सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात साधकांना केलेले मार्गदर्शन

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. समष्टी साधनेचे महत्त्व ! 

‘व्यष्टी आणि समष्टी साधनेमध्ये ‘समष्टी साधना’ अधिक महत्त्वाची आहे ! ‘व्यष्टी साधना’ म्हणजे स्वतःची उन्नती व्हावी; म्हणून सर्व प्रयत्न करायचे, तर ‘समष्टी साधना’ म्हणजे इतरांनाही आपल्या समवेत साधनेत न्यायचे. पूर्वीच्या काळी ऋषिमुनी ५०० ते १००० वर्षे ध्यान लावून बसायचे. स्वतःची प्रगती व्हावी, ईश्वर दिसावा आणि त्याच्याशी एकरूप होता यावे; म्हणून ते ध्यान लावायचे. येथे समाजाचा विचार केला जात नसे. याउलट ‘समष्टी साधने’मध्ये ‘माझे काहीही झाले’, तरी चालेल; पण मी अधिकाधिक लोकांना साधना शिकवणार आणि त्यांची प्रगती करून घेणार’, अशी तळमळ असते.

२. साधकांनी घरी नाही, तर आश्रमात राहिल्यास त्यांचे मन, बुद्धी आणि अंतर्मन यांचा लय होऊन साधनेत प्रगती होऊ लागते ! 

साधनेत स्वतःच्या मनाने काही ठरवायचे नसते. मन, बुद्धी आणि अंतर्मन यांचा लय झाला की, साधक विश्वमनाशी एकरूप होतो. त्या वेळी ‘योग्य-अयोग्य काय ?’, हे ईश्वरच साधकाला सांगतो आणि त्याच्याकडून योग्य कृती करून घेतो. साधकांनी कुठलाही निर्णय स्वतः न घेता इतरांना विचारून घ्यायला हवा ! आश्रमात उत्तरदायी साधक जे सांगतात, त्यांचे सर्वजण ऐकतात. हे मनोलय होण्याचे माध्यम आहे. घरी एकटे राहिलो, तर मनोलय कधीच होत नाही; कारण प्रत्येक गोष्ट आपण मनानेच करतो.

घरी ‘सकाळी उठायचे कधी ? खायचे काय ?’ हे सर्व आपण आपल्या मनाने ठरवतो. त्यामुळे घरी एकट्याने राहून काही उपयोग होत नाही. ‘आश्रमात रहाणे’ हे शाळेसारखेच असते. तेथे आपण शिकतो आणि सर्व शिकलो की, दुसर्‍यांनाही शिकवतो.’