सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना काही प्रश्नांची उत्तरे देता न येण्यामागील कारणे, साधकांना येत असलेली मर्यादा आणि ती दूर होण्यासाठी त्यांनी करायची साधना !
प्रश्न – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विविध विषयांवर प्रश्न विचारतो. त्यातील काही प्रश्नांची उत्तरे ज्ञानप्राप्तकर्ते साधक देऊ शकतात, तर काही प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत. याचे कारण काय ? त्यांना ज्ञान प्राप्त करण्यात काही अडथळे येतात का ? कि ज्ञानप्राप्तकर्त्यांच्या उत्तरे मिळवण्याविषयी काही मर्यादा आहेत ? मर्यादा असल्यास त्या दूर करण्यासाठी साधकांनी कोणती साधना केली पाहिजे ? (२७.५.२०२३)
।। श्री गुरवे नम: ।।
१९.१२.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे न मिळण्याची कारणमीमांसा पाहिली. या लेखात आपण सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांनी करायच्या साधनेविषयी जाणून घेऊया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/864998.html
४. नोव्हेंबर २०२१ मधील दिवाळीच्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकाला एक आठवडा स्वयंसूचना सत्रे आणि नामजपादी उपाय करून ज्ञानप्राप्तीची सेवा करायला सांगणे
नोव्हेंबर २०२१ मधील दिवाळीच्या दिवशी एका साधकाने मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा निरोप सांगितला, ‘‘एक आठवडा स्वयंसूचना सत्रे आणि नामजपादी उपाय करणे अन् त्यानंतर मिळालेल्या ज्ञानाचे टंकलेखन करून पाठवणे.’ याआधी ज्ञान मिळत नसतांना मी मराठी भाषेतील लिखाणाचे हिंदी भाषेत भाषांतर करण्याची सेवा करत होतो. या निरोपानंतर मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना ज्ञानप्राप्ती होण्यासाठी करायच्या नामजपादी उपायांविषयी विचारून घेतले.
४ अ. ‘ज्ञानप्राप्ती करण्याची इच्छा होण्यासाठी स्वयंसूचना कशी बनवावी ?’, ते लक्षात न येणे आणि स्वप्नात श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोक आठवणे अन् सकाळी उठल्यावर त्याची आठवण होऊन तशी सूचना बनवणे : ‘ज्ञानप्राप्ती ही आध्यात्मिक प्रक्रिया आहे. ते मिळत नाही, तर त्यामागे माझा कोणता स्वभावदोष किंवा अहंचा पैलू आहे’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. मी असा विचार करतच त्या दिवशी रात्री झोपलो. मला स्वप्नात गीतेतील ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।’ (अर्थ : कर्म करत रहावे; पण फळाची अपेक्षा करू नये.) हा श्लोक आठवला. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर माझ्या मनात हा श्लोक पुनःपुन्हा येत होता. त्याला अनुसरून मी स्वयंसूचना देण्याच्या पद्धतीतील ‘अ ३’, म्हणजे प्रसंगाचा सराव’ या पद्धतीप्रमाणे स्वयंसूचना देणे चालू केले. अशा प्रकारे मी आठवडाभर प्रत्येक दिवशी स्वयंसूचना दिली.
४ आ. एक आठवडा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय आणि स्वयंसूचना सत्रे केल्यानंतर ज्ञानप्राप्तीची सेवा चालू होणे : मी एक आठवडा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय आणि स्वयंसूचना सत्रे केली. ८ व्या दिवशी मला मिळालेल्या ज्ञानाविषयीचे लिखाण मी टंकलेखन करून दिले. ‘ते ज्ञान योग्य आहे’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले आणि मला ज्ञानप्राप्तीची सेवा पुन्हा चालू करायला सांगितली.
५. मे २०२२ मध्ये पुन्हा वाईट शक्तींनी तीव्र आक्रमण करणे; पण ज्ञानप्राप्तीची सेवा चालू असणे
नोव्हेंबर २०२१ नंतरही माझ्यावर वाईट शक्तींची तीव्र आक्रमणे होत होती. जानेवारी ते एप्रिल २०२१ पर्यंत मला पुष्कळ थकवा होता. मी १२ – १३ घंटे झोपत होतो. त्यामुळे मला ज्ञान मिळत असूनही त्याचे टंकलेखन करता येत नव्हते. मे २०२२ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दोन दिवस आधी माझे पोट आणि मांडी यांतील मधल्या भागात मोठे फोड होऊन त्यांत पू झाला होता. माझ्यावर शस्त्रकर्म करूनच त्यातील पू काढावा लागला. शस्त्रकर्म करतांना केलेल्या चाचणीत मला मधुमेह असल्याचे लक्षात आले. त्या वेळी माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण ४०० mg/dl एवढे होते. (निरोगी व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण १०० ते १२० mg/dl एवढे असते.) मधुमेहाचा त्रास दूर होण्यासाठी औषध चालू असतांना कधी माझ्या रक्तातील साखर एकदम न्यून होत असे, तर कधी एकदम वाढत असे. या त्रासांमुळे मला वर्ष २०२२ मधील जन्मोत्सव आणि हिंदु राष्ट्र अधिवेशन येथे प्रत्यक्ष जाता आले नाही, तरीही त्यांचे सूक्ष्म-परीक्षण करणे आणि ज्ञान मिळवणे, ही सेवा चालू होती. हे सर्व सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना समजल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘हे वाईट शक्तींचे आक्रमण आहे.’’
६. ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातील ज्ञान मिळण्यासाठी आवश्यक घटक आणि त्याचे परिणाम
७. ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांनी गुरुकृपायोगानुसार साधनेचे खडतर प्रयत्न करणे आणि आढावा देणे आवश्यक असणे
मला आलेल्या अनुभवातून माझ्या लक्षात आले, ‘ज्ञानप्राप्तीची सेवा आध्यात्मिक स्तरावर असली, तरीही त्यासाठी स्वतःचे मन आणि बुद्धी यांची शरणागती अन् शिकण्याची स्थिती आवश्यक आहे, नाहीतर हळूहळू सेवेतील गुणवत्ता न्यून होऊन आध्यात्मिक त्रासाच्या प्रमाणात वाढ होत जाते.
मेघ सर्वत्र समान वर्षाव करतात; पण डोंगरावर पाणी टिकत नाही, तर तलावात पाणी साठते. मेघरूपी ईश्वर सतत ज्ञानाचा वर्षाव करत असतो; पण माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्या डोंगरात वाढ झाल्यावर मला ज्ञान ग्रहण होत नाही. तलावातही अधिक पाणी साठवायचे असले, तर विविध प्रयत्नांनी तलावातील गाळ काढावा लागतो. याप्रकारे आम्हा ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना ज्ञानाची गुणवत्ता वाढवण्यास किंवा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळवण्यास येत असलेल्या मर्यादेला पार करायचे असल्यास त्यासाठी प्रयत्न करावे लागणारच.’
ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांनी सूक्ष्म ज्ञानाद्वारे उत्तरे मिळवण्याविषयीची मर्यादा दूर करण्यासाठी त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसार साधनेतील सूत्रांनुसार (स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, भावजागृती, नामजप, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती आणि गुणसंवर्धन) तळमळीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या सेवेला विभागाचे स्वरूप (म्हणजे दायित्व असणारा साधक नेमणे, कार्याचा आढावा घेणे, अडचणी, उपाय) आले, तर सेवेत येणार्या विविध अडचणी त्या, त्या वेळी लक्षात येऊन त्यासाठी गुरु आणि संत यांचे मार्गदर्शन घेऊन प्रयत्न करता येईल.
ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप किंवा सुश्री (कु.) मधुरा भोसले यांच्याशी माझे ७ – ८ दिवसांमध्ये अधून-मधून अनौपचारिक बोलणे होते. तेव्हा आम्ही अडचणी किंवा शिकायला मिळालेली सूत्रे यांविषयी बोलतो. सेवेची गुणवत्ता वाढण्याविषयी आमचे बोलणे होत नाही. या वर्षापासून प्रतिवर्षी होणारा परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव सोहळा आणि अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन यांचे सूक्ष्म परीक्षण करतांना येणार्या स्थुलातील अडचणींविषयी अनौपचारिक बोलून उत्तरदायी साधकांचे मार्गदर्शन घेणे असे प्रयत्न केले आहेत; मात्र एकत्रितपणे बसून ‘एखाद्या प्रश्नाचे उत्तर सूक्ष्मातून का मिळाले नाही ? किंवा ज्ञानप्राप्तीच्या सेवेत शिकायला मिळालेले नाविन्यपूर्ण सूत्र, आध्यात्मिक त्रासात वाढ झाली असेल, तर करायचे प्रयत्न’, अशा विविध विषयांवर आमचे बोलणे व्हायला हवे. ‘याच प्रकारे ध्येय घेऊन सेवा करण्याचे आणि बरेच प्रयत्न आम्ही करू शकतो’, असे वाटते. थोडक्यात अन्य सेवांच्या ठिकाणी साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेण्यासह सेवेत येणार्या अडचणींविषयी बोलण्यासाठी साधक एकत्र बसतात, त्या प्रकारे ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांनी आठवड्यातून किंवा १५ दिवसांतून एकदा एकत्रितपणे बोलायला हवे. यामुळे सेवेत येणार्या अडचणी, त्यावरील उपाय, पुढची उपाययोजना अशा सूत्रांवर बोलणे होऊ शकेल.
८. कृतज्ञता
आतापर्यंत ज्ञानाची सूत्रे टंकलेखन करतांना ‘कोणते विचार माझे आहेत आणि कोणते ईश्वरी ज्ञान आहे’, हे माझ्या लक्षात येत असे. आज मिळालेल्या ज्ञानाच्या सूत्रांचे टंकलेखन करतांना मला असा भेद लक्षात आला नाही. ईश्वर सूक्ष्म ज्ञानातून माझे उदाहरण देऊन त्यावर योग्य ते उत्तर मला सांगत आहे आणि मी त्रयस्थपणे ते लिहीत आहे, असा अद्वैतातील एक टप्पा मी अनुभवला. ज्ञानाच्या माध्यमातून अशी अनुभूती दिल्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.५.२०२३, सकाळी ७ ते ९.३५)
(समाप्त)
।। श्री गुरवे नम: ।।
|