सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त झालेल्या चंडीयागाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना मध्यप्रदेश येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त १४ आणि १५.५.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात चंडीयाग झाला. त्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना मध्यप्रदेश येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूतींचा काही भाग २१ डिसेंबरला पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/865605.html
३. सौ. मातंगी तिवारी, इंदूर
३ अ. यागाच्या वेळी विविध देवतांचे दर्शन होणे : ‘१५.५.२०२३ या दिवशी याग चालू होण्यापूर्वी आरंभी प्रार्थना करतांना मी डोळे बंद केल्यावर मला बटु भैरवाचे दर्शन झाले. श्रीसूक्त पाठ झाल्यानंतर मला श्रीयंत्रामध्ये श्री ललिता त्रिपुरसुंदरीदेवीचे दर्शन होत होते. काही वेळानंतर मला
श्री प्रत्यंगिरादेवीचे मारक रूपातील दर्शन झाले. मला आंब्याच्या पानांमध्ये देवीच्या जिभेचे दर्शन झाले. माझे मन शांत होऊन एकाग्र होत होते. मला हवनकुंडात विष्णुतिलक चिन्ह उर्ध्वपुंड्र दिसले. त्यामध्ये मला श्रीपाद श्रीवल्लभ यांचे दर्शन झाले. माझा नामजप आनंदाने चालू झाला.’
४. सौ. संजना गणोरकर, जबलपूर
४ अ. याग चालू असतांना यज्ञकुंडातील ज्वाळा सोनेरी, केशरी आणि पांढरा या रंगांच्या दिसणे, चैतन्य जाणवणे आणि पूर्णाहुतीच्या वेळी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी जणू ज्येष्ठा आणि कनिष्ठा महालक्ष्मी आहेत’, असे वाटणे : ‘१५.५.२०२३ या दिवशी याग चालू असतांना मला यज्ञकुंडातील ज्वाळा सोनेरी आणि केशरी या रंगाच्या दिसत होत्या. त्यानंतर थोड्या वेळाने मला त्यात पांढरा रंगही दिसू लागला. मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते. पूर्णाहुतीच्या वेळी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघीही जणू ज्येष्ठा अन् कनिष्ठा महालक्ष्मीच आहेत’, असे मला वाटत होते. माझी पुनःपुन्हा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना प्रार्थना होत होती, ‘हे गुरुमाऊली, आम्हा सर्व साधकांवर आपली कृपादृष्टी राहू दे आणि आम्हाला आपल्या चरणी ठेवावे. आपणच आमच्याकडून आपल्याला अपेक्षित अशी साधना करून घ्यावी.’
५. सौ. पंकज सोम भदोरिया
५ अ. श्री दुर्गासप्तशतीचा पाठ चालू असतांना आलेल्या सुगंधाचे कारण दुसर्या दिवशी कळणे : ‘१४.५.२०२३ या दिवशी रामनाथी आश्रमात श्री दुर्गासप्तशतीचा पाठ होत असतांना मला हवनाच्या वेळी जसा सुगंध येत असतो, तसा सुगंध येत होता. त्याकडे माझे लक्ष गेल्यावर सुगंध यायचा बंद झाला. १५.५.२०२३ या दिवशी एका साधकाने आदल्या दिवशी झालेल्या यज्ञाविषयी माहिती सांगितली. तेव्हा त्याने सांगितले, ‘‘काल झालेल्या हवनामध्ये हिना अत्तराची आहुती दिली होती.’’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मला काल सुगंध का आला होता ?’
५ अ. ‘कानामध्ये हवनाच्या मंत्रांचा आवाज ऐकू येत आहे’, असे जाणवणे : १५.५.२०२३ या दिवशी हवनाच्या वेळी मी प्रार्थना करण्यासाठी डोळे बंद करताच मला जाणवत होते, ‘जणू काही यज्ञस्थळी मी एकटीच आहे.’ त्या वेळी माझ्या कानात हवनाच्या मंत्रांचा आवाज ऐकू येत होता.
६. सौ. संध्या आगरकर, भोपाळ
६ अ. ‘यज्ञ घरीच चालू असून स्वतःसमोर मंत्रोच्चार होत आहेत’, असे अनुभवता येणे : ‘१४.५.२०२३ या दिवशी मी डोळे बंद करून यज्ञ अनुभवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा ‘आमच्या घरीच यज्ञ चालू आहे आणि माझ्या समोरच मंत्रोच्चार होत आहेत’, असे मला अनुभवता आले. ‘गुरुकृपेने संपूर्ण वास्तूची शुद्धी होत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
७. सौ. आशा पेठकर (वय ७३ वर्षे), ग्वाल्हेर
७ अ. ‘यज्ञाचा धूर संपूर्ण खोलीत पसरला आहे’, असे वाटणे : ‘रामनाथी आश्रमात चंडीयाग चालू होता. तेव्हा मला वाटले, ‘यज्ञाचा धूर संपूर्ण खोलीत पसरला आहे.’ त्या वेळी मला धुराचा सुगंध जाणवत होता. १४ आणि १५.५.२०२३ या दोन्ही दिवशी मला अशीच अनुभूती आली. (समाप्त)
मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २४.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |