प्रस्तावित नागपूर-गोवा ‘शक्तीपीठ’ महामार्गामुळे होणार शक्य

कोल्हापूर ते सिंधुदुर्ग प्रवास १ घंट्यात होणार !

सिंधुदुर्ग – नागपूर (महाराष्ट्र) ते गोवा राज्य यांना जोडणारा ‘शक्तीपीठ’ महामार्ग प्रस्तावित आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर येथून कोकणात आंबोली घाटमार्गे येण्यासाठी लागणारा सध्याचा ४ घंट्यांचा अवधी १ घंट्यावर येणार आहे. या महामार्गावर आंबोली घाटाच्या जवळ खोदण्यात येणार्‍या २१.९ कि.मी.च्या बोगद्यामुळे हे शक्य होणार आहे.

‘शक्तीपीठ’ महामार्ग हा महायुती सरकारचा सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे. नागपूर-मुंबई ‘समृद्धी महामार्गा’च्या धर्तीवर ‘शक्तीपीठ’ महामार्ग बांधण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २०२३ मध्ये केली होती. ८०२ कि.मी. लांबीचा हा महामार्ग असणार आहे. राज्यातील कोल्हापूरची श्री अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी या ३ शक्तीपीठांसह अनेक धार्मिक क्षेत्रांना हा महामार्ग जोडणार असल्याने या महामार्गाला ‘शक्तीपीठ’ महामार्ग, असे नाव देण्यात आले आहे.  सध्या नागपूर येथून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने १८ घंटे लागतात; मात्र ‘शक्तीपीठ’ महामार्गामुळे ही वेळ ८ घंट्यांवर येणार आहे. हा ६ पदरी ‘शक्तीपीठ’ महामार्ग महाराष्ट्रातील वर्धा, नांदेड, परभणी,  धाराशिव, यवतमाळ, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांना जोडणार आहे.