हेवाळे गावात हत्तीकडून शेती, बागायती यांसह गोठ्याची हानी
दोडामार्ग – गेल्या आठवड्यात तालुक्यात आलेला एक हत्ती येथील तिलारी खोर्यातील गावात मोठी हानी करत आहे. २० डिसेंबरच्या रात्री या हत्तीने तालुक्यातील हेवाळे गावातील सूर्यकांत देसाई यांच्या बागेतील झाड तोडले आणि श्रीपत देसाई यांच्या गोठ्यावर (गोठा म्हणजे गुरांना बांधण्याची जागा) टाकले. त्यामुळे गोठ्याच्या छतावरील पत्रे गुरांच्या अंगावर पडले. यामुळे एक गाय आणि एक बैल घायाळ झाले. या हत्तीने एका रात्रीत शेती आणि बागायती यांची मोठी हानी केली. हत्ती आता मनुष्यवस्तीत येऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्ती आल्याचे समजल्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन फटाके फोडले. त्या आवाजाने हत्ती जंगलात पळून गेला. गेली अनेक वर्षे जीवित आणि वित्त हानी करणार्या हत्तींचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
संपादकीय भूमिकाहत्तींच्या उपद्रवापासून जनतेचे रक्षण करू न शकणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! |