विधानसभेत हिंदूंना बंधूभावाचे धडे देणार्या अबू आझमी यांना मंत्री नीतेश राणे यांनी खडसावले !
नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – हिंदु आणि मुसलमान यांच्यात बंधुत्वाची भावना निर्माण करायला हवी, असे सांगून विधानसभेत हिंदूंना बंधुप्रेमाचे उपदेश करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या भाषणावर भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी हरकत घेत विधानसभेतच खडसावले. ‘भाईचार्याचा उपदेश त्यांनी फतवे काढणार्यांना वेळेत दिला असता, तर अशी भाषणे देण्याची वेळ आली नसती’, असे सुनावून हिंदूंना धर्मांध ठरवणार्या अबू आझमी यांना मंत्री नीतेश राणे यांनी गप्प केले.
नागपूर येथील अधिवेशनामध्ये २१ डिसेंबर या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलतांना अबू आझमी म्हणाले, ‘‘नवरात्रीमध्ये मशिदीपुढून जातांना घोषणा दिल्या जातात. ‘इस देश में रहेना है, तो ‘जय सिया राम’ कहना है’, अशा घोषणा दिल्या जातात. भगवा झेंडा लावला जातो. या प्रकारच्या घटना घडत असल्यास कायदा आणि सुव्यवस्था कशा दुरुस्त होणार ? विशाळगडावर मशिदीत घुसून कुराण जाळण्यात आले. ५० लोकांच्या घरांची तोडफोड करण्यात आली. या सगळ्यामागे केवळ हिंदु आणि मुसलमान यांच्यात भांडण लावण्याचा उद्देश आहे. बुलढाणा येथे टिपू सुलतानची जयंती साजरी करतांना दंगल घडवण्यात आली. गरीब मुसलमानांची घरे जाळण्यात आली.’’ अशा प्रकारे मुसलमानांची तळी उचलून अबू आझमी यांनी हिदूंना धर्मांध ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यावर मंत्री नीतेश राणे यांनी बंधुप्रेमाचे धडे मुसलमानांना देण्याचे आवाहन आझमी यांना केले.
अबू आझमी यांनी वस्तूस्थितीला धरून बोलावे ! – मंत्री नीतेश राणे, भाजप
श्री गणेशमूर्तीच्या मिरवणुकीवर कोण दगड मारतात ? मंदिरे कोण तोडतात ? हे सर्वांना ठाऊक आहे. अबू आझमी सभागृहात चुकीची माहिती देत आहेत. त्यांनी दुसरी बाजू सभागृहात मांडावी. सत्य महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे.