भाजपच्या युवा मोर्चाचे मुंबईतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर आक्रमण !
मुंबई – भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर आक्रमण करून तोडफोड केली. या जमावाला पोलीस पांगवण्याचा प्रयत्न करत असतांनाच त्यांनी जमावावर लाठीमार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने अपमान केला, असा आरोप या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयी विधाने केली होती. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेऊन गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर हे आक्रमण करण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर शाई फेकली. तेथील आसंद्या फेकून देण्यात आल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात दगडही भिरकावले. यानंतर मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा काँग्रेस कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आला. कार्यकर्त्यांची धरपकड चालू आहे.