UAE Banned Visas For Pakistanis : आखाती देशांनी पाकिस्तानच्या नागरिकांवर घातली प्रवेशबंदी !

अमली पदार्थांची तस्करी, भीक मागणे, मानवी तस्करी करत असल्याने घातली बंदी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया आणि इतर अनेक आखाती देश यांनी पाकिस्तानच्या लोकांना व्हिसा (एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारा अधिकृत कागद किंवा शिक्का.) देण्यास स्पष्टपणे नकार देऊन त्यांच्यावर अनिश्‍चित काळासाठी बंदी घातली आहे. आखाती देश आणि त्यातील प्रमुख शहरे ही लाखो पाकिस्तानी प्रवासी आणि नोकरी शोधणार्‍यांची आवडती ठिकाणे आहेत. प्रवासबंदी आणि व्हिसा अर्ज नाकारणे यांसारख्या वाढत्या घटनांमुळे पाकिस्तानची प्रतिमा मलिन झाली आहे. याखेरीज अमिरातने पाकिस्तानमधील व्हिसा अर्जदारांना पोलिसांनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणेही बंधनकारक केले आहे.

पाकिस्तानी लोकांवर कोणत्या कारणासाठी बंदी घालण्यात आली ?

१. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानातून मोठ्या संख्येने संशयास्पद प्रवासी परदेशात गेले आहेत, जे अंमली पदार्थ आणि मानवी तस्करी करत आहेत. काही जण बेकायदेशीरपणे परदेशात वास्तव्य करत आहेत.

२. आखाती देशांमध्ये पाकिस्तानी भिकार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे. पाकच्या भिकार्‍यांना पकडण्याच्या वाढत्या घटनांनंतर सौदी अरेबियाने पाकिस्तानला चेतावणी दिली आहे.

३. आखाती देशांतील अनेक आस्थापनांनी पाकिस्तानकडे तक्रार केली आहे की, त्यांनी पाठवलेल्या लोकांकडे आवश्यक कौशल्य नसल्यामुळे ते संबंधित नोकरीच्या आवश्यकता पूर्ण करू शकत नाहीत.

४. इस्लामाबादमधील ‘विंची टूर्स अँड ट्रॅव्हल्स’चे व्यवस्थापकीय संचालक मुद्दसर मीर यांनी सांगितले की, आखाती देशांतील आस्थापने यापुढे पाकिस्तानी कामगार किंवा तंत्रज्ञ ठेवू इच्छित नाहीत; कारण पाकिस्तानातून येणारे कर्मचारी अकार्यक्षम असतात, हे त्यांना आता ठाऊक झाले आहे.

संपादकीय भूमिका 

  • पाकिस्तान्यांची मानसिकता पहाता पाकवर जगाने बहिष्कार घालून त्याला वाळीत टाकणेच आवश्यक आहे !
  • आखातातील इस्लामी देश जे करतात, ते भारतानेही करणे आवश्यक आहे !