सनातनच्या ६४ व्या संत पू. (कै.) श्रीमती शेऊबाई लोखंडे (वय १०० वर्षे) यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या देहत्यागापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे !

आज २३ डिसेंबर या दिवशी पू. (श्रीमती) लोखंडेआजी यांच्या देहत्यागानंतरचा अकरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने…

१३.१२.२०२४ या दिवशी सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडे (वय १०० वर्षे) यांनी देहत्याग केला. २३.१२.२०२४ या दिवशी त्यांच्या देहत्यागानंतरचा ११ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या देहत्यागापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

(भाग १)

पू. (कै.) श्रीमती शेऊबाई लोखंडे

१. श्रीमती चंद्रभागा कापरे (पू. लोखंडेआजी यांची मोठी मुलगी), मिरजगाव, जिल्हा अहिल्यानगर.

अ. ‘पू. आईंच्या पार्थिवाकडे पाहिल्यावर मला त्यांच्या चेहर्‍यावर सोनेरी रंग दिसत होता.

आ. पू. आईंनी देहत्याग केल्याचे कळल्यावर समाजातील व्यक्तीला जसे दुःख होते, तसे दुःख मला झाले नाही. ‘देवाने माझ्या आईला मुक्ती दिली’, असा विचार माझ्या मनात आला.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. लोखंडेआजींच्या ‘इतरांचा विचार करणे’, या गुणाचे केलेले कौतुक !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एकदा मी पू. आजींना विचारले, ‘‘जर मला परात्पर गुरु डॉ. आठवले भेटले, तर मी त्यांना तुमचा काय निरोप सांगू ?’’ तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘त्यांना म्हणावं, ‘मला अजून किती दिवस ठेवता ? मला आता लवकर देवाघरी जाऊ दे. उगाच माझ्यामुळे सर्वांचा वेळ जातो. सगळ्यांना माझी सेवा करावी लागते. त्यामुळे त्यांची आश्रमातील सेवा होत नाही.’’ त्यानंतर काही दिवसांनी मला परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. तेव्हा मी पू. आजींचा निरोप त्यांना सांगितला. त्यावर ते गोड हसले आणि म्हणाले, ‘‘पू. आजी इतरांचा किती विचार करतात ! त्यांना म्हणावं, ‘काही काळजी करू नका.’’

– सौ. मनीषा गायकवाड (पू. लोखंडेआजींची नात (मुलीची मुलगी)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०२४)

२. श्रीमती इंदुबाई भुकन (पू. लोखंडेआजी यांची धाकटी मुलगी, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्रीमती इंदुबाई भुकन

२ अ. देहत्यागापूर्वी जाणवलेली सूत्रे

१. ‘पू. आईंच्या देहत्यागाच्या १५ दिवस आधी त्यांनी अन्नाचा त्याग केला होता. तेव्हा ‘त्या चैतन्यावरच जगत आहे’, असे जाणवत होते.

२. आजारपणातही देवाच्या कृपेने पू. आईंची स्मरणशक्ती पुष्कळ चांगली होती.

३. पू. आईंना वेदना होत असतांना त्यांना जप करण्यास सांगितल्यावर त्या लगेच जप चालू करायच्या.

४. पू. आर्ईंच्या देहत्यागाच्या १ घंटा आधी मी त्यांच्यासाठी ‘शून्य’, हा नामजप करत होते. तो जप १० मिनिटे शेष असतांना पू. आईंनी देहत्याग केला. तेव्हा ‘त्या शून्यात विलीन झाल्या आहेत’, असे मला जाणवले.

२ आ. देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे

१. ‘पू. आईंच्या पार्थिवाला अंघोळ घालत असतांना ‘सर्वांना चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले.

२. पू. आईंना अंघोळ घातल्यावर त्या मला देवीस्वरूप दिसल्या.

३. जेव्हा पू. आईंना चटईवर झोपवले, तेव्हा ‘त्यांच्या आज्ञाचक्रातून पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे’, असे मला जाणवले.

४. दुपारी २ वाजता मी पू. आजींच्या पार्थिवाजवळ बसून नामजप करत होते. तेव्हा मला सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाले अन् पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

३. सौ. मनीषा गायकवाड (पू. लोखंडेआजींची नात (मुलीची मुलगी)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सौ. मनीषा गायकवाड

३ अ. गुणवैशिष्ट्ये

३ अ १. प्रेमभाव

अ. ‘पू. आजी मुळातच पुष्कळ प्रेमळ होत्या. स्वतःच्या मुली, नातवंडे, सुना आणि नातसुना, या सर्वांवर त्या सारखेच प्रेम करायच्या.

आ. त्यांच्यासाठी कोणी प्रसाद किंवा वेगळा पदार्थ दिला, तर त्या तो घरातील सर्वांना द्यायला सांगायच्या.

