आस्थापनांमध्ये ‘स्वभावदोष निर्मूलन’ प्रक्रिया राबवा !
सध्या बहुतांश आस्थापनांमध्ये तणावाचे वातावरण पहायला मिळते. चेहर्यावर ताण, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकलेले चेहरे असे न्यूनाधिक प्रमाणात स्वरूप असते. याच्या जोडीलाच भरीस भर म्हणून ईर्ष्या, द्वेष, बढती मिळण्यासाठी कुरघोडीचे राजकारण कर्मचार्यांमध्ये केले जाते. यातून वादविवाद होतात, तुलना केली जाते. काही वेळा याची परिणती हिंसक स्वरूपही गाठते. याच्या उलट म्हणजे आस्थापनात काम करणारी जुनी पिढी ! या पिढीची मानसिकता तरुण पिढीच्या अगदी विरुद्ध आहे. जुन्या काळातील चालीरिती, परंपरा सांभाळून ही पिढी ‘कामाची जागा म्हणजे मंदिरच आहे’, असा विचार करून त्या ठिकाणचे पावित्र्य राखण्याचे दायित्व पार पाडण्याचा प्रयत्न करतांना दिसते. असे लोक कामाला प्रारंभ करतांना, तसेच काम झाल्यावर देवाचे स्मरण करायला विसरत नाहीत. परिणाम स्वरूप त्यांच्याकडून अल्प चुका होतात. त्यांच्या मनात प्रत्येक वेळी कृतज्ञतेची भावना असते. सध्याच्या पिढीतील तरुण-तरुणींनी जुन्या मानसिकतेला नावे न ठेवता त्यानुसार आचरण करायला हवे. जुन्या पिढीप्रमाणे सध्याच्या पिढीला कृतज्ञतेचा संस्कार द्यायचा असेल आणि ‘तणावविरहित’ कामाचे स्वरूप आस्थापनांमध्ये आणायचे असेल, तर ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन’ पद्धत राबवायला हवी.
प्रत्येक कर्मचार्याची प्रकृती वेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे त्याच्यातील कौशल्य आणि त्याची मानसिकता ओळखून काम करून घेणे, हे आस्थापन चालवणार्यांसमोर मोठे आव्हान असते. एखाद्या कर्मचार्याचा बुध्यांक चांगला असतो; पण ‘भावनाशीलता’ किंवा ‘संयमाचा अभाव’ या दोषांमुळे तो लवकर चिडतो. यामुळे तो चांगले काम करू शकत नाही. त्याच्या कामाची फलनिष्पत्ती अल्प मिळते. त्यावर उपाय म्हणून संबंधित दोष किंवा अहं यांचे पैलू न्यून होण्यासाठी त्याने प्रयत्न करायला हवेत. त्या अनुषंगाने मनाला स्वयंसूचना दिली, तर कर्मचार्याच्या मनावरील ताण हलका होऊन त्याची कामे करण्याची क्षमता वाढू शकते.
दोष जन्मोजन्मीचे असतात. प्रक्रिया राबवल्यावरही ते लगेच जातील, असे नाही. भगवंताची आराधना केल्यासच त्याचा अधिक पटींनी लाभ होऊ शकतो. अनेकदा ताणतणाव मुक्तीसाठी आस्थापनातील कर्मचारी सिगारेट किंवा दारू यांच्या आहारी जातात. त्यातून मानसिक स्वास्थ्य हरवून बसतात. हे असे प्रकार, म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ होय ! अशा प्रकारे अन्य उपाय करत बसण्यापेक्षा ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन’ पद्धत आस्थापनांनी जर गांभीर्याने राबवली, तर तिचा लाभ कर्मचार्यासह त्याचे कुटुंबीय, सहकारी यांना होईल अन् त्यातून सहस्रो लोक आनंदी होतील. आस्थापनांनी याचा प्रामुख्याने विचार करायला हवा !
– श्री. जयेश बोरसे, पुणे