पर्ये, सत्तरी येथील श्री साखळेश्‍वर देवस्थानच्या वादावर अखेर पडदा

श्री भूमिका देवस्थानात उत्सवाला शासनाकडून अनुमती

वाळपई, २१ डिसेंबर (वार्ता.) – पर्ये येथील श्री भूमिका देवस्थानशी संलग्न असलेल्या श्री साखळेश्‍वर देवस्थानच्या वर्धापनदिनी धार्मिक विधी करण्यावरून झालेल्या वादाला २० डिसेंबर या दिवशी हिंसक वळण लागले होते. यानंतर शासनाने मंदिर परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केला होता आणि चौघांवर गुन्हे प्रविष्ट केले होते. शासनाने जमावबंदी आदेश आणि ४ जणांच्या विरोधातील गुन्हे मागे घेणे, तसेच २१ आणि २२ डिसेंबर या दिवशी श्री भूमिका देवस्थानात धार्मिक विधी करण्यास अनुमती देण्याचा निर्णय घेतल्याने या वादावर अखेर पडदा पडून येथील तणाव निवळला आहे. यानंतर श्री भूमिका देवस्थानच्या सभागृहात ग्रामस्थांनी बैठक घेऊन शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले, तसेच २१ आणि २२ डिसेंबर या दिवशी गावातील सर्व समाजातील लोक एकत्र येऊन गवळण सप्तक उत्सव साजरा करणार असल्याचे ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. शासनाने बंदी आदेश मागे घेतल्यानंतर मंदिरात जमलेल्या महिलांनी श्री भूमिका देवीचा मोठ्याने जयघोष करत आनंद व्यक्त केला आणि मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. मंदिर वाचवण्यासाठी आम्ही रणरागिणी एकत्र आलो आहोत, अशी भावना महिलांनी व्यक्त केली.

काय होते प्रकरण ?

पर्ये येथील श्री साखळेश्‍वर देवस्थानचा वर्धापनदिन सर्व १२ महाजनांनी करावा, असा आदेश सत्तरी येथील उपजिल्हाधिकार्‍यांनी दिल्यानंतर माजिक गटाने २० डिसेंबरच्या पहाटे ५ वाजता हा विधी केला. यामुळे वादाची ठिणगी पडली. यानंतर विधी केलेल्यांवर गुन्हा प्रविष्ट करून त्यांना कह्यात घेण्याच्या मागणीवरून अन्य गावकर मंडळींनी सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर २० डिसेंबरला निदर्शने केली. संबंधितांवर गुन्हा प्रविष्ट होईपर्यंत जागेवरून हलणार नसल्याची चेतावणी या वेळी आंदोलनकर्त्यांनी दिली. यानंतर उपजिल्हाधिकारी पल्लवी मिश्रा यांनी पोलीस निरीक्षकांना बोलावून घेऊन ४ जणांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला. यानंतर गावकर मंडळींनी तेथून जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर २४ डिसेंबरपर्यंत श्री भूमिका देवस्थान बंद ठेवण्याचा आदेश उपजिल्हाधिकार्‍यांनी दिला. भूमिका देवस्थान २४ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश आल्यामुळे मंदिरात २१ डिसेंबर या दिवशी होणारा धार्मिक सप्ताह आणि २२ डिसेंबर या दिवशी होणारा गवळण काला होणार नसल्याचे निश्‍चित झाले. यामुळे माजिक महाजन गटाचे लोक संतप्त झाले आणि त्यांनी सायंकाळी मंदिर परिसरात एकत्र येऊन आक्रमकपणे त्यांच्या मागण्या मांडल्या. ‘मंदिर बंद ठेवण्याच्या आदेशासह चौघांच्या विरोधात प्रविष्ट (दाखल) झालेले गुन्हे मागे घ्यावे’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या मागणीसाठी सांखळी-केरी-बेळगाव महामार्ग अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काहींनी या मार्गावर आग पेटवून वाहने रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी सर्व प्रयत्न हाणून पाडले. या वेळी काही संतप्त लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. या वेळी काही पोलीसही घायाळ झाले होते.