सावधान, ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात अडकू नका !
सध्या ‘डिजिटल अरेस्ट’ची (आभासी अटकेची) नवनवीन धोकादायक प्रकरणे उघडकीस येत आहे. या नव्या प्रकारामुळे इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये थोडे चिंतेचे वातावरणही आहे. काही जणांनी त्याचा अनुभव घेतला आहे, काहींना ऐकून माहिती आहे. या प्रकाराविषयी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाष्य केले आहे. या विषयाचे जाणकार काही ना काही काळजी घेण्यास सांगत आहेत. एकूणच याविषयी जागृती निर्माण होत आहे, हा चांगला भाग आहे.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/863546.html
गृहमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडून साहाय्य१. घाबरून न जाता, आलेल्या संपर्काचे ‘रेकॉर्डिंग’ करा किंवा ‘स्क्रीन रेकॉर्डिंग’ करा. २. कोणतीही अधिकृत शासकीय संस्था नागरिकांना कधीही धमकावत नाही, हे लक्षात घ्या. (म्हणजे धमकावणारे पोलीस, अन्वेषण अधिकारी हे बनावट (खोटे) असू शकतात, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे.) ३. ‘नॅशनल सायबर हेल्पलाईन’वर संपर्क करा आणि पोलिसांना तात्काळ सूचित करा. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे फसवणुकीच्या या नवनव्या आणि काही सूक्ष्म स्तरावरील गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी मन, बुद्धी भानावर ठेवण्यासह साधनेचे कवच व्यक्तीभोवती हवे. वरील प्रकारात समाजातील बुद्धीवादी म्हणवले जाणार्या व्यक्तीही फसल्या, तर सामान्यांची काय कथा, असे वाटेल; मात्र देवाचे साहाय्य मिळाल्यास कुणाच्या तरी कुणाच्या माध्यमातून सतर्कता निर्माण होईल, आलेले अज्ञात क्रमांक उचलण्याची बुद्धी होणार नाही; कुठे संपर्क झाल्यास, तो मध्येच ‘कट’ (बंद) करण्याचे भान राहील, अशी कुठल्याही प्रकारे देवाचे साहाय्य मिळतेच. तेव्हा या नव्या संकटापासून सुरक्षित राहूया, हीच सदिच्छा ! – श्री. यज्ञेश सावंत |
१. ‘डिजिटल अरेस्ट’चे स्वरूप
१५ डिसेंबर २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या ‘ऑनलाईन फसवणुकीविषयी सावध व्हा !’, या लेखात काही ऑनलाईन गैरप्रकारांविषयी जाणून घेतले होते. त्यातील काही प्रकार हे ‘डिजिटल अरेस्ट’चे प्राथमिक भागच आहेत. ऑनलाईनद्वारे वाढत गेलेल्या गैरप्रकारांची पुढची व्यापक आवृत्ती, म्हणजे ‘डिजिटल अरेस्ट’ आहे. प्रथम तुम्हाला एक ‘आय्.व्ही.आर्. कॉल’ (ध्वनीमुद्रण केलेला व्यक्तीचा संपर्क) येतो अथवा अनोळखी व्यक्ती संपर्क करते. त्या संपर्कातही काही ठराविक संदेश असतो, उदा. ‘तुमचे ‘कुरिअर’ सापडले आहे. कुरिअरमध्ये प्रतिबंधित अमली पदार्थ आढळला आहे. त्यासाठी २-३ वर्षे कारावासाची शिक्षा आहे.’
दुसर्या प्रकारात ‘तुमच्या भ्रमणभाषद्वारे काही चुकीचे संदेश गेले आहेत’ किंवा ‘तुमच्या भ्रमणभाष अमली पदार्थ तस्करीसाठी आणि काही गुन्ह्यांसाठी वापरला गेला आहे. त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. यासाठी अमुक एवढी शिक्षा आहे. या गुन्ह्याचा तुम्हीही भाग बनू शकता; मात्र मी तुम्हाला यातून बाहेर पडण्यास साहाय्य करीन’, अशा स्वरूपाचे संभाषण प्राथमिक संपर्कात असते.