३ अ २. इतरांचा विचार करणे : ५.२.२०२४ या दिवशी रात्री १.१५ वाजता पू. आजींना श्वास घेण्यास पुष्कळ त्रास होत होता. त्या वेळी आम्ही कुटुंबीय त्यांना म्हणालो, ‘‘रुग्णालयात जाऊया.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मला कुठेही नेऊ नका.’’ त्यामुळे श्री. दामोदर गायकवाड (पू. आजींचे नातजावई) हे एका साधकाला समवेत घेऊन रामनाथी आश्रमात गेले आणि औषध अन् नेब्युलायझर (टीप) घेऊन आले. हे पू. आजींना समजल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘एवढ्या रात्री कशाला जायचे ?’’ ते यंत्र आणल्यानंतरही लगेच पू. आजी त्यांना म्हणाल्या, ‘‘तुम्ही झोपायला जा.’’ त्या वेळी ‘ते दिवसभर सेवा करून दमले असतील’, असा पू. आजींचा विचार होता.
टीप – नेब्युलायझर : या वैद्यकीय उपकरणाचा उपयोग श्वसनमार्गाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

३ अ ३. कृतज्ञताभाव : पू. आजी सतत इतरांना साहाय्य करायच्या. त्यामुळे स्वतःची कामे इतरांकडून करून घेणे त्यांना नकोसे वाटायचे. त्यांच्या नातसुना (सौ. उर्मिला आणि सौ. रोहिणी भुकन (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय २८ वर्षे)) पू. आजींची पुष्कळ प्रेमाने सेवा करायच्या. त्यामुळे ‘या मुली माझे किती करतात !’, असे वाटून त्यांना कृतज्ञतेने भरून येत असे.

३ आ. अनुभूती – पू. आजींमधील चैतन्यामुळे साधिकेच्या खोलीतील त्रास न्यून होणे : मी पू. आजींच्या निवासस्थानाच्या शेजारच्या खोलीत रहाते. मी तेथे निवासासाठी जाण्यापूर्वी खोलीची स्वच्छता करायला गेले. तेव्हा मला तेथे पुष्कळ त्रास होऊ लागला. त्यामुळे मी एक मास स्वच्छता करू शकले नाही. त्यानंतर एकदा पू. आजी त्या खोलीत जाऊन आल्या आणि त्यानंतर आम्ही हळूहळू त्या खोलीची स्वच्छता करू शकलो. त्या वेळी पू. आजी अधूनमधून खोलीत येऊन बसायच्या आणि सर्वांशी बोलायच्या. त्यामुळे खोलीतला त्रास न्यून होत गेला.

‘हे गुरुमाऊली, ‘तुम्हीच माझ्याकडून हे सर्व लिहून घेतले’, याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. हे गुरुदेवा, ‘मला संतांचे चैतन्य अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पू. लोखंडेआजींच्या देहत्यागाविषयी काढलेले गौरवोद्गार !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘माझा लहान भाऊ श्री. वाल्मीक कांचीपूरम् येथे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत सेवा करतो. पू. आजींचा देहत्याग झाल्याचे वृत्त मी त्याला भ्रमणभाषवरून सांगितले. त्या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी बोलणे झाल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे पू. आजींचे ‘मंगलात झाले मंगल…’, असे झाले आहे. त्या उच्च लोकात गेलेल्या असून आनंदी आहेत.’’ त्यांचे बोलणे ऐकून माझे मन पुष्कळ स्थिर झाले. ती स्थिरता पू. आजींचे सर्व विधी पूर्ण होईपर्यंत टिकून होती.’

– श्री. रामेश्वर भुकन (पू. लोखंडेआजींचा मोठा नातू (मुलीचा मुलगा)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१२.२०२४)

४. श्री. रामेश्वर भुकन (पू. लोखंडेआजींचा मोठा नातू (मुलीचा मुलगा)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्री. रामेश्वर भुकन

४ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कृपेने स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेसाठी रामनाथी आश्रमात आल्याने पू. आजींच्या देहत्यागापूर्वी ३ मास त्यांचा सहवास लाभणे : ‘मी अध्यात्मप्रसाराच्या सेवेसाठी मागील ६ वर्षांपासून रामनाथी आश्रमातून बाहेरगावी गेलो होतो. या कालावधीत मी सेवा किंवा कुटुंबियांना भेटणे यांसाठी अधूनमधून रामनाथी आश्रमात येत असे. तेव्हा मला केवळ १० ते १५ दिवस पू. आजींचा सहवास मिळत असे; परंतु श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या कृपेने मी मागील ३ मासांपासून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेसाठी रामनाथी आश्रमात आलो आहे. त्यामुळे गुरुकृपेने मला पू. आजींच्या देहत्यागापूर्वी त्यांचा सहवास मिळाला आणि त्यांच्या चैतन्याचा लाभ झाला.

