देवता, अतिथी, कुटुंब किंवा दिवंगत पूर्वज आणि स्‍वतःचा आत्‍मा यांना जो संतुष्‍ट करत नाही, तो जिवंत असूनही नसल्‍यासारखाच !

प.पू. स्‍वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्‍य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

प्रश्‍न : इन्‍द़्रियार्थाननुभवन् बुद्धिमांल्लोकपूजितः ।
सम्‍मतः सर्वभूतानामुच्‍छ्‍वसन् को न जीवति ॥

– महाभारत, पर्व ३, अध्‍याय २९७, श्‍लोक ३८

अर्थ : इंद्रियांद्वारे विषयांचा उपभोग घेत आहे, बुद्धीमान आहे, लोकांमध्‍ये मान्‍यता आणि प्रतिष्‍ठा आहे, श्‍वासोच्‍छ्‌वास करत आहे, तरी जिवंत नाही; असा कोण ?

उत्तर : देवतातिथिभृत्‍यांना पितृणामात्‍मनश्‍च यः ।
न निर्वपति पञ्‍चानामुच्‍छ्‌वसन् न स जीवति ॥

– महाभारत, पर्व ३, अध्‍याय २९७, श्‍लोक ३९

अर्थ : देवता, अतिथी, कुटुंबातील मंडळी, माता-पिता किंवा दिवंगत पूर्वज आणि स्‍वतःचा आत्‍मा यांना जो गृहस्‍थाश्रमी संतुष्‍ट करत नाही, तो श्‍वासोच्‍छ्‌वास करत असला, तरी जिवंत नाही. (असे मानले पाहिजे.)

सामाजिकदृष्‍ट्या जे काही अत्‍यंत महत्त्वाचे प्रश्‍न आहेत, त्‍यातील हा एक आहे. माणूस बुद्धीमान आहे. लोकांमध्‍ये त्‍याला मानमान्‍यता आहे, म्‍हणजे सत्ता-संपत्तीने युक्‍त आहे; कारण निवडून आलेला आहे. तुष्‍टीकरणाच्‍या धोरणाने वेगवेगळ्‍या घोषणा प्रत्‍येक वेळी करत असल्‍याने सर्वांना संमत आहे, असे वाटते. ‘माणूस विलासात-ऐश्‍वर्यात रहातो. तो खाणे-पिणे, नृत्‍य आणि संगीत इत्‍यादी विषयांचा उपभोग घेतो, जिवंतपणाचे जे मुख्‍य लक्षण श्‍वासोच्‍छ्‌वास तो अर्थातच चालू असतो, तरी ‘जिवंत आहे’, असे म्‍हणता येत नाही, अशी व्‍यक्‍ती कोण ?

माणसाने मिळवलेल्‍या अन्‍नावर त्‍याचे आप्‍तेष्‍ट आणि समाज या सर्वांचा अधिकार आहे, त्‍यांचा भाग त्‍यांना देऊनच स्‍वतः जेवण केले पाहिजे. संकुचित वृत्तीचा, स्‍वार्थी आणि अविचारी माणूस अन्‍न मिळवतो, ते व्‍यर्थ आहे. खरोखरीच सांगतो, ‘असे वागणे, हा त्‍याचा मृत्‍यू आहे. जो एकटाच खातो, तो पापी आहे.’ श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेने अशा व्‍यक्‍तीला ‘चोर’ म्‍हटले आहे. या उदात्त धारणेमुळेच ‘आपल्‍या राष्‍ट्रात सहस्रो वर्षांच्‍या काळात सामाजिक संघर्ष कधी निर्माण झाला नाही. ‘संघर्षातून प्रगती होते’, असे खुळे तत्त्वज्ञानही निर्माण झाले नाही. या तत्त्वज्ञानाच्‍या आधारे आपल्‍याच लोकांची अमानुष हत्‍या करणारी क्रूर राजवटही आपल्‍या देशात कधी जन्‍माला आली नाही.

इष्‍टाने स्‍वर्ग मिळतो आणि पूर्ताने (समाजोपयोगी कामाने) मोक्ष मिळतो !

आपल्‍याकडे गृहस्‍थाला इष्‍टापूर्त सांगितले आहे. त्‍याच धोरणाने युधिष्‍ठिर यक्षाने विचारलेल्‍या प्रश्‍नाचे उत्तर देत आहे. इष्‍ट म्‍हणजे देवतांना उद्देशून केलेली कर्मे. होमहवन-पूजापाठ, तीर्थयात्रा इत्‍यादींचा त्‍यात समावेश होतो. विहिरी खोदणे, तळी बांधणे, झाडे लावणे, अन्‍नछत्र घालणे, विद्यादान आणि रुग्‍ण परिचर्या इत्‍यादी समाजोपयोगी कामे ‘पूर्त’, म्‍हणून ओळखली जातात. त्‍यातही ‘इष्‍टाने स्‍वर्ग मिळतो आणि पूर्ताने मोक्ष मिळतो’, असा बारकावा शास्‍त्राने सांगितला आहे. ‘इष्‍टापेक्षाही पूर्त अधिक श्रेष्‍ठ आहे’, असा याचा अर्थ होतो.

उदार, परोपकारी, कर्तव्‍यतत्‍पर असण्‍यातच आत्‍म्‍याचे कल्‍याण आहे. आत्‍म्‍याचे कल्‍याण पूर्णपणे होण्‍यासाठी ज्ञानभक्‍तीच्‍या साहाय्‍याची नितांत आवश्‍यकता असते. जो या दिशेने प्रयत्नशील असत नाही, त्‍याला ‘आत्‍मघाती’ म्‍हटले पाहिजे. ‘आत्‍मघाती मनुष्‍य दुर्गतीला प्राप्‍त होतो’, असे उपनिषदांनी सांगितले आहे. थोडक्‍यात ‘इष्‍टापूर्ती न करणारा, आपल्‍यापुरतेच पहाणारा, स्‍वार्थी, संकुचित वृत्तीचा आणि अश्रद्ध मनुष्‍य मेल्‍यातच जमा आहे’, हे लक्षात घेऊन लोक वागतील, तरच सर्व प्रकारचे संघर्ष नष्‍ट होऊन समाजामध्‍ये शांती, समाधान आणि प्रसन्‍नता नांदेल.

– प.पू. स्‍वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)

(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्‍न’)