प्रत्येकाने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

चिंचवड (पुणे) येथे ‘मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्या’चा शुभारंभ !

चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी यांचे मंदिर

चिंचवड (जिल्हा पुणे) : चिंचवड हे स्थान पवित्र आणि जागृत आहे. येथे मोरया गोसावी महाराजांना साक्षात्कार झाला. मोरया गोसावी महाराजांच्या भूमीत ऊर्जा मिळते, अशा भावना प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी १७ डिसेंबर या दिवशी चिंचवड येथे व्यक्त केल्या. ‘माझ्या मोरयाचा धर्म जगभर जागो. मंगलमूर्तींचे आशीर्वाद सर्व जगाला लाभोत’, अशी प्रार्थना करत, ‘प्रत्येकाने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे’, असे आवाहनही त्यांनी केले.

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६३ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. मूर्तीकार तन्मय पेंडसे यांनी सिद्ध केलेली मोरया गोसावी यांची मूर्ती, पुणेरी पगडी, शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन प.पू. सरसंघचालकांचा सत्कार करण्यात आला.

संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

या वेळी चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्‍वस्त मंदार देव महाराज, आळंदीच्या ‘संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान समिती’चे प्रमुख विश्‍वस्त अधिवक्ता राजेंद्र उमाप, महापालिका आयुक्त शेखर सिंह, चिंचवड देवस्थानचे विश्‍वस्त जितेंद्र देव आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमात ‘चिंचवड देवस्थान ट्रस्ट’च्या २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

चिंचवडमध्ये देवस्थान कॉरिडॉर ! – आयुक्त शेखर सिंह

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आळंदी, देहू आणि ‘मोरया गोसावी देवस्थाना’चा कॉरिडॉर (सुसज्ज मार्ग) विकसित व्हायला हवा, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले की, केंद्राच्या प्रसाद योजनेच्या अंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून मुख्य देवस्थानांचा कॉरिडॉर विकास व्हायला हवा. नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य चालू असून ‘पवना नदी सुधार प्रकल्प’ही पूर्ण होईल.