व्यक्तीला येणारा तणाव आणि वैद्यकीय दृष्टीकोनातून ध्यानामुळे होणारे लाभ !
‘काही विकार न उद्भवणे आणि झाल्यास ते नियंत्रणात रहाणे’, यासाठी ध्यान महत्त्वाचे आहे. ‘काही विकार होणे किंवा ते नियंत्रणात न रहाणे’, याला जीवनातील तणाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. ‘जीवनातील तणाव देहक्रियांवर कसा परिणाम करतो ? आणि त्यातून नंतर विकार कसे उद्भवतात ?’ अन् ‘ध्यानामुळे त्यावर नेमका कसा उपाय होतो ?’, हे समजून घेतले, तर ध्यान परिणामकारक होण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करू. या लेखात आपण ‘तणावासंबंधी काही सूत्रे आणि वैद्यकीय दृष्टीने ध्यानाचे लाभ’ यांविषयी थोडक्यात जाणून घेऊया. २१ डिसेंबर या ‘जागतिक ध्यान दिना’च्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘तणावासंबंधी काही सूत्रे आणि वैद्यकीय दृष्टीने ध्यानाचे लाभ’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (भाग २)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/865491.html
३. तणावाला प्रतिसाद देणारी शरीरक्रियेची अंगे आणि त्यांची वैशिष्ट्ये
‘यामध्ये मेंदू आणि शरिराच्या अन्य व्यवस्थांकडे, उदा. हृदय, त्वचा, आतडी इत्यादींकडे मेंदूचे संदेश पोचवणारी स्वायत्त चेतासंस्था, हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या सक्रीयतेवर तणावजन्य कारणामुळे शरिरावर होणारे परिणाम अवलंबून आहेत.
३ अ. मेंदू
३ अ १. मेंदूचे मूलभूत कार्यसापेक्ष ३ भाग : जसजसे प्राणी विकसित होत गेले, तसतसा त्यांचा मेंदूही विकसित झाला. मनुष्य हा सर्वांत अधिक विकसित प्राणी आहे. त्याच्या मेंदूचे ढोबळ कार्यसापेक्ष ३ भाग पडतात.
३ अ १ अ. आदिम मेंदू : अगदी लहानात लहान प्राण्यामध्येही हा भाग असतो. याच्या योगे प्राण्याला परिस्थितीमध्ये उत्पन्न झालेल्या संकटाला सामोरे जातांना ‘त्याच्याशी संघर्ष करणे किंवा पलायन करणे’, एवढेच समजते. माणसांमध्येही याचे मुख्य कार्य हेच असते. जेव्हा आपण धोक्यात असतो, उदा. रस्त्यात अकस्मात् पाय घसरला अथवा वाहन अंगावर आले, तर आपल्याला कळायच्या आधीच शरिराकडून स्वतःचे रक्षण करण्यासाठी काही कृती होऊन गेलेली असते. येथे आदिम मेंदूची संरचना उत्तेजित होते आणि आपल्याला संघर्ष किंवा पलायन यांसाठी सिद्ध करते.
३ अ १ आ. भावनिक मेंदू : हा भावनांचे नियंत्रण करणारा भाग आहे. जेव्हा आपल्याला सभोवतालच्या परिस्थितीतील पालटाची जाणीव होते, तेव्हा या भागामुळे आपण भावनिकदृष्ट्या सक्रीय होतो.
३ अ १ इ. विचार मेंदू : हा तर्कशुद्ध विचार करणारा भाग आहे. जेव्हा आपण एखादी समस्या विचारपूर्वक सोडवतो किंवा तार्किक विचार करतो, तेव्हा हा भाग कार्यरत असतो.
तणावाच्या संबंधित प्रतिसादामध्ये मेंदूतील ‘आदिम’ आणि ‘भावनिक’, हे भाग प्राधान्याने महत्त्वाचे ठरतात.
३ अ २. धोक्यासंबंधी मेंदूची मोठी संवेदनशीलता : प्राण्याचा मेंदू ‘प्राण्याला त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये धोका आहे का ?’, या संदर्भात पुष्कळ संवेदनशील असतो. प्राण्याच्या मेंदूरचनेचे ते प्राथमिक कार्य आहे. हे मनुष्याच्या मेंदूमध्येही आपल्या नकळत चालू असते. हे कार्य गतीने, म्हणजे एका सेकंदाच्याही अगदी लहान भागात होत असते, म्हणजे ‘काय होत आहे ?’, याची कणभर जाणीव होण्याच्या पुष्कळ आधीच हे कार्य होऊन गेलेले असते. यामुळे शरिरात तणाव निर्माण होतो.
३ अ ३. पूर्वस्मृतींचा तणावासंबंधी प्रतिसादावरील प्रभाव : पूर्वानुभवाच्या नकारात्मक संवेदनांच्या स्मृतीही मेंदूमध्ये असतात. त्यांचेही या प्रतिसादामध्ये मोठे योगदान असते. परिस्थितीकडून प्राप्त संकेत पूर्वीच्या कोणत्याही नकारात्मक आठवणीशी किंचितसा जरी जुळला, तरी सहानुभूती (सिंपथेटिक) चेतासंस्था अधिक सक्रीय होते. काही वेळा तर मनात अकस्मात् आलेला एक छोटासा विचारही मूळ स्मृतीमुळे उत्पन्न झालेल्या तणावाइतका तीव्र प्रतिसाद शरिरात उत्पन्न करू शकते. थोडक्यात बाह्य परिस्थिती आणि अंतर्गत स्मृती यांमुळे तणाव निर्माण होतो.
३ अ ४. तणाव प्रतिसादासंबंधी लक्षात घ्यायची महत्त्वाची सूत्रे
अ. येथे आपण तणावाच्या प्रक्रियेचा अभ्यास करतांना हे लक्षात घ्यायला हवे की, आपल्याला नकळत घडणार्या शरीरक्रिया शरिराच्या अंगभूत नियमांनुसार घडत असतात. त्यांच्यावर आपल्या विचारांचे सहज नियंत्रण नसते. त्यामुळे आपल्यावर तणावाचे दुष्परिणाम होतात.
आ. शरिराच्या क्रियाशास्त्रानुसार प्रत्येक लहान-मोठ्या प्रसंगाला आपले शरीर काही प्रतिसाद देते. हा प्रतिसाद स्वायत्त चेतासंस्था, तसेच अंतर्स्रावी (हार्मोन्स) ग्रंथीसंस्था यांच्या माध्यमातून दिला जातो. हे सर्व व्यक्तीच्या विचारांच्या स्तरावरील इच्छेच्या स्वाधीन नसते.’ (क्रमशः) (१७.१२.२०२४) ०
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.