संपादकीय : काँग्रेसची विद्वेषी खेळी !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍याविषयी नुकतेच राज्‍यसभेत एक विधान केले. त्‍यात ते म्‍हणाले होते, ‘काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना ‘भारतरत्न’ पुरस्‍कार दिला नाही, उलट ‘तो त्‍यांना मिळू नये’, असाच काँग्रेसचा प्रयत्न होता. आंबेडकरांविषयी नेहरूंच्‍या मनात द्वेष होता, ही गोष्‍ट जगजाहीर आहे. केवळ मोदी सरकारनेच आंबेडकरांचा सन्‍मान केला. केंद्रात भाजपचे सरकार आल्‍यानंतर आंबेडकरांची स्‍मारके नागपूर, देहली, लंडन अशा ठिकाणी उभारली गेली. २६ नोव्‍हेंबर हा ‘संविधानदिन’ म्‍हणून साजरा होऊ लागला.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शहा यांच्‍या विधानांचे समर्थन करतांना म्‍हटले, ‘‘भारताच्‍या नागरिकांनी पाहिले आहे की, काँग्रेसने डॉ. आंबेडकर यांचा वारसा पुसून टाकण्‍यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींचा अवमान करण्‍यासाठी शक्‍य त्‍या सर्व कुटील गोष्‍टी केल्‍या आहेत. डॉ. आंबेडकर यांचा निवडणुकांमध्‍ये पराभव करणे, जवाहरलाल नेहरूंनी डॉ. आंबेडकर यांच्‍या विरोधात प्रचार करणे आणि त्‍यांच्‍या पराभवाचे सूत्र मोठे करणे, डॉ. आंबेडकर यांना ‘भारतरत्न’ नाकारणे, संसदेच्‍या मध्‍यवर्ती सभागृहामध्‍ये डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा लावण्‍यास नकार देणे, असेही प्रकार केले होते. अमित शहा यांनी जे मांडले, त्‍यात तथ्‍य आहे; पण त्‍यामुळे काँग्रेसला धक्‍का बसला आहे.’’ अमित शहा यांनी सत्‍य उघड केले आणि पंतप्रधानांनी त्‍यांना समर्थन दिले. त्‍यामुळे काँग्रेसच्‍या नाकाला मिरच्‍या झोंबल्‍या. अशी विधाने काँग्रेसला रुचली नाहीत, बोचली नाहीत, तरच नवल ! प्रकरण अंगाशी नव्‍हे, तर अगदी गळ्‍याशी आल्‍याने काँग्रेसने शहा यांना विरोध करण्‍याचा प्रयत्न केला आहे. अर्थात् जनता अमित शहांना ओळखते अन् काँग्रेसलाही पुरती ओळखते. त्‍यामुळे काय खोटं आणि काय खरं ?, हे जनता जाणते. काँग्रेसचा भाजपद्वेषाचा किडा वळवळू लागला. मग काँग्रेसचे अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषद घेऊन शहांना वाचवल्‍याचे सांगत पंतप्रधानांवर आरोप केला, तसेच डॉ. आंबेडकरांचा अपमान करणार्‍या मंत्र्याला मंत्रीमंडळातून काढून टाकण्‍याची मागणी केली. ‘गृहमंत्र्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे’, असे उद़्‍गार स्‍वतः निष्‍पाप (?) असल्‍याचे दर्शवणार्‍या राहुल गांधी यांनी काढले. अर्थात् हे असे होणारच होते; कारण काँग्रेस पक्ष असो किंवा काँग्रेसी असोत, ते नेहमीच ‘आम्‍ही कसे शुद्ध किंवा निष्‍कलंक आहोत’, असाच आविर्भाव आणतात. इतरांकडे बोट दाखवण्‍याचा नेहमीच अट्टहास करणार्‍या काँग्रेसींनी उरलेली चारही बोटे आपल्‍याकडे आहेत, हे कदापि विसरू नये. शहा आंबेडकरविरोधी असल्‍याचे काँग्रेसने म्‍हटल्‍यावर ‘काँग्रेस आंबेडकरविरोधी असल्‍याचे वारंवार सिद्ध झाले आहे’, अशा शब्‍दांत शहांनी त्‍यावर प्रत्‍युत्तर दिले. शहा यांच्‍या विधानाचे पडसाद नागपूरच्‍या हिवाळी अधिवेशनातही मोठ्या प्रमाणात उमटले.

काँग्रेसने आजवर काय केले ? तर केवळ आणि केवळ द्वेषपूर्ण राजकारण ! हे सर्व भारतियांना ठाऊक आहे; पण जेव्‍हा कुणी काँग्रेसचे सत्‍य उघडे पाडते, तेव्‍हा त्‍याची मोडतोड करायची, हीच भूमिका त्‍यांच्‍याकडून घेतली जाते. त्‍यातून लोकांची दिशाभूल होते. प्रत्‍येक वेळी स्‍वत:चे पारडे सावरण्‍याचा आणि ते जड ठेवण्‍याचा काँग्रेसकडून प्रयत्न केला जातो; मात्र तो विफल ठरतो. ‘कोंबडं कितीही झाकून ठेवलं, तरी सूर्य उगवल्‍याविना रहात नाही !’, त्‍याचप्रमाणे असत्‍याच्‍या पायावर उभ्‍या केलेल्‍या इतिहासाला कितीही लपवण्‍याचा प्रयत्न केला, तरी कधी ना कधी सत्‍य उघड होतेच ! वर्षानुवर्षे असत्‍याचा बुरखा पांघरलेल्‍या काँग्रेसचा हात सारवासारव करण्‍यात कुणीही धरू शकणार नाही, हेच आजवरच्‍या उदाहरणांतून दिसून येते.

