खाण क्षेत्रातून मंदिरे आणि घरे वाचवण्याची अडवालपाल येथील नागरिकांची मागणी

प्रतिकात्मक छायाचित्र

डिचोली, २२ डिसेंबर (वार्ता.) – खाण क्षेत्रातून मंदिरे आणि घरे वाचवा, अशी मागणी अडवलपाल येथील नागरिकांनी केली आहे. आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच वेळप्रसंगी निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल, अशीही चेतावणी दिली आहे.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार कोळम वाड्याजवळील ‘फोमेंतो रिर्सोसेस’ या आस्थापनाची खाण चालू असूनही खाण लीज (खाण लीज म्हणजे काही ठराविक काळासाठी भूमी वापरण्यास देण्याचा करार) क्षेत्रातून मंदिरे आणि घरे बाहेर काढण्याच्या दृष्टीने अद्याप हालचाल नसल्याने नागरिक चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे २१ डिसेंबर या दिवशी अडवलपाल येथील रामचंद्र गावडे यांच्या नेतृत्वाखाली महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांसह अन्य नागरिकांनी वाड्यावरून पंचायतीपर्यंत मूकमोर्चा काढला. पंचायत कार्यालयात उपस्थित पंचसदस्य शेखर परवार, गीतेश गडेकर आणि गजानन पालकर यांना नागरिकांनी मागण्यांविषयीचे निवेदन दिले. या वेळी पंचसदस्य शेखर परवार यांनी ‘सदर निवेदन खाण आणि भूगर्भ खात्याकडे पाठवण्यात येईल’, असे आश्‍वासन दिले. या निवेदनाद्वारे ‘खाण क्षेत्राच्या अगदी जवळ असलेले कोळम वाड्यातील
श्री गोपाळकृष्ण मंदिर आणि तेथील घरे खाण लीज क्षेत्रातून बाहेर काढा’, अशी मागणी देवस्थान समिती आणि वाड्यातील नागरिक यांनी केली आहे.