प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करणार्‍या आणि प्रत्येक कृती ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ अशा प्रकारे करणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

‘वर्ष २०२२ मध्ये श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ भाग्यनगर आणि बेंगळुरू येथे आल्या होत्या. त्या वेळी मला त्यांचा सत्संग मिळाला. त्या प्रत्येक कृतीचे अध्यात्मीकरण करतात. त्यांच्या सहवासात मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याविषयीची माहिती पुढे दिली आहे.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. प्रत्येक कृती ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ अशा प्रकारे करणे

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ प्रत्येक कृती ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ अशा प्रकारे करतात’, हे माझ्या लक्षात आले. त्या स्नान करून बाहेर आल्यावर स्नानगृह अगदी स्वच्छ आणि कोरडे असायचे. त्या वेळी ‘स्नानगृहात कुणी स्नान केले नाही’, असे वाटायचे.

२. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी आम्हाला ‘प्रत्येक कृतीतून चैतन्य आणि सात्त्विकता कशी ग्रहण करायची ?’, ते शिकवले.

सौ. विनुता शेट्टी

३. अग्निहोत्रासाठी उपस्थित असलेल्या साधकांना मनात येणार्‍या विचारांचा अभ्यास करायला सांगून अंतर्मुखता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे

बेंगळुरू येथे असतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ प्रतिदिन सूर्योदयाच्या वेळी अग्निहोत्र करत. एकदा त्यांनी अग्निहोत्रासाठी उपस्थित असलेल्या साधकांना विचारले, ‘‘अग्निहोत्र चालू असतांना कुणाचे मन किती टक्के प्रमाणात एकाग्र झाले होते ? आणि मनात किती विचार येत होते ?’’ त्या वेळी सर्वांनी आपापल्या मनाची स्थिती सांगितली. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘अग्निहोत्राच्या वेळी साक्षात् देवता उपस्थित असतात. जे साधक एकाग्रतेने थांबले होते, त्यांना चैतन्य मिळाले आणि जे साधक विचारांत होते, ते चैतन्यापासून दूर राहिले. अशाच प्रकारे प्रत्येक गुरुसेवा करतांना गुरुतत्त्व साधकांच्या साहाय्यासाठी उपस्थित झालेले असते. जो साधक भाव ठेवून आणि एकाग्रतेने सेवा करील, त्यालाच ते चैतन्य ग्रहण करता येईल !’’

त्यांनी आम्हाला आमच्या मनात येणार्‍या विचारांचा अभ्यास करायला सांगून अंतर्मुखता वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या सहवासात असतांना त्यांनी आम्हाला ‘प्रत्येक कृतीतून आनंद घेणे, प्रत्येक कृतीतून साधना होण्यासाठी प्रयत्न करणे आणि भगवंताचे स्मरण करणे’, यांविषयी शिकवले.

‘हे गुरुदेवा, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे मला कृतीत आणता येऊ देत, माझी तळमळ आणि भक्ती वाढू दे’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करते.’

– सौ. विनुता शेट्टी, भाग्यनगर, तेलंगाणा. (२९.११.२०२४)