आध्यात्मिक उन्नती करण्यात यशस्वी उद्योगाचे गमक ! – रविंद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी उद्योग समूह
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘उद्योजकांसाठी विशेष संवादा’चे आयोजन
कुडाळ (सिंधुदुर्ग) – उद्योग, व्यवसाय करतांना विज्ञान आवश्यक असले, तरी अध्यात्मासारख्या मूलभूत गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा. आध्यात्मिक उन्नती करण्यानेच उद्योग आणि व्यवसाय यांची प्रगती होते. व्यवसायातील अपयशाची कारणे अध्यात्मातूनच मिळू शकतात. आध्यात्मिक प्रगती झाली की, व्यवसायातील अनेक विषय अचूक होऊन ऐहिक उन्नतीही होते. व्यवसायात धर्म आणि साधना यांची जोड दिली, तर सुख, शांती अन् आनंद लाभेल, असे प्रतिपादन ‘पितांबरी उद्योग समुहा’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुडाळ ‘एम्.आय.डी.सी.’मधील बॅ. नाथ पै शैक्षणिक भवनाच्या सभागृहात, तसेच कुंभारमाठ, मालवण येथील जानकी मंगल कार्यालयात ‘उद्योजकांसाठी विशेष संवादा’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ‘यशस्वी उद्योगासाठी अध्यात्म’, या विषयावर श्री. प्रभुदेसाई यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील हेही उपस्थित होते. या दोन्ही ठिकाणच्या कार्यक्रमांना एकूण १३३ उद्योजक उपस्थित होते.
या वेळी समितीचे श्री. राजेंद्र पाटील यांनी समितीचे कार्य आणि धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधातील लढ्यात समितीला मिळालेले यशाची सोदाहरण माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्रद्धा बागवडे यांनी केले.
या वेळी श्री. प्रभुदेसाई म्हणाले…
१. उद्योग, व्यवसाय करतांना अनेकदा आर्थिक विवंचना असतात. त्यातून बाहेर येण्यासाठी देवाचे साहाय्य घेतले पाहिजे. मलाही व्यावहारिक जीवनात अनेक समस्या आल्या; पण सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करायला प्रारंभ केला. त्यानंतर व्यवसायात प्रगतीच्या दिशेने वाटचाल चालू झाली.
२. हिंदु धर्म म्हणजे ऐहिक आणि पारमार्थिक उन्नती साधून देणारा मार्ग आहे, हे साधनेमुळे अनुभवता आले. उद्योगात यशस्वी होण्याचे कारण साधनेत आहे. सर्व गोष्टींचा त्याग केल्याविना आनंद मिळत नाही. यासाठी दानधर्म करणे आवश्यक आहे आणि ते धर्मासाठीच करावे.
३. जेव्हा आपण दुर्गुणांवर मात करू शकू, तेव्हाच प्रारब्धावर मात करू शकतो. साधनेमुळे सात्त्विकता वाढते. बुद्धी जेव्हा सात्त्विक होते, तेव्हाच यश मिळते आणि अध्यात्माचे सिद्धांत पटायला लागतात. जेव्हा मन, बुद्धी सात्त्विक होते, तेव्हाच अध्यात्मातून ऐहिक उन्नती करू शकतो.
४. साधनेमुळे व्यक्तीमधील सूक्ष्म ज्ञान जागृत होते. त्यामुळे लाभ-तोटे कळून व्यवहारातही त्याचा लाभ होतो. व्यावहारिक जीवनात नामजप महत्त्वाचा असून त्यातूनच नकारात्मक विचारांची श्रृंखला तोडता येते. चिंतेचे गाठोडे बाजूला ठेवून प्रत्येक गोष्टीकडे साक्षीभावाने पहा. प्रत्येक गोष्टीत प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करावी. कृतज्ञतेने नम्रता येते.
उद्योग, व्यवसाय करतांना तो साधना म्हणून करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदमजीवनातील अनेक समस्या या आध्यात्मिक असतात आणि त्या साधनेमुळेच सुटतात. जीवनात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करत गुणसंवर्धन केले पाहिजे. नामजपामुळे प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते आणि अनेक समस्या सुटतात. उद्योग, व्यवसाय करतांना तो साधना म्हणून केला, तर त्यातून साधना होते. उद्योग, व्यवसाय हा ईश्वरप्राप्तीसाठीची साधना म्हणून करायचा आहे, असा भाव ठेवणे महत्त्वाचे आहे. |
अभिप्राय
१. श्री. उद्धव आचरेकर, बेकरी उत्पादन उद्योजक : कार्यक्रम पुष्कळ चांगला झाला. एवढा मोठा उद्योजक ‘नामस्मरणाचे महत्त्व सांगतो’, म्हणजे ‘आपल्याला तसे प्रयत्न करायला हवेत’, याची जाणीव झाली.
२. ‘सामंत हेरिटेज’चे मालक श्री. भाऊ साम़ंत यांनी ‘या कार्यक्रमामुळे आम्हाला एवढ्या मोठ्या उद्योजकाची भेट झाली’, असे सांगितले.