तबलिगी जमातच्या इज्तिमासाठी दिलेली अनुमती तात्काळ रहित करून चौकशी करावी !
‘सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्र’चे संयोजक डॉ. सुरेश चव्हाणके यांची मागणी
(इज्तिमा म्हणजे इस्लामिक सभा)
मुंबई – तबलिगी जमातच्या इज्तिमासाठी दिलेली अनुमती तात्काळ रहित करून चौकशी करावी, अशी मागणी सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्रचे संयोजक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले,
१. तबलिगी जमात या संस्थेवर सौदी अरेबिया, उझबेकिस्तान आणि इतर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे; कारण तिच्यावर कट्टरपंथीय विचारसरणी पसरवणे, आतंकवादी विचारधारेचे पोषण करणे आणि अवैध आर्थिक व्यवहार करण्याचे आरोप आहेत. अशी संस्था महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करत आहे, हे अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे.
२. देशात महाराष्ट्राप्रमाणे मोठ्या प्रमाणात इज्तिमा इतरत्र होत नाही. तबलिगी जमातने महाराष्ट्राला इतक्या मोठ्या आयोजनासाठी का निवडले ? यामागे राज्यातील सामाजिक-सांस्कृतिक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न आहे का ? याचे अन्वेषण करायला हवे.
३. इज्तिमाद्वारे बांगलादेश आणि पाकिस्तान येथून मोठ्या संख्येने लोक येणार असल्याचा धोका आहे.
४. कार्यक्रमात सहभागी होणार्या लोकांची पार्श्वभूमी आणि त्यांचे व्हिसा अन् इतर दस्तऐवज पडताळावेत.
५. इज्तिमामुळे घुसखोरी वाढून सामाजिक आणि धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. स्थानिक तरुणांमध्ये कट्टरतेचा प्रसार होईल. महाराष्ट्राच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होईल.
६. तबलिगी जमातच्या महाराष्ट्रातील आयोजनावर बंदी घालण्यासाठी आणि यामागील प्रक्रिया, अधिकारी अन् उद्देश यांची सखोल चौकशी करावी. अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक शांततेस धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जावी.
७. महाराष्ट्राची सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक शांतता टिकवणे हे आपले प्राथमिक दायित्व आहे. इज्तिमामुळे राज्यात घुसखोरी, कट्टरतावाद आणि सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असून यावर तात्काळ कठोर पावले उचलली गेली पाहिजेत. आपल्याकडून त्वरित योग्य ती कारवाई होईल, अशी निश्चिती आहे.