असे संपर्क आल्यामुळे व्यक्ती काही प्रमाणात गोंधळून जाते, काही प्रमाणात घाबरते, काही प्रमाणात चिंतातूर होते किंवा काळजी लागून रहाते. आपल्याकडून असे कसे झाले आणि काही कळले कसे नाही ?, अशा अनेक प्रश्नांनी व्यक्तीच्या मनात काहूर माजते.
२. ‘डिजिटल अरेस्ट’ कुणामुळे होते ?
‘डिजिटल अरेस्ट’साठी किंवा स्वत:ची माहिती घोषित करून या प्रकारात अडकण्यासाठी कोण उत्तरदायी आहे ? याचे उत्तर आहे आपण स्वत:च ! आता कसे ते पाहूया. वर दिलेल्या २ उदाहरणांमध्ये जेव्हा समोरील संपर्क करणारी फसवणारी व्यक्ती विचारते की, ‘तुमच्या कुरिअरमध्ये काही अडचण आहे, तुमच्या संपर्क क्रमांकाचा उपयोग गुन्हे करण्यासाठी केला गेला आहे’, असे सांगितल्यावर आपण त्वरित दडपणाखाली येतो आणि स्वत:च नेमकी काय गडबड झाली आहे ? याविषयी काय करावे ?, असे विचारतो. फसवणारी व्यक्ती याचीच वाट पहात असते. ती आपल्याला ‘काही काळजी करू नका. मी तुम्हाला साहाय्य करतो…..’ आणि त्यापुढे तिने फसवण्याचे जे नियोजन केलेले असते, तसे ती सांगू लागते. त्यात एक अट घातली जाते, ‘संपर्क (कॉल) ‘कट’ (बंद) करू नका, कुणालाही आपल्या संपर्काविषयी सांगू नका.’ येथेच आपली फसगत होते. त्या वेळी फसवणारी व्यक्ती पुढच्या पुढच्या अन्य व्यक्तीला जोडत जाते आणि एका मोठ्या जाळ्यात आपण अडकून जातो.
स्वत:ला अधिकोषाकडून माहितीपर किंवा सावधगिरी बाळगण्याविषयी आलेल्या संदेशातच दिलेली ‘लिंक’ ‘क्लिक’ केल्यानंतर, पुढची माहिती उदा. आपला खाते क्रमांक, ए.टी.एम्. कार्डचा क्रमांक भरणे.
म्हणजे ऑनलाईन कॉल, ॲपमधून कॉल, काही बनावट ‘लिंक्स’ यांमधून आपली माहिती मिळालेली नसते, तर त्यांचे एक जाळे असते, त्यात फसून नंतर मग आपण आपली माहिती देत जातो आणि या जाळ्यात फसतो. काही माहिती उदा. आधारकार्डचा क्रमांक ही फसवणार्यांनी आधीच मिळवलेला असतो. या ठिकाणी कितीही ‘अँटीव्हायरस’ संगणकीय प्रणाली, ‘स्पायव्हेअर’ लावले, ‘व्हायरस’चे आक्रमण होऊ नये, ‘फिशिंग अटॅक’ होऊ नये; म्हणून व्यवस्था केली, तरी मूळ दोष व्यक्तीचा असल्याने त्याचा लाभ होत नाही. घाबरलेली, गोंधळलेली आपली स्थितीच हे ‘डिजिटल अरेस्ट’चे, आपली माहिती गुन्हेगारांना मिळण्याचे माध्यम बनते किंवा आपण जाळ्यात फसतो.
३. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीकडून षड्यंत्रातील अनेक बारकावे उघड
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला आलेल्या एका संपर्काचे वाहिनीने ध्वनीचित्रमुद्रण केले आणि ती क्लिप ‘ऑपरेशन डिजिटल अरेस्ट’, हा कार्यक्रम घेऊन त्यात दाखवली. त्यामध्ये पत्रकाराला समोरील संपर्क करणारी व्यक्ती ‘तुमच्या नावे असलेल्या कुरिअरमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू आहेत, तेव्हा सावध व्हा. तुम्ही संपर्क चालू ठेवा. तुम्हाला मुंबई पोलीस संपर्क करतील’, असे बोलल्यावर ती व्यक्ती संपर्क ठेवते आणि पोलिसाचा पोशाख घातलेली एक व्यक्ती व्हिडिओ कॉल करते. पोलीस व्यक्ती पत्रकाराला वारंवार धमकावून, घाबरवून सोडून त्याने गुन्हा केला आहे, हे ठसवण्याचा प्रयत्न करते. या वेळी पोलिसांचा पोशाख घातलेली व्यक्ती ‘तुम्हाला या प्रकाराविषयी माहिती नाही’, असे तुम्ही म्हणू शकत नाही. हा तुमचाच क्रमांक आहे. या आक्षेपार्ह वस्तू सापडल्याविषयी २ ते ३ वर्षे कारावासाची शिक्षा आहे. हे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या स्तरावरील प्रकरण आहे. वरचे साहेब तुमच्याशी बोलतील’, असे सांगते. मुख्य म्हणजे ‘व्हिडिओ कॉल’वर फसवणूक करणारी व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात बोलत असल्याचे दिसते, म्हणजेच फसवणूक करणार्या या टोळीने बनावट पोलीस, बनावट केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी सिद्ध केलेले असतात आणि एवढ्या बिनधास्तपणे हे काळे धंदे चालू असतात. आपण घाबरत जातो आणि पुढचे पुढचे संपर्क घेत जातो. पोलीस, अन्वेषण यंत्रणा यांचा धाक किती न्यून झाला आहे, हे या फसवणुकीचे उदाहरण आहे. एवढी मोठी यंत्रणा हे भामटे उभारू शकतात, सहजतेने व्हिडिओ संपर्क करून लोकांना कित्येक घंटे अडकवू शकतात, तरी त्यांना पकडले जाऊ, याची भीती नाही. यातून या मागे राष्ट्रीय स्तरावर टोळी कार्यरत असल्याचे दिसते.
आता आपण न केलेल्या या तथाकथित गुन्ह्यासाठी शिक्षा काय असते, ते फसवणूक करणारी व्यक्ती सांगते. शिक्षासुद्धा आपण निवडायची असते. प्रत्यक्ष अटक किंवा ‘डिजिटल अरेस्ट’ साहजिकच काही मानहानी होण्याऐवजी ‘डिजिटल अरेस्ट’चाच पर्याय निवडला जातो. या कालावधीत फसवणारी व्यक्ती आपल्याकडून बँकेच्या खात्याचा तपशील, आपली व्यक्तीगत माहिती, कुटुंबाची माहिती गोळा करते. लाखो रुपयांचा दंड भरण्यास सांगते.
४. महिलांविषयी गंभीर गुन्हे
पवई, अंधेरी (पूर्व) येथील ३६ वर्षीय अधिवक्ता महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली कह्यात घेऊन डांबून ठेवण्यात आले. तिचे कपडे काढण्यास सांगून तिची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन ७ लाख रुपये उकळण्यात आले. अंधेरी येथील दुसर्या घटनेत एका तरुणीला केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी असल्याची बतावणी करून ‘तुमच्याकडून गुन्हा घडला आहे’, असे सांगून तिची ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आली, तिलाही तिचे कपडे काढण्यास सांगून तिची छायाचित्रे सामाजिक माध्यमांत प्रसारित करण्याची धमकी देऊन २ लाख रुपये देण्यास सांगण्यात आले. तरुणीने नकार दिल्यावर तिची छायाचित्रे सामाजिक माध्यमांत पाठवण्यात आली, तेव्हा त्या तरुणीने पैसे दिले; मात्र नंतर अधिक पैशांची मागणी केल्यावर तिने अंधेरी पोलिसांकडे तक्रार केली. महिला अधिवक्त्या, प्राध्यापक, अभियंता यांच्या संदर्भात असे प्रकार घडत मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
५. ‘आज तक’च्या महिला पत्रकार रिचा मिश्रा यांचा अनुभव
‘आज तक’च्या रिचा मिश्रा स्वत: एक पत्रकार असूनही त्यांना आलेल्या संपर्कात त्यांचे आधारकार्ड एका कुरिअरच्या पार्सलसाठी वापरले गेले. ज्या पार्सलमध्ये एक अमली पदार्थ सापडल्याचे संबंधित फसवणूक करणार्यांकडून सांगण्यात आले. यामध्ये खोटे मुंबई पोलीस कर्मचारी आणि त्यांचे वरिष्ठ असे एकूण दीड घंटा त्यांच्या संपर्कात होते. त्यामध्ये त्यांनी ‘महत्त्वाची चौकशी करायची आहे, तुम्ही घरात एकट्या आहात ना ?’, असे विचारून घरातील पूर्ण खोली दाखवण्यास सांगितली, मुख्य दरवाजा आणि खिडक्या पडद्यांसह पूर्ण बंद करण्यास सांगितले.
याविषयी रिचा मिश्रा यांनी सांगितले की, प्रारंभी त्यांचा फसवणार्या व्यक्तीच्या म्हणण्यावर विश्वास बसत नव्हता; मात्र त्यांनी संपर्कात अशा प्रकारे वातावरण निर्मिती केली, एवढ्या शांतपणे गुन्ह्याविषयी माहिती सांगितली की, त्या स्वत: एक प्रकारे संमोहित झाल्या. त्या स्वत: एवढ्या बुद्धीवादी असूनही त्यांचे स्वत:वर नियंत्रण राहिले नाही. संबंधितांनी त्यांचा संपर्क ठेवल्यावर रिचा यांना स्वत:कडून पुष्कळ मोठा गुन्हा घडला आहे, असेच वाटत होते. त्यांनी नंतर स्वत:ची या गुन्ह्यामुळे अपकीर्ती होऊ नये; म्हणून त्यांची आई, भाऊ आणि वृत्तवाहिनीचे संपादक यांना कळवले. त्या सर्वांनीच रिचा यांना ‘तुम्ही फसवल्या गेल्या आहात, हे सर्व खोटे आहे’, असे सांगत असूनही रिचा यांना त्यांचे म्हणणे पटत नव्हते. शेवटी एका टप्प्याला संपादकांनी त्यांना स्पष्टपणे सांगितल्यावर त्या भानावर आल्या आणि त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यावर ३८ घंट्यांनी त्यांच्या तक्रारीची नोंद पोलिसांनी केली. त्यांचे म्हणणेही पोलीस विशेष मनावर घेत नव्हते. पोलिसांना हे प्रकरण सामान्य फसवणुकीचे वाटत होते, त्यांनाही ‘येथे तक्रार करू नका. वेगळीकडे तक्रार करा’, असे काही पोलिसांनी सांगितले.
६. अन्य एक अनुभव
विदेशातून एका व्यक्तीच्या मित्राने तिला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पाठवली. तेव्हा त्या व्यक्तीच्या भ्रमणभाषवर ४-५ दिवसांनी ‘कस्टम डिपार्टमेंट’ने (सीमा शुल्क विभागाने) ‘तुमच्याविषयी काही चुकीच्या गोष्टी लक्षात आल्या आहेत. तुम्हाला आवश्यकतेनुसार संपर्क करू’, असा संदेश आला. हा संदेश २ वेळा आला, तेव्हा व्यक्तीने तिच्या विदेशातील मित्राला संपर्क करून या संदेशाविषयी विचारले. तेव्हा मित्राने ‘कस्टम डिपार्टमेंट’चा काही संबंधच नाही. हा ‘फेक’ (खोटा) संदेश असणार, त्याकडे दुर्लक्ष कर’, असे सांगितले. त्यानुसार व्यक्तीने त्या संदेशांकडे दुर्लक्ष केले. यातून व्यक्तींच्या हालचाली, त्यांचे साहित्य मागवणे, याकडे या ऑनलाईन फसवणूक करणार्यांचे किती बारीक लक्ष असते, हे लक्षात येते.
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१६.१२.२०२४)