लग्नाचे वर्‍हाड घेऊन जाणार्‍या बसचा ताम्हिणी घाटामध्ये अपघात

ताम्हिणी घाटामध्ये अपघातग्रस्त बस

पुणे – चर्‍होली येथील स्वप्नील जाधव यांचा विवाह काठिवाडे येथे होणार होता. विवाह सोहळ्यासाठी चर्‍होली येथून वर्‍हाड घेऊन खासगी बस जात होती. ताम्हिणी घाटात बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातांमध्ये नवरदेवाची आई संगीता जाधव यांच्यासह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. २५ जण घायाळ झाले असून त्यातील ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

अपघातामध्ये मृत्यू झालेले जाधव यांचे जवळचे नातेवाईक आहेत. लग्नामध्ये अडचण येऊ नये; म्हणून नातेवाइकांनी विवाह विधी पार पाडले. विवाहातील सर्व विधी संपल्यानंतर रात्री अपघाताचे वृत्त सर्वांना सांगण्यात आले. ताम्हिणी घाटातील बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येईल, अशी घोेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.