पुढील २ दिवसांमध्ये मंत्रीमंडळ खाते वाटप होईल ! – मंत्री गुलाबराव पाटील
महायुतीच्या ३ पक्षांत काही खात्यांवरून वाद !
नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – महायुतीच्या ३ पक्षांत काही खात्यांवरून वाद आहेत. येत्या २ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र बसून चर्चा करतील. त्यानंतर २ दिवसांमध्ये खात्याचे वाटप होईल, अशी माहिती शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी २१ डिसेंबर या दिवशी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना दिली.
मंत्री गुलाबराव पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काम चालू केले आहे. २ दिवसांमध्ये खाते वाटप घोषित होईल. खाते वाटप करण्यास विलंब झालेला नाही. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले, त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तारही झाला. कुठलेही खाते मिळाले, तरी शेवटी खाते हे खातेच असते.’’
संतोष देशमुख हत्या प्रकरणी कुणालाही सोडणार नाही !
गुलाबराव पाटील म्हणाले की, बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सभागृहामध्ये निवृत्त न्यायाधीश किंवा सध्याचे न्यायाधिश यांच्या वतीने या संपूर्ण घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. देशमुख यांची हत्या निश्चितपणे निषेधार्ह आहे. चौकशीत कुणी दोषी आढळल्यास त्याला सोडले जाणार नाही.