मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर हाकलून देणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
श्री. देवेंद्र फडणवीस

नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – मुंबईत अवैधरित्या रहाणार्‍या बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याचे काम चालू करण्यात आले आहे. बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर हाकलून देण्यात येणार आहे. ही सरकारची भूमिका आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांसह अन्य मंत्री उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो अभियानामध्ये सहभागी असलेल्या १८० संघटनांतील काही संघटना अर्बन नक्षलवादाशी संबंधित आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असतांना वर्ष २०१०, वर्ष २०११, वर्ष २०१३ आणि वर्ष २०१४ मध्ये या संघटना अर्बन नक्षलवादी असल्याची माहिती केंद्र सरकारला पाठवण्यात आली होती. संतोष देशमुख हत्याप्रकरणी पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही.’’

खातेवाटपाविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मंत्र्यांचे खातेवाटप लवकरच होईल. ते २१ डिसेंबरच्या रात्री किंवा २२ डिसेंबर या दिवशी सकाळीही होऊ शकते.’’