श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भात दैवी प्रचीती देणारे प्रसंग !
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकाला घरी येण्याचे दिलेले वचन त्यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पूर्ण करणे
‘एकदा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ तेलंगाणा येथील वारंगल शहरात असलेल्या श्री भद्रकालीदेवीचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. तेथे सनातनचे एक जुने साधक श्री. मुकुंद जाखोटिया श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना भेटायला आले होते. ते वारंगल येथेच रहातात. नाडीपट्टीच्या वाचनात सांगितल्याप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी श्री भद्रकालीदेवीचे दर्शन घेतले, तसेच हवन आणि प्रार्थनाही केली. त्यानंतर त्या भाग्यनगरला जाण्यासाठी निघाल्या.
थोडे अंतर गेल्यानंतर अकस्मात् श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘गाडी मागे वळवा. आपण श्री. मुकुंद जाखोटिया यांच्या घरी जाऊन येऊया.’’ हे ऐकून आम्हा सर्वांना आश्चर्य वाटले. आम्ही सर्वजण श्री. जाखोटिया यांच्या घरी गेलो. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘आज गुरूंचे वाक्य सत्य झाले. जेव्हा आम्ही सांगली येथे रहात होतो, तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला सांगितले होते, ‘‘मी तुमच्या घरी निश्चित येणार आहे !’’ आज आपल्या आगमनाने ते वाक्य सत्य झाले आहे.’’ हे ऐकून श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘मला अकस्मात् तुमच्या घरी जाण्याचा विचार का आला ?’, हे मला आता समजले !’’ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकाला वचन दिले होते. ते त्यांनी अशा प्रकारे पूर्ण करून घेतले. हा गुरुमहिमा आम्ही सर्व साधकांनी प्रत्यक्ष अनुभवला.
२. ‘भृगु नाडीपट्टी’चे वाचन करणार्या व्यक्तीच्या गुरूंनी सूक्ष्मातून ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या साक्षात् शबरीमातेचा अंश असून त्यांचा योग्य प्रकारे मानसन्मान करा’, असे सांगणे
एकदा भक्तीसत्संगात शबरीमातेविषयी वर्णन करण्यात आले होते. ‘शबरीने तिच्या बालपणापासून ते अखेरपर्यंत संत आणि गुरु यांची सेवा कशा प्रकारे केली; तिने किती अपार कष्ट घेतले होते; तिचा भाव कसा होता ?’, याविषयी मी घरी असतांना भक्तीसत्संगात ऐकले होते. त्याच्या दुसर्याच दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आमच्या घरी आल्या. त्यांच्याशी बोलतांना मी भक्तीसत्संगात झालेला शबरीचा विषय सांगितला. त्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी एक प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, ‘‘जेव्हा मी पहिल्यांदाच ‘भृगु नाडीपट्टीचे वाचन’ करणार्या व्यक्तीकडे गेले होते, तेव्हा तेथे पुष्कळ जण आले होते. श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे) यांनी त्यांना माझा परिचय करून दिला. थोड्याच वेळाने जी व्यक्ती भृगु नाडीवाचन करत होती, तिला त्यांच्या गुरूंनी सूक्ष्मातून सांगितले, ‘तुमच्या समोर ज्या बसल्या आहेत, त्या कुणी सामान्य व्यक्ती नाहीत. त्या साक्षात् शबरीचा अंश आहेत. तुम्ही जेथे बसला आहात, तेथून उठा आणि तुमच्या समोर बसलेल्या व्यक्तीला (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना) तुमच्या स्थानावर बसवा. त्यांचा योग्य प्रकारे मानसन्मान करा.’ त्यानंतर नाडीवाचन करणार्या व्यक्तीने उठून मला नमस्कार केला आणि ती व्यक्ती मला आत घेऊन गेली.’’
यावरून ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या साक्षात् शबरीमातेचा अंश आहेत’, हे आमच्या लक्षात येऊन आम्हा सर्वांचा भाव जागृत झाला.
एकदा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितले होते, ‘‘जेव्हा श्रीराम आणि शबरीमाता यांची भेट झाली, तेव्हा श्रीरामाने सांगितले, ‘रावणाला तर हनुमान किंवा लक्ष्मण कुणीही मारू शकत होते. मी केवळ आणि केवळ आपल्याला (शबरीमातेला) भेटायला येथे आलो आहे.’’
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची भक्तीही शबरीसारखीच आहे. त्यांच्यासारख्या सद्गुरु आम्हाला लाभल्या. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. चेतन गाडी, भाग्यनगर, तेलंगाणा. (५.१२.२०२४)
|