भ्रमणभाष हाताळणार्यांनी त्याच्या वापराविषयी पुरेसे ज्ञान घेणे आवश्यक !
काही दिवसांपूर्वी गृहिणी असलेल्या एका महिलेकडून नकळत तिच्या भ्रमणभाषवरील काही बटणे दाबली जाऊन ‘क्लिन ट्रॅश’ नावाचे ‘ॲप’ (प्रणाली) डाऊनलोड झाले. त्यानंतर भ्रमणभाषवर अनेक अनावश्यक संकेतस्थळे दिसू लागली. ती संकेतस्थळे बंद करण्याचा प्रयत्न केला, तरी बंद होत नव्हती, तसेच भ्रमणभाष ‘हँग’ होऊ लागला. भ्रमणभाषमधील ‘मेसेजेस’चे (संदेशाचे) ‘ॲप’ उघडण्याचा प्रयत्न केल्यावर ते न उघडता ‘कुणी तरी तुमचे ॲप उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमची संवेदनशील माहिती ‘गूगल’ने सुरक्षित ठेवली आहे. तुमचा भ्रमणभाष ‘रिसेट’ करून घ्यावा’, असा संदेश दिसू लागला. या संदेशामुळे महिला सतर्क झाल्यावर तिने तज्ञांना भ्रमणभाष दाखवला असता तो ‘हॅक’ झाल्याचे लक्षात आले.
वरील प्रकारच्या घटनांसंदर्भात सर्वांनी सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे लक्षात येते. काही वयोवृद्ध अथवा सामान्य गृहिणी यांना ‘अँड्रॉईड’, ‘आय.ओ.एस्.’ प्रणाली असलेले भ्रमणभाष वापरण्यासंदर्भात पुरेसे ज्ञान नसते. त्यामुळे अनावधानाने भ्रमणभाषची बटणे दाबली जाऊन हानीकारक ‘ॲप’ ‘डाऊनलोड’ होऊन भ्रमणभाषमधील स्वतःची संवेदनशील माहिती, अधिकोषाच्या ‘ॲप’चे पासवर्ड किंवा पिनकोड, छायाचित्रे आदी ‘हॅक’ झाल्यास त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर होऊ शकतो.
१. भ्रमणभाष वापरतांना तो योग्य प्रकारे हाताळण्यासंबंधी माहिती जाणून घ्यावी.
२. कुटुंबातील ज्यांना भ्रमणभाष हाताळण्याचे चांगले ज्ञान आहे, अशांकडून ‘अनावश्यक लिंक कुठे येतात ?’, ‘त्यावर जाणे कसे टाळावे ?’, ‘कोणते ॲप भ्रमणभाषमध्ये आधीपासून असतात ?’, ‘कोणते ॲप डाऊनलोड करावे लागतात ?’, ‘ॲप डाऊनलोड कसे करावे ?’ याची प्राथमिक माहिती करून घ्यावी.
३. भ्रमणभाषचे घातक ‘व्हायरस’पासून (विषाणूंपासून) रक्षण होण्यासाठी ‘अँटीव्हायरस’ घालणे शक्य असल्यास तो घालावा.
४. भ्रमणभाषमधील ‘डेटा’ ‘गूगल ड्राईव्ह’वर कसा संरक्षित करावा ? ‘डेटा’चा ‘बॅकअप’ कसा घ्यावा ? हेही जाणून घ्यावे.
५. वरील प्रकार घडल्यास भ्रमणभाष तात्काळ दुरुस्त करून घ्यावा.