काँग्रेस, आंबेडकर आणि इतिहास ! 

आंबेडकरांनी नेहरूंच्‍या मंत्रीमंडळातून त्‍यागपत्र दिले होते; पण त्‍यानंतर नेहरू म्‍हणाले होते, ‘‘मला याविषयी यत्‍किंचितही दुःख नाही. आंबेडकरांच्‍या जाण्‍यामुळे आपले मंत्रीमंडळ कमकुवत होणार नाही.’’ डॉ. आंबेडकर हे खरेतर राज्‍यघटनेचे शिल्‍पकार होते. असे असतांना इतक्‍या अतीमहनीय व्‍यक्‍तीच्‍या संदर्भातही काँग्रेसला सुवेरसुतक नसावे, यातून ‘काँग्रेसने स्‍वतःची असंवेदनशील मनोवृत्तीच उघड करून दाखवली आहे’, असे म्‍हणता येईल. डॉ. आंबेडकर यांनी घटना समितीमध्‍ये ‘हिंदु कोड बिल’ मांडले होते; पण त्‍याला विरोध करण्‍यात आला. त्‍यामुळे डॉ. आंबेडकर यांनी २७ ऑक्‍टोबर १९५१ या दिवशी त्‍यांच्‍या कायदेमंत्रीपदाचे त्‍यागपत्र दिले. ते कायदेतज्ञाच्‍या जोडीला प्रख्‍यात अर्थतज्ञही होते. त्‍यामुळे नेहरू त्‍यांना अर्थमंत्री तरी करू शकले असते; पण त्‍यांनी तसे केले नाही. आंबेडकरांनी त्‍या काळी फाळणीलाही विरोध केला होता; पण नेहरूंनी त्‍यांच्‍या त्‍या विरोधाला जुमानले नाही आणि आपलेच घोडे दामटवले. अजूनही ते दामटवणे चालूच आहे. ‘जो आपल्‍या बाजूने असेल, त्‍याला जवळ करणे’ ही काँग्रेसची नीती आहे. ती अजूनही तशीच राबवली जात आहे. काँग्रेसने आजवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विचारांना सातत्‍याने विरोध केला; पण हीच काँग्रेस प्रत्‍येक वेळी मतांसाठी मात्र राज्‍यघटना वाचवण्‍याची भाषा करते. हा दुतोंडीपणा नव्‍हे का ? राज्‍यघटनेला कोण कलंकित करते आणि कोण तिचे संरक्षण करते ? हे सर्वांनाच ठाऊक आहे.

वर्ष २०२३ मध्‍ये मध्‍यप्रदेशात नव्‍या भाजप सरकारच्‍या पहिल्‍या विधानसभा अधिवेशनाच्‍या वेळी सभागृहातील जवाहरलाल नेहरू यांचे तैलचित्र हटवण्‍यात आले आणि तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्‍यात आले. त्‍याही वेळी काँग्रेसचे प्रवक्‍ते अब्‍बास हफीज म्‍हणाले होते, ‘‘भाजपला देशाचा इतिहास पुसून टाकायचा आहे.’’ ‘आंबेडकरांचे बुद्धीचातुर्य, तसेच प्रतिभावान व्‍यक्‍तीमत्त्व यांमुळे आपल्‍याला माघार घ्‍यावी लागेल’, अशी सुप्‍त भीती नेहरूंना वाटत होती. त्‍यामुळेच तर काँग्रेसने मुद्दामहून निवडणुकीत आंबेडकरांना दोनदा पराभूत केले. काँग्रेसने आजपर्यंत द्वेषाचे आणि तुष्‍टीकरणाचेच राजकारण केले. अर्थात् त्‍याची पराभवाची फळे आता काँग्रेसला भोगावी लागत आहेत. ‘नेहरूंनी स्‍वत:लाच ‘भारतरत्न’ दिला’, असे सांगितले जाते. त्‍यांची मुलगी इंदिरा गांधी आणि मुलगा राजीव गांधी हे त्‍या त्‍या वेळी पंतप्रधान झाल्‍यावर त्‍यांनाही ‘भारतरत्न’ पुरस्‍कार देण्‍यात आला. मग राज्‍यघटनेचे शिल्‍पकार ठरलेल्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतरत्न’ का दिले गेले नाही ? यातून काँग्रेसची विद्वेषी खेळीच दिसून येते. ‘मतैक्‍या’पेक्षा झालेले ‘मतभेद’ हा काँग्रेसचा आंबेडकरांना डावलण्‍यामागील इतिहास आहे. काँग्रेसने आतापर्यंत केलेली असत्‍याची पाठराखण उघड करून द्वेषाच्‍या पायावर उभ्‍या असलेल्‍या काँग्रेसला भारतातून कायमचे हद्दपार करायला हवे !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विचारांना विरोध करणारी काँग्रेस मतांसाठी मात्र राज्‍यघटना वाचवण्‍याची भाषा करते, हा काँग्रेसचा दुतोंडीपणाच होय !