सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्या सोलापूर येथील कु. संध्या कुरापाटी !
१. साधना करण्याच्या निर्णयात कृष्णाने केलेले साहाय्य
१ अ. घरी साधनेला विरोध असणे आणि त्यामुळे काही वेळा ताण येणे : ‘आमच्या घरी माझ्या साधनेला विरोध आहे. ‘मी साधना करते’, हे माझ्या कुटुंबियांना आवडत नाही; म्हणून काही वेळा मला ताण येत असे. काय करावे, ते मला कळत नव्हते.
१ आ. ‘साधनेपासून दूर राहिल्यास साधिकेचा ताण न्यून होऊन कुटुंबियांच्या मनाप्रमाणे होईल’, असे श्रीकृष्णाला सांगणे : मी नेहमी श्रीकृष्णाला आत्मनिवेदन करते. त्या वेळी मी कृष्णाला सांगितले, ‘मी साधना करते; म्हणून घरात सर्वांना त्रास होतो. मी साधनेपासून दूरच रहाते. त्यामुळे माझ्या मनावरील ताण न्यून होऊन कुटुंबियांच्या मनाप्रमाणे होईल.’
१ इ. श्रीकृष्णाने ‘तू साधनेपासून दूर जाणार; म्हणजे गुरुदेवांपासून दूर जाणार’, असे सांगितल्यावर त्वरित साधना करण्याचा निर्णय घेणे : श्रीकृष्ण मला म्हणाला, ‘तुझ्याकडे जे काही आहे, ते केवळ प.पू. गुरुदेवांमुळेच आहे. त्यांनी तुला किती भरभरून दिले आहे. तू साधनेपासून दूर जाणार; म्हणजे गुरुदेवांपासून दूर जाणार. तू शांतपणे विचार कर आणि मग काय करायचे ते ठरव.’ मी त्वरित साधना करण्याचा निर्णय घेतला.’
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पहाताक्षणी ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ हा नामजप चालू होऊन सत्संग संपेपर्यंत नामजप चालू रहाणे
‘एक दिवस मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्यांना पहाताक्षणी माझ्या मनामध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ हा नामजप चालू झाला. तो नामजप सत्संग संपेपर्यंत चालू होता.
३. प.पू. गुरुदेव पूर्ण गुलाबी रंगाचे दिसणे आणि साधिकेचेही तळहात पिवळ्या अन् गुलाबी रंगाचे होऊन तळहातांना अष्टगंधाचा सुगंध येणे
सत्संगात मला प.पू. गुरुदेव पूर्ण गुलाबी रंगाचे दिसत होते. माझे दोन्ही तळहात पिवळ्या आणि गुलाबी रंगाचे झाले. माझ्या तळहातांना अष्टगंधाचा सुगंध येत होता. मी सतत प्रार्थना करत होते. मला सत्संगात पुष्कळ आनंद मिळाला.’
– कु. संध्या कुरापाटी, सोलापूर (वय १९ वर्षे), (८.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |