रायगड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी शिवसेना आग्रही !
महायुतीमधील मंत्र्यांची खातेवाटपानंतर आता पालकमंत्रीपदासाठी धडपड !
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचा दावा असणार ! – भरतशेठ गोगावले, रोजगार आणि फलोत्पादन मंत्री
मुंबई – मुंबई येथे आल्यानंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेतले. माझ्यासह आमचे कार्यकर्तेही उत्साहात आहेत. मला मंत्रीपद मिळाल्याने मी समाधानी आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर आमचा दावा असणार आहे, त्याची काही काळजी करू नका, असे प्रतिपादन रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांनी २२ डिसेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कन्या आणि महिला अन् बालविकास मंत्री आदिती तटकरे आग्रही आहेत. यापूर्वी मंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांनी म्हटले होते की, रायगडच्या पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांच्याहून आम्ही अधिक चांगले काम करू, कारण महिला आणि पुरुष यांमध्ये थोडासा फरक येतो. आम्हाला गेल्या १५ वर्षांचा आमदारकीचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही सर्वांना समवेत घेऊन काम करू.
रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले हेच हवेत ! – शिवसेना आमदारांची मागणी
‘रायगडचे पालकमंत्री म्हणून मंत्री श्री. भरतशेठ गोगावले हेच हवेत’, अशी मागणी कर्जतचे आमदार श्री. महेंद्र थोरवे यांनी केली आहे. याला श्रीबाग (अलिबाग) येथील आमदार महेंद्र दळवी यांनीही पाठिंबा दर्शवला. भाजपच्या आमदारांचाही याला पाठिंबा असल्याचा दावा शिवसेना आमदारांकडून केला. आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळू नये, यासाठी शिवसेना आमदार प्रयत्न करत आहेत.
छत्रपती संभाजीनगरसाठी संजय शिरसाट आग्रही !
छत्रपती संभाजीनगर येथे आगामी काळात महापालिका निवडणुका आहेत. यातच शिवसेनेचे नेते आणि मंत्री श्री. संजय शिरसाट यांनीही ‘मीच छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री असणार आहे’, असे म्हटले आहे. शहरात भाजपचे नेते आणि दुग्धविकासमंत्री श्री. अतुल सावे हेही पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आता कुणाची पालकमंत्रीपदी वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.