सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांचे भव्यदिव्य स्वागत
कणकवली – फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर करत, तसेच ५१ जे.सी.बी. यंत्र आणि २ क्रेन यांच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव करून आणि पुष्पहार घालून राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांचे मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. राज्याच्या मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर मंत्री राणे यांचे २२ डिसेंबरला प्रथमच जिल्ह्यात आगमन झाल्याने भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. ‘जय श्रीराम ।, भाजपचा विजय असो ।, ‘नितेश राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है ।’, अशा घोषणा या वेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.
मंत्री राणे प्रथम रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे आल्यानंतर शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राणे यांचे खारेपाटण येथे आगमन झाले. तेथे त्यांचे प्रथम शासकीय पद्धतीनुसार कणकवलीचे तहसीलदार दिक्षांत देशपांडे आणि कणकवली पोलीस निरीक्षक मारुति जगताप यांनी स्वागत केले. त्यानंतर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक यांच्याकडून मंत्री राणे यांचे स्वागत करण्यात आले.
या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अधिवक्ता अजित गोगटे, मनीष दळवी, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वागत झाल्यानंतर रात्री कणकवली येथे मंत्री राणे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
केवळ विकास नाही, तर सागरी सुरक्षेकडे विशेष लक्ष देणार !
खारेपाटण येथे बोलतांना मंत्री राणे म्हणाले, ‘‘माझ्या खात्याच्या माध्यमातून केवळ विकास नाही, तर सागरी सुरक्षेकडे मी विशेष लक्ष देणार आहे; कारण २६\११ या दिवशी मुंबईत झालेले आतंकवादी आक्रमण हे समुद्रमार्गे आलेल्या आतंकवाद्यांनी केले होते. जिल्ह्याच्या, तसेच राज्याच्या किनारपट्टीवर राष्ट्रद्रोही आणि अतिरेकी संघटनांच्या मानसिकतेच्या विचारांच्या व्यक्तींचा वावर असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे केवळ विकासाच्या गोष्टी करत राहिलो आणि सागरी सुरक्षेकडे दुर्लक्ष केले, तर भविष्यात ते धोकादायक ठरू शकते. या सर्वांवर विशेष लक्ष ठेवणार आहे. नेते, मंत्री आणि सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्यासह राज्याचा विकास करण्यावर माझा भर असेल.’’ कुटुंबीय, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच महायुतीतील घटक पक्ष या सर्वांमुळे मी येथपर्यंत पोचू शकलो. माझ्या राजकीय कारकीर्दीत सर्वांनी साथ दिली. मी तुमचा आहे. त्यामुळे मंत्री असलो, तरी हक्काने माझ्याकडे या, असे मंत्री राणे यांनी जनतेला आवाहन केले.