रशियामध्ये बंदी असणार्या आतंकवादी संघटनांना सूचीतून वगळण्याचा कायदा संमत
तालिबान आणि सीरियातील ‘हयात तहरीर अल-शाम’ यांना सूचीतून बाहेर काढण्याची शक्यता !
मॉस्को (रशिया) – रशियाच्या संसदेने न्यायालयांना आतंकवादी संघटनांच्या सूचीतून कोणत्याही संघटनेला वगळण्याचा अधिकार देणारा कायदा संमत केला आहे. यामुळे रशियाला अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार आणि सीरियातील बंडखोर गट हयात तहरीर अल-शाम (एच्.टी.एस्.) यांच्याशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणे शक्य होणार आहे. सध्या या दोन्ही संघटना आतंकवादी म्हणून सूचित समाविष्ट असल्याने रशियाला त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करता येत नाहीत. रशियाने वर्ष २००३ मध्ये तालिबान आणि वर्ष २०२० मध्ये एच्.टी.एस्. यांचा आतंकवादी संघटनांच्या सूचीमध्ये समावेश केला होता.
ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता मिळवल्यानंतर अद्याप कोणत्याही देशाने तालिबान सरकारला औपचारिक मान्यता दिलेली नाही; मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी यावर्षी जुलैमध्ये तालिबानला आतंकवादाच्या विरोधातील लढ्यात रशियाचा मित्र असल्याचे म्हटले होते.