यंदा ३ सहस्र ५०० लालपरी बसगाड्या एस्.टी.च्या ताफ्यात भरती होतील !

मंत्री भरतशेठ गोगावले यांची घोषणा

मंत्री भरतशेठ गोगावले

नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष २०२५ मध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने अनुमाने ३ सहस्र ५०० नवीन साध्या लालपरी बसगाड्या राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भरती करण्यात येतील, अशी घोषणा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. या वेळी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर अन् सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, सध्या राज्य परिवहन महामंडळाकडे बसगाड्यांची प्रचंड कमतरता आहे. ‘एस्.टी.’च्या ताफ्यामध्ये आता १४ सहस्र बसेस असून कोरोना महामारीपूर्वी म्हणजे वर्ष २०१८ मध्ये परिवहन महामंडळाकडे तब्बल १८ सहस्र बसगाड्या होत्या; परंतु गेल्या ३-४ वर्षांत कोरोना महामारी आणि इतर काही कारणांमुळे महामंडळाला नव्या बसेस खरेदी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ताफ्यात असलेल्या अनेक बसगाड्या जुन्या झाल्यामुळे त्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. बसगाड्या अल्प असल्याने प्रवाशांना अतिरिक्त बस फेर्‍या देणे शक्य होईना. याचा विचार करून महामंडळाने स्वमालकीच्या २ सहस्र २०० बसगाड्या खरेदी करण्याचा अन् १ सहस्र ३०० बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बसगाड्या जानेवारीपासून महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट व्हायला प्रारंभ होईल. त्यामुळे नवीन वर्षामध्ये बस नादुरुस्त होणे, बसगाड्यांची  प्रवाशांना २-२ घंटे वाट पहात बसणे अशा तक्रारी अल्प होतील.

या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले की, काही बस स्थानके ही शासनाच्या निधीतून, तर काही बस स्थानके ‘बांधा-वापरा-हस्तांरित करा’, या तत्त्वावर खासगी विकासकांकडून विकसित केली जाणार आहेत. मागील सरकारच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्‍याने राज्यभरातील १८३ बस स्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्यास प्रारंभ झाला होता. नागपूरमधील गणेश पेठ बस स्थानकाचे काँक्रिटीकरणही याच टप्प्यात पूर्ण होत आहे. भविष्यात विदर्भातील एक देखणे बस स्थानक म्हणून गणेश पेठ बस स्थानकाचा नावलौकिक होईल.