श्री देव रामेश्वराने कौल दिला आणि आचरावासीय गावात परतले !

आचरा गावच्या ऐतिहासिक ‘गावपळण’ची सांगता

मालवण – तालुक्यातील संस्थानकालीन आचरा गावच्या ‘गावपळण’चा प्रारंभ १५ डिसेंबर या दिवशी झाला होता. ३ दिवस आणि ३ रात्री पूर्ण झाल्यावर गावात परत येण्यासाठी १८ डिसेंबर या दिवशी दुपारी श्री देव रामेश्वराला कौल लावण्यात आला; मात्र श्री देव रामेश्वराने गाव न भरण्याच्या बाजूने कौल दिल्याने आचरावासियांचा गावात येण्याचा कालावधी १ दिवसाने वाढला होता. १९ डिसेंबरला गावात परतण्यासाठी श्री देव रामेश्वराने कौल दिल्यानंतर या गावपळणीची सांगता झाली आणि ग्रामस्थ पुन्हा गावात परतले. त्यामुळे ४ दिवस शांत असलेला आचरे गाव पुन्हा गजबजला.

१५ डिसेंबर या दिवशी दुपारी श्री देव रामेश्वराने कौल दिल्यानंतर आचरेवासीय गुरे, पाळीव प्राणी, संसारोपयोगी साहित्य समवेत घेऊन आणि घरेदारे बंद करून सहकुटुंब गावपळणीच्या निमित्ताने आचरा गावच्या सीमेबाहेर गेले होते. या कालावधीत ग्रामस्थ गावाच्या सीमेच्या बाहेर पारवाडी नदीकिनारी, आडबंदर, वायंगणी माळरान, सडेवाडी-चिंदर आदी विविध ठिकाणी उभारलेल्या राहुट्यांमध्ये (राहुट्या म्हणजे निवासाची तात्पुरती व्यवस्था) निसर्गाच्या सान्निध्यात रहात होते. या कालावधीत भजन, पूजन, गप्पा, खेळ यांमध्ये ग्रामस्थ रमले होते.

‘आचरा गावपळण ही श्री देव रामेश्वरावर असलेल्या श्रद्धेपोटी आम्ही करत आहोत. देवाने आमचे पूर्ण दायित्व घेतल्याने गावपळण परंपरेच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही’, असे ग्रामस्थांनी सांगितले.

या कालावधीत पोलिसांनीही चांगले सहकार्य केले. आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रातून पथके सिद्ध करून ग्रामस्थ वास्तव्याला असलेल्या ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवण्यात आली. या अनोख्या परंपरेविषयी जाणून घेण्यासाठी, तसेच ग्रामस्थांची विचारपूस करण्यासाठी तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी ग्रामस्थ वास्तव्यास असलेल्या ठिकाणी भेट दिली, तसेच ‘ग्रामस्थांना काही समस्या आहेत का ?’ हे जाणून घेतले. श्री देव रामेश्वर देवस्थानचे सचिव संतोष मिराषी आणि खजिनदार कपिल गुरव यांनी या प्रथेविषयी तहसीलदारांना माहिती दिली.