाम होतील’, असे म्हटले आहे. सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन इव्हान्स यांनी चेतावणी दिली आहे की, शरीयत न्यायालये सर्वांसाठी एक कायद्याचे तत्त्व अल्प करतात आणि महिला आणि मुले यांच्या हक्कांवर विपरित परिणाम करतात. अलीकडच्या काळात ब्रिटनमध्ये मुसलमानांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे, हे विशेष.
संपादकीय भूमिकालोकशाहीप्रधान धर्मनिरपेक्ष ब्रिटनमध्ये ही स्थिती आहे, तर भारतात काय असणार, हे लक्षात येते ! |