Bengal Teacher Scam : शिक्षक भरतीत अनियमितता आढळून आली, तर कारवाई का केली नाही ? – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला शिक्षक भरती घोटाळ्यावरून फटकारले !

ममता बॅनर्जी

नवी देहली – बंगालमधील २५ सहस्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या भरतीशी संबंधित घोटाळ्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, उमेदवारांच्या निवडीत अनेक त्रुटी आहेत. भरतीतील अनियमितता राज्य सरकारला ठाऊक असतांना अतिरिक्त पदांवर शिक्षकांची नियुक्ती का करण्यात आली ?

हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्त्या रहित करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. या प्रकरणाची सुनावणी करतांना मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपिठाने सांगितले की, कलंकित उमेदवारांना वेगळे करता येणार नाही; म्हणून उच्च न्यायालयाने या आधारे भरती रहित केली आहे. अतिरिक्त पदे निर्माण करण्याचा उद्देश काय होता ? अनियमितता उघडकीस आल्यानंतरही कलंकित उमेदवारांची हकालपट्टी का केली नाही ? मसूरच्या डाळीमध्ये काही काळे आहे कि सर्व डाळच काळी आहे ? कलंकित उमेदवारांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकते.

संपादकीय भूमिका

गेंड्याच्या कातडीच्या सरकारांना न्यायालयांनी कितीही फटकारले, तरी त्यांच्यावर कधीही आणि काहीही परिणाम होत नसतो ! त्यांच्यावर कडक कारवाई करणेच आवश्यक असते. असे जेव्हा होईल, तेव्हाच जनतेला खर्‍या अर्थाने कायद्याचे राज्य मिळेल !