समाजात चार वर्णांची टप्प्याटप्प्याने झालेली निर्मिती, समाजातील ब्राह्मण वर्णाचे स्थान आणि महत्त्व अन् चारही वर्णांमध्ये ब्राह्मणांना धर्माची सर्वाधिक बंधने असण्यामागील कारणे
‘सनातन धर्मामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे ४ वर्ण सांगितलेले आहेत. ‘त्यांची निर्मिती कशी झाली ? समाजातील ब्राह्मण वर्णाचे स्थान आणि महत्त्व काय आहे ? चारही वर्णांमध्ये ब्राह्मणांना धर्माची सर्वाधिक बंधने असण्यामागील कारणे कोणती ?’ यांची उत्तरे देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झाली. ती पुढे दिली आहेत.
१. सत्ययुगाच्या मध्यापर्यंत पृथ्वीवर केवळ ब्राह्मणवर्ण असणे
सत्ययुगाच्या आरंभी सर्व जीव दैवीच होते. ते सर्व सात्त्विक असून सतत ईश्वराच्या अनुसंधानात असायचे. ‘सतत ईश्वरी आनंद अनुभवत जगणे’, हे त्यांचे जीवन होते. त्यांना आध्यात्मिक ज्ञान होते. ते सतत ब्रह्माची अनुभूती घेत होते; म्हणून त्यांना ‘ब्राह्मण’, असे संबोधन प्राप्त झाले. त्या काळातील ब्राह्मणांकडे असलेले ज्ञान हे ईश्वरी, अनुभूतीजन्य आणि भक्तीयुक्त होते.
२. सत्ययुगाच्या मध्यानंतर परिस्थितीनुरूप क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्णांची टप्प्याटप्प्याने निर्मिती होणे
२ अ. ज्ञानी जिवांमध्ये आपापसांत ज्ञानाची तुलना होऊ लागल्याने त्यांच्यातील अहंमध्ये वाढ होणे : सत्ययुगाच्या मध्यानंतर समाजातील लोकसंख्येत हळूहळू वाढ होऊ लागली. त्यात ज्ञानी जिवांमध्ये आपापसांत ज्ञानाची तुलना होऊ लागली. त्यातून एकमेकांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ याची भावना उत्पन्न होऊ लागली. त्यामुळे अशा जिवांमध्ये अहंची निर्मिती झाली. त्यानंतर ज्ञानी जिवांच्या आध्यात्मिक घसरणीला हळूहळू आरंभ झाला.
२ आ. राक्षसांपासून स्वतःचे रक्षण होण्यासाठी ज्ञानी जिवांनी हातात शस्त्र धारण करणे आणि त्यातून ‘क्षत्रिय’ वर्णाला आरंभ होणे : त्या काळी ज्ञानी जिवांकडून काही पापकर्मे झाली. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात पाप लागले. अशा जिवांनी मृत्यूनंतर वाईट शक्तींच्या योनीत प्रवेश केला. त्या ज्ञानी जिवांच्या साधनेत अडथळे निर्माण करू लागल्या. त्यामुळे ज्ञानी जिवांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी मारक साधना करावी लागत होती. त्यांच्यासमोर प्रत्यक्ष राक्षस आल्यावर त्यांना आपल्या हातात शस्त्रे धारण करावी लागत होती. अशा प्रसंगांमुळे काही जीव ज्ञानाच्या स्थितीतून खाली आले आणि त्यातून ‘क्षत्रिय’ वर्णाची निर्मिती झाली.
२ आ १. विविध राज्यांचा साम्राज्य विस्तार होतांना ‘क्षत्रिय’ वर्णाला महत्त्व प्राप्त होणे : कालांतराने हळूहळू लोकसंख्येचा विस्तार वाढू लागला. तेव्हा व्यक्तीचा स्वार्थ आणि अहं यांचे प्रमाण वाढू लागले. त्यातून विविध राज्ये आणि त्यांना सांभाळणारे राजे अन् त्यांच्या सैन्यांची निर्मिती झाली. ‘विविध राज्यांमध्ये होणारे वाद आणि त्यांच्यात सतत होणारी युद्धे’ यांमुळे ‘क्षत्रिय’ वर्णाला महत्त्व प्राप्त झाले.
