परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिकेने अनुभवलेले दिव्य आणि अनमोल क्षण !

१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाला जायचे आहे’, असे समजणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एकदा मी सायंकाळी नृत्याचा सराव करत होते. त्या वेळी ‘दैवी बालकांची ओळख करून द्यायची असल्याने ‘सत्संगात ये’, असा मला निरोप मिळाला.

१ अ. हे ऐकल्यावर मला आनंद झाला. 

१ आ. गुरुदेवांची प्रीती जाणून त्यांच्या प्रती भाव जागृत होणे : नंतर मला माझ्याकडून होणार्‍या चुका आठवू लागल्या. माझ्या मनात ‘माझ्याकडून आजपर्यंत पुष्कळ अपराध झाले आहेत, तरीही गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) माझ्यावर किती प्रीती करतात ! जन्मदात्री आईही तिच्या बाळावर करणार नाही, इतके प्रेम गुरुदेव प्रत्येक साधकावर करतात’, असे विचार येऊन माझा भाव जागृत झाला.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिकेने अनुभवलेली भावस्थिती !

२ अ. सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी रूप पाहून देहभान विसरणे, भाव जागृत होणे आणि ‘कृतज्ञता कशी व्यक्त करावी !’, हे लक्षात न येणे : मी सत्संगाला गेल्यावर परात्पर गुरुदेवांचे तेजस्वी रूप पाहून स्वतःचे अस्तित्व विसरून गेले. मला केवळ एवढेच लक्षात आले, ‘अनंत कोटी ब्रह्मांडातील प्रत्येक जिवाला सांभाळणार्‍या गुरुदेवांच्या सत्संगाला मी बसले आहे.’ त्या वेळी ‘कृतज्ञता कशी व्यक्त करावी !’, हेही मला समजत नव्हते. मला अंतर्मनात भाव जाणवत होता.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून तेज आणि पिवळा प्रकाश प्रक्षेपित होणे अन् त्यांचे रूप मोठे दिसणे : मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जवळच्या आसंदीवर बसले होते; मात्र ‘त्यांचे तेज आणि त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारा पिवळा प्रकाश’ यांमुळे मला त्यांच्याकडे पहाता येत नव्हते. ‘त्यांचे रूप मोठे होत असून मी लहान होत आहे’, असे मला जाणवले. माझी दृष्टी केवळ त्यांच्या चरणांकडेच वळत होती.

कु. अपाला औंधकर

२ इ. ‘आनंदाच्या तरंगांत असून आता केवळ श्रीमन्नारायणांचीच झाले आहे’, असे वाटणे : या वेळी माझी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना झाली, ‘हे श्रीहरि, माझी पात्रता नसूनही मला तुझ्या चरणांजवळ बसण्याची संधी मिळाली’, त्याबद्दल मी कृतज्ञता कशी व्यक्त करू ? माझ्यामध्ये पुष्कळ स्वभावदोष आणि अहं असूनही तुम्ही मला आपलेसे केले अन् स्वीकारले. आपण माझ्यावर प्रीतीचा वर्षाव केला.’ त्यानंतर ‘मी आनंदाच्या तरंगांत राहिले असून आता मी केवळ आणि केवळ श्रीमन्नारायणांचीच झाली आहे’, असे मला वाटू लागले. तेव्हा ‘माता महालक्ष्मी श्री विष्णूच्या चरणांशी बसून पादसेवन भक्ती करते, त्याचप्रमाणे मीही मातेसह त्यांची पादसेवन भक्ती करत आहे’, असे मला जाणवले. ‘गुरुदेव, माझ्यातील सर्व स्वभावदोष आणि अहं नष्ट होऊन मला तुमच्या चरणी विलीन करून घ्या’, अशी मी प्रार्थना केली.

३. भावक्षण हृदयमंदिरात सुर्वणाक्षरांनी कोरून ठेवले असणे

मी गुरुदेवांच्या सत्संगात अनुभवलेले भावक्षण कधीच विसरू शकत नाही. हा दिवस मी हृदयमंदिरात सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवला आहे.

४. कृतज्ञता

हे नारायणस्वरूप गुरुदेवा, आपली आमच्यावर अनंत कृपा आहे. आपली कृपा आणि प्रीती यांना मी कशाचीच उपमा देऊ शकत नाही. हा विलक्षण दिवस अनुभवायला दिल्याबद्दल मी कृतज्ञतेची असंख्य सुमने आपल्या चरणांवर अर्पण करते.’

– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक