भावपूर्ण आणि तळमळीने सेवा करणार्‍या दादर, मुंबई येथील सौ. सुहासिनी परब !

सौ. सुहासिनी परब या साधिका मुंबईतील दादर येथील सेवाकेंद्रापासून साधारण १ किलोमीटर अंतरावर रहातात. वर्ष २०१२ पासून त्या सेवाकेंद्रात पोळी-भाजी देण्याची सेवा नियमित करत आहेत. त्या प्रतिदिन सकाळी ९.३० वाजता पोळी-भाजीचा डबा सिद्ध ठेवतात. 

ही सेवा ताई जिव्हाळ्याने करतात. त्यामुळे सेवाकेंद्रात काही हवे असल्यास त्यांना निःसंकोचपणे सांगता येते. कधी त्यांची प्रकृती ठीक नसली, तरी साधकांना त्याविषयी कळू न देता त्या भोजन देण्याची सेवा निर्धाराने करतात. मुंबईतील साधकांना लक्षात आलेली सौ. सुहासिनीताईंची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.  

सौ. सुहासिनी परब

१. सौ. कल्पना कार्येकर, मुंबई 

१ अ. सर्व कौटुंबिक दायित्वे सांभाळून नियमित सेवा करणे : ‘यजमानांच्या प्रकृतीची काळजी घेणे, सर्व कौटुंबिक दायित्वे निभावणे आणि नोकरीवर जाणार्‍या मुलीला, कु. आसावरी हिला वेळेत जेवणाचा डबा करून देणे, आदी सर्व दायित्वे सांभाळून सौ. सुहासिनीताई नियमित सेवा करतात.

१ आ. प्रेमळ : काही साधक त्यांच्या वैयक्तिक अडचणी सौ. सुहासिनीताई यांना मोकळेपणाने सांगतात. सौ. सुहासिनीताई यांच्यातील प्रेमभावामुळे विविध प्रकृतीच्या साधकांना त्या सहजतेने हाताळतात.

१ इ. सनातनच्या विविध आश्रमांत पूर्णवेळ सेवा करणार्‍या साधकांविषयी त्यांना आत्मीयता वाटते.’

२. सेवेची तळमळ 

२ अ. स्वतःचे घर सेवेसाठी उपलब्ध करून देणे : सुहासिनीताईंचे घर सेवाकेंद्राच्या जवळच असल्यामुळे त्यांच्याकडे साधकांची नेहमी ये-जा असते. त्यांचे घर लहान आहे, तरीही त्यांच्या घरी सनातन पंचांग, प्रसारसाहित्य आणि सात्त्विक उत्पादने ठेवलेली असतात. ही सेवा त्या मनापासून करतात.

काही मासांपूर्वी त्यांच्या घराचे नूतनीकरण करण्यात आले. त्या वेळी त्यांनी सनातनचे साहित्य ठेवण्यासाठी अधिक प्राधान्य देऊन जागेचे नियोजन केले.

२ आ. पुढाकार घेऊन सेवांचे नियोजन करणे आणि स्वतःही सेवेत सहभागी होणे : त्या दादर येथील प्रसाराचे दायित्वही सांभाळतात. त्यांची प्रपंच सांभाळून सेवेसाठी अधिकाधिक वेळ देण्याची तळमळ असते. काही वेळा अन्य सेवांसाठी साधक उपलब्ध होत नाहीत. अशा वेळी ताई पुढाकार घेऊन सेवांचे नियोजन करतात आणि स्वतःही सेवेत सहभागी होतात.

२ इ. नवीन सेवा शिकून घेणे : सौ. सुहासिनीताई यांना संगणकीय ज्ञान नाही, तरीही सेवेचे दायित्व सांभाळतांना त्यांनी अन्य साधकांकडून संगणकीय सेवा शिकून घेतली आहे. ‘सेवेचे दायित्व कसे पूर्ण करावे’, हे त्यांच्याकडून शिकायला मिळते.

२ ई. सासूबाईंची सेवा मुलीप्रमाणे करणे : सौ. सुहासिनीताई यांच्या सासूबाईंचे निधन झाले आहे. त्यांच्या सासूबाई हयात असतांना ताईंनी त्यांची पुष्कळ चांगल्या प्रकारे सेवा केली. त्यामुळे सासूबाई आणि त्यांच्यात आई-मुलीप्रमाणे नाते होते. याविषयी त्यांच्या नणंदा आणि अन्य नातेवाईक त्यांचे कौतुक करायचे.’

३. दादर, मुंबई येथील साधक

३ अ. यजमानांची प्रकृती ठीक नसतांना स्थिर राहून त्यांची सेवा करणे : ‘यजमानांची प्रकृती ठीक नसल्यामुळे सौ. सुहासिनीताईंना त्यांचे भोजन आणि आवरणे यांकडे सतत लक्ष द्यावे लागते. हे सर्व करून ताई न चुकता सेवाकेंद्रातील साधकांसाठी भोजन पाठवतात. त्यांच्यातील भाव आणि गुरूंची कृपा यांविना हे शक्य नाही.

३ आ. भगवंत, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि संत यांच्याप्रती भाव 

१. सौ. सुहासिनीताईंच्या कुटुंबावर कठीण प्रसंग आले. त्या वेळी भगवंताच्या कृपेने त्या समर्थपणे तोंड देऊ शकल्या.

२. ‘गुरुदेवांप्रती श्रद्धा आणि सेवेची चिकाटी’ यांमुळे जीवनातील कठीण काळातही ताईंनी भगवंताची कृपा अनुभवली आहे. याविषयी त्यांच्या मनात कृतज्ञता आहे.

३. प.पू. गुरुदेव आणि भगवंत यांच्याविषयी त्यांच्यामध्ये असलेली श्रद्धा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून नेहमीच जाणवते. सनातनच्या संतांप्रतीही त्यांचा पुष्कळ भाव आहे.

‘गुरुदेवांनी सुहासिनीताई यांच्यासारखे साधक घडवले’, याबद्दल प.पू. गुरुदेवांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

सर्व सूत्रांचा दिनांक (१०.१२.२०२४)


दादर, मुंबई येथील साधिका सौ. सुहासिनी परब यांनी यजमानांच्या आजारपणात अनुभवलेली गुरुकृपा !

श्री. सुधाकर परब

१. क्षयरोगाच्या जीवाणूंमुळे साधिकेच्या यजमानांच्या डोक्यात एक गाठ होणे आणि त्यामुळे त्यांची स्मृती जाणे 

‘वर्ष २००८ मध्ये माझे यजमान श्री. सुधाकर परब यांना ताप येत होता. त्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी ठेवण्यात आले होते. पडताळणीमध्ये त्यांच्या डोक्यात क्षयरोगाच्या (टी.बी.च्या) जीवाणूंमुळे गाठ झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांची स्मृती गेली. ते कुणालाही ओळखायचे नाहीत. त्यांना शुद्धही नसायची. त्यांना हाताने जेवता येत नसल्याने त्यांना जेवण भरवावे लागायचे.

२. साधिका दायित्व घेऊन सेवा करू लागणे आणि गुरुदेवांच्या कृपेमुळे तिच्या यजमानांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागणे 

माझ्या यजमानांची प्रकृती ठीक नव्हती आणि त्याच काळात मला प्रसाराचे दायित्व घेण्याविषयी उत्तरदायी साधिकेने विचारले. त्या वेळी ‘वेळेचे नियोजन कसे करावे ?’, असा मला प्रश्न पडला. तेव्हा ‘ही प.पू. गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) इच्छा आहे’, असे मानून मी सेवांचे दायित्व स्वीकारले. मी दायित्व घेऊन सेवेला आरंभ केल्यानंतर गुरुदेवांच्या कृपेमुळे माझ्या यजमानांच्या प्रकृतीत चांगले पालट होत गेले.

३. ‘प.पू. गुरुदेवच सेवा करून घेत आहेत’, असा भाव ठेवून सेवाकेंद्रात पोळी-भाजी देण्याची सेवा करणे 

वर्ष २०१२ मध्ये मला सनातनच्या दादर येथील सेवाकेंद्रातील साधकांसाठी पोळी-भाजी करून देण्याची सेवा मिळाली. त्या वेळी ‘मी आश्रमात असून ही सेवा प.पू. गुरुदेवच माझ्याकडून करून घेत आहेत’, असा भाव ठेवून मी सेवा परिपूर्ण रीतीने करण्याचा प्रयत्न करू लागले.

४. यजमानांच्या प्रकृतीत सुधारणा होणे  

कुणालाही ओळखण्याच्या स्थितीत नसलेल्या माझ्या यजमानांची स्मृती कालांतराने जागृत होऊ लागली. ते व्यक्तींना ओळखू लागले. साधक घरी आले की, यजमान त्यांना हात जोडून नमस्कार करू लागले. गुरुकृपेनेच आता त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे.’

– सौ. सुहासिनी परब, दादर, मुंबई. (१०.१२.२०२४)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक