देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते कायम, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण खाते !
|
नागपूर, २२ डिसेंबर (वार्ता.) – महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन १ महिना झाल्यानंतर २१ डिसेंबर या दिवशी महायुती सरकारचे खातेवाटप घोषित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह मंत्रालयासह ऊर्जा, विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, तसेच माहिती आणि जनसंपर्क विभाग हे विभाग स्वतःकडे ठेवले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले आहे.
१५ डिसेंबर या दिवशी नागपूर येथील राजभवनात महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. यात ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्री यांनी शपथ घेतली होती; मात्र मंत्र्यांना खातेवाटप झाले नव्हते. मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळातील सदस्य संख्या ४२ झाली आहे. फडणवीस सरकारमध्ये भाजपचे १९, शिवसेनेचे ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील ९ मंत्र्यांचा समावेश आहे.