शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या वाहनांची पडताळणी आवश्यक !
पालक आणि समाजसेवी संघटनांचा आक्रमक पवित्रा !
पुणे – शहर आणि उपनगरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी ६ सहस्रांहून अधिक वाहने आहेत; मात्र प्रादेशिक परिवहन विभागाने गेल्या वर्षभरात केवळ दीड सहस्र वाहनांची पडताळणी केली असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पालक, तसेच समाजसेवी संघटना यांनी या संदर्भात आक्रमक पवित्रा घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. नागपूर येथील विधानसभा अधिवेशनात भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी खराडी येथील विद्यार्थ्यांच्या बसला लागलेल्या आगीच्या घटनेचा उल्लेख करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला, तसेच बेकायदा वाहने चालवणार्यांवर कठोर कारवाई करून शालेय वाहतूक करणार्या वाहनांचे लेखापरीक्षण करावे, अशी मागणी केली.
पुणे शहरात शालेय वाहतूक करणार्या रिक्षा, व्हॅन, बस अशी अधिकृत ६ सहस्र ३६८ वाहने आहेत. यांपैकी केवळ १ सहस्र ५०३ वाहनांची पडताळणी ‘आर्.टी.ओ.’ने केली आहे. यातील ६०१ वाहने दोषी आढळली आहेत. यामध्ये वाहनांचा परवाना नसणे, वाहनांमध्ये अग्नीशमन यंत्रणा नसणे, मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणे, सी.एन्.जी. तपासणी प्रमाणपत्राचा अभाव अशा अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. अशा वाहनचालकांकडून २१ लाख ७९ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर ४ वाहनचालकांवर न्यायालयीन कारवाई करून त्यांच्याकडून २० सहस्र रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात शाळांची संख्या अधिक आहे. शाळांचे प्रतिनिधी, वाहनचालक आणि वाहनातील मदतनीस ताई यांची वेळोवेळी तपासणी करून त्यांना प्रशिक्षण देणे अनिवार्य आहे; मात्र या संदर्भात कोणतीच कार्यवाही केली जात नाही. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे ‘पेरेंट असोसिएशन’च्या अध्यक्षा जयश्री देशपांडे यांनी सांगितले. वाहनांची पडताळणी केल्यानंतर त्यांना तंदुरुस्त प्रमाणपत्र देण्यात येते. ज्या वाहनांची पडताळणी झाली नाही त्यांची आकडेवारी उपलब्ध असून या वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली.
संपादकीय भूमिका‘आर्.टी.ओ.’च्या दुर्लक्षामुळे वाहन पडताळणी नियमित होत नाही, हे गंभीर आहे. अशा कामचुकार अधिकार्यांना कठोर शिक्षा करायला हवी ! |