मुंबई येथील स्वयं पुनर्विकास गृहनिर्माण प्रकल्पांना राज्यशासनाने ताकद द्यावी !
भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांची मागणी
नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – मुंबई येथील स्वयं पुनर्विकास गृहनिर्माण प्रकल्पांना राज्यशासनाने ताकद द्यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी २० डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत केली. विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर ते बोलत होते.
ते म्हणाले की, मुंबई येथे मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण संस्थांचे स्वयं पुनर्विकास होते. वास्तुविशारदाऐवजी गृहनिर्माण संस्था स्वतः विकासासाठी पुढे आल्या, तर त्यांना अधिकची जागा मिळते. विनाविलंब ३-४ वर्षांत इमारत उभी रहाते. मुंबई येथे अशा प्रकारे १२ इमारती आम्ही उभ्या केल्या असून ४०० स्क्वेअर फुटांची जागा असणार्यांना ८०० स्क्वेअर फुटांची घरे मिळाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला राजाश्रय दिला. जवळपास १७ गृहनिर्माणचे निर्णय घेतले. मुंबई जिल्हा बँकेकडे १ सहस्र ६०० प्रस्ताव आले असून ३६ कर्जे दिली आहेत; परंतु मोठी योजना येण्यास मर्यादा आहे. राज्य सहकारी बँकेला मर्यादा आहेत. एन्.सी.बी.सी. किंवा राज्यशासनाने ‘गृहनिर्माण फायनान्स कॉर्पोरेशन’साठी मोठे प्रावधान करावे आणि मुंबई येथील जे स्वयं पुनर्विकास गृहनिर्माणचे प्रकल्प आहेत, त्यांना ताकद द्यावी. येणार्या काळात ‘गृहनिर्माण डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन’ सक्षम करावे आणि त्यांना या प्रकल्पासाठी पैसे देण्याचे प्रावधान करावे, अशी मागणी त्यांनी केली.