Well Found In Sambhal : संभल (उत्तरप्रदेश) येथे १५० वर्षे जुनी बावडी (पायर्या असणारी मोठी विहीर) सापडली !
बावडीच्या वरच्या भागात मुसलमानांनी केले आहे अतिक्रमण !
संभल (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील चंदौसी शहरातील लक्ष्मणगंज येथील जुन्या बावडीचे खोदकाम चालू आहे. २२ डिसेंबरला सकाळी २ जेसीबी आणि ३० कामगार या बावडीचे खोदकाम करत असून ते अद्याप पूर्ण झालेले नाही. येथे आतापर्यंतच्या खोदकामानंतर प्राचीन बांधकाम आढळले आहे. याला ‘राणी की बावडी’ असे म्हटले जाते. भूमीच्या ६-७ फूट खाली ८ ते १० मीटर लांबीचे हे बांधकाम आढळले आहे. तिच्यावर मुसलमानांनी अवैधरित्या घरे बांधली आहेत. त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र पानसिया आणि पोलीस अधीक्षक कृष्णा बिष्णोई उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पानसिया म्हणाले की, सध्या २१० चौरस मीटर पर्यंत लोकांनी अतिक्रमण केले आहे, ते काढले जाईल. बावडीच्या खाली असलेले बांधकाम सुमारे १२५ ते १५० वर्षे जुने आहे.
१. १७ डिसेंबर या दिवशी येथे बांके बिहारी मंदिर सापडले होते. २१ डिसेंबर या दिवशी या परिसरातील बावडीवर अतिक्रमण झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर अतिक्रमणावर कारवाई चालू करण्यात आल्यावर ही बावडी आढळून आली. येथे बोगदा आढळून आला. बांके बिहारी मंदिरापासून बावडीचे अंतर १५० मीटर आहे. बावडीचे क्षेत्रफळ सुमारे २०० मीटर आहे. लोकांनी आजूबाजूचा परिसर कह्यात घेऊन घरे बांधली आहेत.
२. स्थानिक लोकांनी सांगितले की, बिलारी राजाच्या आजोबांच्या काळात ही बावडी बांधण्यात आली होती, तिचा दुसरा मजला आणि तिसरा मजला संगमरवरी, वरचा मजला विटांचा आहे. त्यात एक विहीर आणि ४ खोल्या आहेत. ही बावडी मातीने बुजण्यात आली होती. बांधकामाची हानी होऊ नये, म्हणून संथगतीने उत्खनन केले जात आहे
३. २१ डिसेंबर या दिवशी पुरातत्व विभागाच्या पथकाने संभलच्या कल्की मंदिराची पहाणी केली. या पथकाने मंदिराचा घुमट, भिंतींवर केलेले कोरीव काम आणि संकुलाची छायाचित्रे काढली आणि चित्रीकरण केले.