‘सेरेंडिपिटी कला महोत्सवा’त हिंदूंच्या मंदिरांची छायाचित्रे आणि माहिती प्रदर्शित
हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचा परिणाम
पणजी, २२ डिसेंबर (वार्ता.) – शहरात १५ डिसेंबरपासून ‘सेरेंडिपिटी कला महोत्सव’ चालू आहे. महोत्सवाच्या अंतर्गत शहरात विविध ठिकाणी विविध विषयांवर प्रदर्शने भरवण्यात आली आहेत. गोव्याच्या जीवनपद्धतीवर आधारित अशाच प्रकारचे एक प्रदर्शन पणजी येथील वन विभागाच्या उद्यानात भरवण्यात आले आहे. यामध्ये गोव्यातील ख्रिस्ती धर्मियांचे चर्च, मुसलमानांच्या मशिदी आदींना स्थान देण्यात आले होते; मात्र गोव्यात बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या एकाही मंदिराचे छायाचित्र अथवा माहिती या ठिकाणी नव्हती. ही गोष्ट हिंदु जनजागृती समितीने ‘सेरेंडिपिटी कला महोत्सवा’च्या आयोजकांना लक्षात आणून देऊन त्यांचे प्रबोधन केल्यानंतर अखेर गोव्यातील मंदिराची छायाचित्रे आणि त्याविषयी माहिती असलेला फलक प्रदर्शनामध्ये लावण्यात आला.
‘सेरेंडिपिटी आर्ट फाऊंडेशन’च्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून याला देशी, विदेशी लोक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. या महोत्सवाच्या एका प्रदर्शनाते गोव्यातील चर्च, फोंडा येथील साफा मशीद आदींची छायाचित्रांसह माहिती आहे; मात्र हिंदूची संस्कृती अथवा मंदिर आदींना स्थान देण्यात आलेले नव्हते. यामुळे गोव्याविषयी चुकीची प्रतिमा निर्माण होणार असल्याने हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश प्रभु यांनी ही गोष्ट त्वरित संबंधित अधिकार्यांच्या लक्षात आणून दिली. संबंधित अधिकार्यांनी याविषयी महोत्सवाचे परीक्षक अक्षय महाजन यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर आणि श्री. महेश प्रभु यांनी परीक्षक अक्षय महाजन यांच्या हे निदर्शनास आणून दिले. त्यांनी हे स्वीकारून २१ डिसेंबर या दिवशी सायंकाळपर्यंत गोव्यातील विविध मंदिरांचे छायाचित्र आणि माहिती असलेला एक फलक सिद्ध करून तो प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केला. तसेच ‘पुढील वर्षी प्रदर्शनात हिंदु संस्कृती आणि मंदिरे यांविषयी माहिती देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला संधी देऊ’, असे आश्वासन दिले. यासंबंधी पणजी येथील उद्योजक श्री. सदानंद ठाकूर यांनी मोलाचे सहकार्य केले आणि मंदिरांविषयीचा फलक प्रदर्शित होईपर्यंत त्याविषयी संबंधितांकडे पाठपुरावा केला.