कर्नाटक येथून अनधिकृतपणे गोमांस आणल्याच्या संशयावरून गोरक्षक गाडीची पहाणी आणि चौकशी यांसाठी गेले असतांना झाले आक्रमण !
|
मडगाव, २१ डिसेंबर (वार्ता.) – कर्नाटक येथून अनधिकृतपणे गोमांस आणल्याच्या संशयावरून फातोर्डा येथील ‘दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधीकरण’च्या (‘एस्.जी.पी.डी.ए.’च्या – ‘साऊथ गोवा प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’च्या ) मार्केटमध्ये गाडीची पहाणी आणि चौकशी करण्यासाठी गेले असतांना गोरक्षकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. घायाळ झालेल्या गोरक्षकांना सध्या उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या प्रकरणी अफजल बेपारी आणि युनूस बेपारी या दोघांना पोलिसांनी अटक केली असून अन्य तिघा अज्ञातांविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कर्नाटक येथून गोमांसाची आयात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर काही गोरक्षक २१ डिसेंबरच्या सकाळी चौकशीसाठी मार्केटमध्ये आले होते. या ठिकाणी एका वाहनातील सामान बाहेर काढण्यात आले होते, तर अन्य दोन भरलेली वाहने लपवून ठेवण्यात आली होती. गोरक्षकांनी या वेळी काही विक्रेत्यांना ‘बंद असलेल्या २ वाहनांच्या आतमध्ये काय आहे ? ते दाखवण्यास सांगितले.’ यावर एका विक्रेत्याने ‘तुम्ही कोण विचारणारे ?’ असे म्हणत वाहनाचे दार उघडण्यास नकार दर्शवला. यानंतर वादावादी झाली.
‘बजरंग दला’चे नेते भगवान रेडकर म्हणाले,‘‘या वेळी गोरक्षक किरण आचार्य आणि साई मालवणकर यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. ‘गोमांसाची वाहतूक करण्यात आली आहे का ?’, अशी विचारणा केल्यानेच मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे हे गोव्याबाहेरील होते.’’ गोरक्षकांनीही त्यांना मारहाण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
मार्केटमधील विक्रेत्यांनी गाडीच्या तपासणीसाठी आलेल्या गोरक्षकांनी तिघांना मारहाण केल्याचा दावा केला आहे. यात अफजल बेपारी, माजिद बेपारी आणि युनूस बेपारी या तिघांना लोखंडी सळीने मारहाण झाल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर ‘एस्.जी.पी.डी.ए.’ मार्केटमधील मांस विक्रेत्यांनी दुकाने बंद करून फातोर्डा पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला आणि तिघांना मारहाण झाल्याची तक्रार फातोर्डा पोलीस ठाण्यात नोंदवली. मांस विक्रेत्यांनी ‘यापुढे मांसाच्या मार्केटमध्ये येणार्या गाड्यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि मार्केटमध्ये पोलिसांची नियुक्ती करावी’, अशा मागण्या केल्या. काही विक्रेत्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मार्केटमध्ये आणलेले मांस हे गोमांस नव्हते, तर ते म्हशीचे मांस होते आणि ते ‘गोवा मांस प्रकल्पा’तून आणण्यात आले होते.