२ इ. राजाच्या मनातील ‘स्वतःचे राज्य सामर्थ्यशाली व्हावे’, या विचारातून वैश्य वर्णाचा उगम होऊन त्याला महत्त्व प्राप्त होणे : पूर्वीच्या युगात विविध राज्यांची निर्मिती झाली. त्यांचे आपापसांत दळणवळण वाढीस लागले आणि ‘स्वतःचे राज्य सामर्थ्यशाली व्हावे’, असा विचार राजाच्या मनात येऊ लागला. त्यामुळे त्याने राज्याच्या सैन्यबळाच्या समवेत व्यापारालाही प्राधान्य दिले. तेव्हा ब्राह्मण आणि क्षत्रिय यांसमवेत व्यापार करणार्या जिवांना, म्हणजे वैश्यांना महत्त्व प्राप्त झाले.
२ ई. राज्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी शारीरिक श्रम करणार्या जिवांची आवश्यकता निर्माण होणे आणि त्यातून ‘शूद्र’ वर्णाचा उगम होऊन त्याला महत्त्व प्राप्त होणे : विविध राज्यांतील राजांकडे ज्ञानी जीव होते, म्हणजे ‘ब्राह्मण’ वर्ण होता, राज्याचे रक्षण करण्यासाठी सैनिक असल्याने ‘क्षत्रिय’ वर्ण होता. त्यानंतर राज्याचा आर्थिक विकास होण्यासाठी व्यापारी बुद्धी असलेले ‘वैश्य’ वर्णातील जीव सिद्ध झाले; परंतु राज्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी शारीरिक श्रम करणार्या जिवांची आवश्यकता निर्माण झाली. त्यातून ज्या समाजाकडे ज्ञान नाही, शत्रूशी लढण्याचे सामर्थ्य नाही किंवा व्यापारी बुद्धी नाही; परंतु शारीरिक श्रम करण्याची क्षमता आहे. तो समाज ‘शूद्र’ म्हणून गणला जाऊ लागला. या चारही वर्णांना महत्त्व प्राप्त झाले आणि त्यातून समाजव्यवस्था निर्माण झाली.
समाजाला धर्माचे ज्ञान देण्याचे कार्य ब्राह्मणांचे, राज्याचे रक्षण करण्याचे कार्य क्षत्रियांचे, राज्याला धन प्राप्त करून देण्याचे कार्य वैश्यांचे आणि राज्याची शरिराद्वारे यथायोग्य सेवा करण्याचे कार्य शुद्रांचे होते.
३. समाजातील ब्राह्मण वर्णाचे स्थान आणि महत्त्व
३ अ. ब्राह्मणांची सर्वांगीण क्षमता : पूर्वी ब्राह्मणवर्ण अन्य वर्णांच्या तुलनेत सात्त्विक होता. त्याच्याकडे ईश्वरी ज्ञान, विविध धर्मग्रंथ, वेद आणि उपनिषदे, तसेच गूढ विद्यांचे ज्ञानही होते. त्याला धर्म, राज्य, न्याय, शिक्षण, कला इत्यादी विषयांचे परिपूर्ण ज्ञान होते. त्याला साधनेमुळे ईश्वरी ज्ञानही होते. त्यामुळे समाजात ब्राह्मणाला पितृवत स्थान होते. पूर्वी राज्यातील न्यायाधीश, राज्याचे नियम ठरवणारे, राज्यातील जनतेला धर्मशिक्षण देणारे आणि राजाला उपदेश करणारे ब्राह्मणच होते. त्यांच्या या अलौकिक क्षमतेमुळे राज्याच्या केंद्रस्थानी ब्राह्मण होता. ज्या राज्यात उच्च कोटीचा, म्हणजे ज्ञानाची क्षमता असलेला ब्राह्मण आहे, ते राज्य धार्मिक, सामाजिक आणि व्यावहारिक दृष्टींनी प्रगत होते.
