पिंपरी-चिंचवड शहरात रोहिंग्या घुसखोरांच्या अवैध बांधकामांवर बुलडोझर !
याच भागात आतंकवादी यासीन भटकळ रहात असल्याचे उघड !
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – शहरातील कुंदळवाडीत रोहिंग्या घुसखोरांच्या अवैध बांधकामांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर महापालिकेने बुलडोझर चालवण्यास प्रारंभ केला आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पिंपरी-चिंचवड येथे बांगलादेशींच्या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले. कुंदळवाडीत परिसरात रोहिंग्या घुसखोर मोठ्या प्रमाणात अनधिकृत भंगार व्यापार आणि बनावट दस्तऐवज सिद्ध करून देशविरोधी कारवायांना चालना देतात. याच भागात आतंकवादी यासीन भटकळ रहात असल्याचे उघड झाले होते. आता पोलिसांनीही अन्वेषण चालू केले असून परिसरातील मदरशांवरही जिथे या घुसखोरांना आधार दिला जातो, तेथे लक्ष ठेवले जात आहे.
गेल्या २ दिवसांमध्ये चिखली-कुंदळवाडी परिसरातील एकूण १३ सहस्र चौ.मी. आर्.सी.सी. बांधकामे आणि पत्राशेड यांवर कारवाई करण्यात आली. यामधील बहुतांशी भंगार व्यावसायिकांची दुकाने अनधिकृत होती.
महायुतीच्या सत्ताकाळात देशविघातक कृत्यांचे समर्थन नाही ! – महेश लांडगे, भाजप आमदार
पिंपरी-चिंचवडसह देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अवैधपणे वास्तव्य करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना प्रतिबंध करणे काळाची आवश्यकता आहे. विशिष्ट समाजाचे लांगूलचालन करण्यासाठी यापूर्वीच्या काळात राजकीय दबाव निर्माण केला जात होता; मात्र महायुतीच्या सत्ताकाळात कोणत्याही परिस्थितीमध्ये देशविघातक कृत्यांचे समर्थन केले जाणार नाही. अनधिकृत भंगार दुकाने आणि अवैध व्यावसायिक यांवर कारवाईची मोहीम चालू रहाणार आहे.