४ आ. देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे

४ आ १. ‘अहिल्यानगर ते रामनाथी’, असा १२ घंट्यांचा प्रवास विनाअडथळा पूर्ण होणे : पू. आजींच्या देहत्यागाचे वृत्त समजल्यानंतर मी रात्री १२ वाजता अहिल्यानगर येथून काही नातेवाइकांना घेऊन चारचाकी गाडीने रामनाथी आश्रमात येण्यासाठी निघालो. तेव्हा आमच्या प्रवासात कोणतीही अडचण आली नाही. गुरुदेवांच्या कृपेने गाडीचा चालक अतिशय सात्त्विक आणि शिवाची उपासना करणारा होता. तो चालकही आमच्या समवेत गाडीत ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा जप करत होता. १२ घंट्यांच्या प्रवासात दत्तगुरूंचा जप चालू असतांना त्याने कसलेही गार्‍हाणे केले नाही.

४ आ २. अंत्यविधीच्या वेळी जाणवलेली सूत्रे

४ आ २ अ. पू. आजींच्या पार्थिवाला भस्म लावतांना जाणवलेली सूत्रे

१. माझ्याकडून पू. आजींच्या पार्थिवाला भस्म अतिशय व्यवस्थितपणे लावले जात होते.

२. त्यांच्या कपाळावर लावलेले भस्माचे तीन पट्टे पाहून ‘त्यांच्यामध्ये पुष्कळ वैराग्यभाव होता’, असे मला जाणवत होते.

३. ते भस्म पाहून मला भगवान शिवाचे स्मरण झाले. त्या वेळी ‘पू. आजी आणि शिवलोक यांचा काहीतरी संबंध असावा’, असे मला वाटले.

४ आ २ आ. त्यांना गाडीतून स्मशानभूमीत घेऊन जात असतांना ‘आम्ही सर्व जण कुठेतरी तीर्थयात्रेला जात आहोत’, असे जाणवून मला अतिशय शांत वाटत होते.

४ आ २ इ. पू. आजींचा देह चितेवर ठेवल्यानंतर स्मशानभूमीतील वातावरण अतिशय शांत आणि स्थिर झाल्याचे जाणवले.

४ आ २ ई. ‘तेथे सूक्ष्मातून देवतांचे अस्तित्व आहे’, असे मला वाटत होते.

४ आ २ उ. पू. आजींना अग्नी देतांना मन भावनिक होणे आणि ‘पू. आजींनी चांगली साधना करून उच्च लोकात स्थान प्राप्त केले आहे’, असे जाणवून मन स्थिर होणे : पू. आजींना अग्नी देतांना मला वाटले, ‘पू. आजींना पूर्वायुष्यात आजारपण अथवा कुठलाही त्रास झालेला सहन होत नसे. त्यामुळे त्यांना आता अग्नी सहन होईल का ?’ आणि काही क्षण माझे मन भावनिक झाले; परंतु त्यानंतर माझ्या मनात गुरुकृपेने ‘देह नाशवंत आहे आणि आत्मा चैतन्यस्वरूप आहे’, असा विचार आला. त्या वेळी मला ‘पू. आजींनी पुष्कळ चांगली साधना करून गुरुदेवांचे मन जिंकले आहे आणि उच्च लोकात स्थान प्राप्त केले आहे’, असे जाणवून माझे मन स्थिर झाले.

४ आ २ ऊ. सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहित शास्त्रोक्त विधी करून घेत असतांना कृतज्ञता वाटणे : सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर ‘विधी कसा करायचा ?’, हे मला अतिशय व्यवस्थितपणे समजावून सांगत होते. प्रत्येक कृती योग्य होण्याकडे त्यांचे सतत लक्ष होते. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

४ आ २ ए. ‘संतांच्या चितेचा अग्नी त्याची दाहकता आपल्याला सहन होईल, एवढी करत आहे’, असे जाणवणे : एरव्ही मला अग्नीच्या जवळ गेल्यावर त्याचा दाह सहन होत नाही; परंतु मडके घेऊन चितेभोवती उलटी प्रदक्षिणा घालत असतांना मी चितेच्या अग्नीजवळ असूनसुद्धा मला अग्नीची दाहकता सहन होत होती. त्या वेळी ‘संतांच्या चितेचा अग्नीही त्याची दाहकता आपल्याला सहन होईल, एवढी करत आहे’, असे मला जाणवले.

४ आ २ ऐ. सर्व विधी करत असतांना मला माझ्या मनावर ताण जाणवत नव्हता. ‘माझ्याकडून सर्व कृती सहजतेने होत आहेत’, असे मला वाटत होते.