३ आ. ब्राह्मणांचा जनतेला मार्गदर्शन करण्याचा केंद्रबिंदू ‘धर्म आणि धर्माचरण’ हा असणे : राज्यातील विविध प्रसंगांविषयी ‘धर्म काय सांगतो ? ईश्वरी संकेत काय आहेत ?’, यांचे ज्ञान ब्राह्मणांना त्यांच्यातील आध्यात्मिक ज्ञानामुळे होत होते. त्यामुळे ब्राह्मणांचा विविध विषयांचा केंद्रबिंदू ‘धर्म’ आणि ‘धर्माचरण’ हा राहिला. ब्राह्मणांनी धर्माला अनुसरून केलेल्या अचूक मार्गदर्शनामुळे राज्याचा राजा आणि त्याची प्रजा दोन्ही आनंदी जीवन जगत होते. पूर्वीच्या काळी समाजाला धर्माचे महत्त्व सांगणारे आणि त्याचे महत्त्व वाढवणारे ब्राह्मणच होते. समाजाला धर्माला अनुसरून दिशादर्शन करणारा आधारस्तंभ ब्राह्मण होता. त्यामुळे समाजात ब्राह्मण समाजाला ‘गुरु’ किंवा ‘ब्राह्मणदेव’ मानले जात होते; कारण त्यांचे कार्यही सर्वांगीण आणि सर्वांच्या हिताचे होते.
४. चारही वर्णांमध्ये ब्राह्मणांना धर्माने सर्वाधिक बंधने सांगण्यामागील कारणे
४ अ. ब्राह्मणाला साधनेमुळे ‘प्रज्ञा’ज्ञान असणे आणि ही क्षमता साधनेच्या अभावी अन्य वर्णांमध्ये अल्प असणे : ब्राह्मणांची साधनेमुळे बुद्धी सात्त्विक आणि शुद्ध होती. त्यामुळे त्याची ‘प्रज्ञा’ जागृत असायची. ब्राह्मणांना ‘धर्माला अनुसरून योग्य काय किंवा अयोग्य काय आहे ?’, यांविषयीचे ज्ञान आणि ईश्वरी ज्ञानही होते. ही क्षमता साधनेच्या अभावी अन्य वर्णांमध्ये अल्प प्रमाणात होती. त्यामुळे समाजाला धर्माला अनुसरून दिशादर्शन देण्याचे उत्तरदायित्व ब्राह्मणांकडे असे.
४ आ. ब्राह्मणांना चुकीमुळे लागणारे पाप अन्य वर्णियांच्या तुलनेत अधिक प्रमाणात असणे : ब्राह्मणांना धर्माला अनुसरून बहुतेक प्रत्येक गोष्टीचे यथायोग्य ज्ञान असते. हे ज्ञान अन्य वर्णांतील जिवांमध्ये अल्प प्रमाणात असते. ब्राह्मणांकडे ज्ञान असूनही त्यांच्याकडून चुका झाल्यास त्यांना अन्य वर्णियांनी केलेल्या चुकांच्या तुलनेत अधिक पाप लागते.
४ इ. अन्य वर्णियांनी केलेल्या चुकीचा परिणाम हा त्या त्या क्षेत्रांवर होत असणे, तर ब्राह्मणांनी केलेल्या चुकीचा परिणाम संपूर्ण समाजावर होत असणे : राज्यात क्षत्रियांनी काही चूक केली, तर ते राज्य तात्पुरते संकटात येते. वैश्यांनी चुकीने केलेल्या व्यापारात हानी झाल्याने राज्याची आर्थिक हानी होते. शुद्रांनी चूक केली, तर त्याचा राज्याच्या प्रगतीवर फारसा परिणाम होत नाही. पूर्वी ब्राह्मणांची साधना आणि आध्यात्मिक क्षमता यांमुळे त्यांना प्रचंड ज्ञान होते. त्यामुळे त्यांना राज्यात महत्त्वाचे स्थान असायचे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार राजा राज्यकारभार करत असे. ब्राह्मणांकडून चूक झाल्यास ती त्या राजाला आणि त्याच्या प्रजेला भोगावी लागत होती.
४ ई. ब्राह्मणांची आध्यात्मिक घसरण, म्हणजे राज्याची सर्वांगीण घसरण असणे : ब्राह्मणांनी साधना किंवा धर्माचरण सोडले, तर त्यांची मोठी आध्यात्मिक हानी होते. अशा ब्राह्मणांचे अनुकरण अन्य लोकांनी केल्यास तेही धर्मापासून दूर जातात. समाज धर्म विसरला की, त्याची नैतिक, सामाजिक, व्यावहारिक आणि आध्यात्मिक अशा सर्व स्तरांवर हानी होते. तसे घडू नये, यासाठी चारही वर्णांमध्ये धर्माने ब्राह्मणांना सर्वाधिक बंधने सांगितलेली आहेत.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.७.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |