मांजरी (पुणे) येथील मान्यता नसलेल्या शाळेवर गुन्हा नोंद करण्याचे जिल्हा परिषदेचे आदेश !
पुणे – मान्यता नसतांनाही चालू असणार्या मांजरी येथील ‘मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल’वर तात्काळ गुन्हा नोंद करा, असा आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी हवेलीच्या गटशिक्षणाधिकार्यांना दिला आहे. या शाळेविषयी तक्रारी आल्या होत्या, तसेच शाळेच्या मान्यतेची कागदपत्रे ही बनावट असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शाळेच्या व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांना मारहाण करणे, विद्यार्थ्यांच्या शुल्कासाठी आर्थिक पिळवणूक करणे, कागदपत्रे बनावट आहेत, अशा तक्रारी शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या होत्या. या सर्व प्रकारांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गंभीर नोंद घेऊन गुन्हा नोंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात संबंधित शाळेला विचारणा केली असता त्यांनी शाळेला शिक्षण उपसंचालकांची मान्यता असल्याची कागदपत्रे दाखवली. या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. प्रथम दर्शनी या शाळेची कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात आले. त्यानंतर शिक्षण विभागाने संबंधित शाळेला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली. १५ दिवसांमध्ये शाळेची मूळ कागदपत्रे मंत्रालयामधून प्राप्त करून सादर करण्याचे निर्देश देण्यात आले; मात्र १५ दिवसांच्या मुदतीनंतरही शाळेने कागदपत्रे सादर केली नाहीत.
संपादकीय भूमिकामान्यता नसतांना शाळा कशी चालू होते ? याच्या मुळाशी जाऊन कठोर उपाययोजना करणे आवश्यक ! |