४ आ २ ओ. साधकाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांसाठी आधारस्तंभ बनलेल्या पू. आजी ! : मागील २६ वर्षांपासून पू. आजी त्यांचे गाव सोडून आमच्या कुटुंबियांच्या समवेत राहिल्या. केवळ गुरुकृपेने आम्हाला त्यांचा आनंददायी सहवास मिळाला. आरंभीपासून त्यांच्यात अल्प अहं होता. त्यांच्या संदर्भातील प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर उभे रहात होते. आमचे वडील श्रीधर भुकन यांच्या मृत्यूनंतर जणू गुरुदेवांनीच आम्हा सर्व कुटुंबियांसाठी पू. आजींच्या रूपाने एक मोठा आधार पाठवलेला होता. पू. आजी यापुढेही आम्हा सर्वांना सूक्ष्मातून चैतन्य देत रहातील.

४ आ २ औ. अंत्यविधीच्या वेळी कृतज्ञताभावाने सेवा करणार्‍या साधकांना पाहून तीनही गुरूंप्रती कृतज्ञता वाटणे : पू. आजींच्या अंत्यविधीच्या वेळी सर्व साधक अतिशय कृतज्ञताभावाने सर्व सेवा करत होते. तेव्हा सनातनच्या तीन गुरूंनी (टीप) साधकांमध्ये सनातन परिवारातील साधकांमध्ये निर्माण केलेली एकरूपता माझ्या लक्षात आली. त्या वेळी मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटत होती.
टीप – तीन गुरु : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आिण श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘हे प.पू. गुरुमाऊली, आपण आम्हाला पू. लोखंडेआजींचा चैतन्यमय सहवास दिला. हे गुरुदेवा, ‘आमच्याकडून आपल्याला अपेक्षित अशी साधना होऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

५. श्री. वाल्मीक भुकन (पू. लोखंडेआजींचा लहान नातू (मुलीचा मुलगा)), कांचीपूरम्, तमिळनाडू.

श्री. वाल्मिक भुकन
श्री. वाल्मिक भुकन

५ अ. गोवा येथे येतांना सतत नामजप आणि प्रार्थना होणे : ‘जेव्हा मला पू. आजींच्या देहत्यागाची वार्ता कळली, तेव्हा मी तिरुवण्णमलई (तमिळनाडू) येथे होतो. तेथून रामनाथी (गोवा) येथे येईपर्यंत माझ्याकडून ‘आम्हा सर्वांना पू. आजींचे चैतन्य ग्रहण होऊ दे. त्यातून आम्हा सर्वांची साधना चांगली होऊ दे’, अशी प्रार्थना आणि नामजप सतत होत होता.

५ आ. पू. आजींचे पार्थिव ज्या खोलीत ठेवले होते, तेथे पुष्कळ प्रकाश, चैतन्य आणि मंदिराप्रमाणे शांतता जाणवत होती.

५ इ. ‘पू. आजी  ध्यानात मग्न आहेत’, असे मला जाणवत होते.

५ ई. वातावरणात दाब किंवा ताण-तणाव नव्हता.

५ उ. पू. आजींना गाडीतून स्मशानभूमीत घेऊन जात असतांना जाणवलेली सूत्रे

१. स्मशानभूमीत जात असतांना आम्ही श्रीरामाचा जप करत होतो. त्या वेळी माझा जप पुष्कळ आतून आणि भावपूर्ण होत होता.

२. माझे मन निर्विचार झाले होते.

३. जप करतांना ‘आपल्या बाजूला कुणाचे तरी पार्थिव आहे’, असे काहीच जाणवत नव्हते.

४. त्या वेळी मला वाटले, ‘पू. आजींनी आमच्याकडून त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत साधना करून घेतली.’

५ ऊ. पू. आजींना अग्नी दिल्यानंतर पांढरा आणि पिवळसर रंगाचा धूर येणे : पू. आजींना अग्नी दिल्यानंतर ज्वाळांमधून काळा धूर न येता पांढरा आणि पिवळसर रंगाचा धूर येत होता. ते पाहून मला वाटले, ‘पू. आजींचा देह गुरूंनी शुद्ध केला होता. त्या मनाने पुष्कळ निर्मळ होत्या’, याचे हे प्रतीक आहे.

‘प.पू. गुरुदेव, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, आमच्या कुटुंबाला चैतन्य देण्यासाठी तुम्ही आम्हाला पू. आजींचा सत्संग दिला. ‘पू. आजी जशा आयुष्यभर परेच्छेने वागल्या आणि अखंड नामात राहिल्या, तशी साधना तुम्हीच आमच्याकडून करून घ्या’, अशी प्रार्थना आम्ही तुमच्या चरणी करत आहोत.’

(क्रमशः)

(सर्व सूत्रांचा दिनांक : १८.१२.२०२४)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक