‘धर्मजागरण ट्रस्ट’च्या वतीने २० ते २९ डिसेंबर या कालावधीत ‘श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रा’ !
कोल्हापूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्तीच्या डोंगरावर श्री रेणुकामातेची यात्रा होते. अनेक भाविकांना यात इच्छा असूनही सहभागी होता येत नाही. अशा भक्त-भाविक यांच्यासाठी ‘धर्मजागरण ट्रस्ट’च्या वतीने २० ते २९ डिसेंबर या कालावधीत ‘श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रे’चे आयोजन केले आहे. यात्रेमध्ये असणार्या रथात देवीची अलंकारिक वस्त्रे, परशुराम कुंडातील जल, टाक आणि तीर्थ यांचा कलश असणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने श्री रेणुकामाता भक्तांच्या घरी येणार आहे. या निमित्ताने सर्व भागांत मातेच्या भक्ताचा जागर करण्याची संधी भाविकांना उपलब्ध झाली आहे, अशी माहिती ‘धर्मजागरण ट्रस्ट’च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला रथयात्रेचे जिल्हा संयोजक चंद्रकांत शिंदे, सहसंयोजक संतोष पाटील, सनतकुमार दायमा, प्रमोद पावले, रवी मिसाळ, प्रणव भिवसे, माधव कुंभोजकर, सचिन पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. सनतकुमार दायमा म्हणाले, ‘‘कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच अशी यात्रा होत असून रथयात्रेचा शुभारंभ २० डिसेंबरला सकाळी १०.३० वाजता करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातून होणार आहे. यानंतर ही यात्रा ७४ गावांमध्ये जाईल. रथयात्रेचा समारोप इचलकरंजी येथील खवरे मैदानावर २९ डिसेंबर या दिवशी ५.३० वाजता होईल. त्याआधी इचलकरंजी शहरात महिलांची कलश यात्राही निघणार आहे. यात्रेच्या समारोपाप्रसंगी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी, ह.भ.प. शिरीष महाराज मोरे, योगी संतोष उपाख्य सद्गुरु बाळ महाराज, प.पू. दादा महाराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.’’