साधिकेने जीवनाचे सार्थक करण्याच्या प्रक्रियेत अनुभवलेले भक्तीसत्संगांचे अमूल्य योगदान ! 

‘वर्ष २०२४ च्या नवरात्रीत ७.१०.२०२४ या दिवशी भक्तीसत्संगांच्या शृंखलेला ८ वर्षे पूर्ण झाली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने ८ वर्षांपूर्वी चालू झालेल्या भाववृद्धी सत्संगाला नंतर भक्तीसत्संगाचे रूप आले. या सत्संगांमुळे मला झालेले लाभ आणि माझ्यामध्ये झालेले मला जाणवणारे पालट येथे दिले आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. पहिल्या भाववृद्धी सत्संगाच्या वेळी अनुभवलेले वातावरण

८ वर्षांपूर्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पहिला भाववृद्धी सत्संग झाला. मी त्या सत्संगाला उपस्थित होते. सत्संग आश्रमाच्या सभागृहात होता.

१ अ. त्या दिवशी सत्संगातील वातावरण अत्यंत भावमय होते.

१ आ. मी सत्संगस्थळी प्रवेश करताच समोरच ठेवलेल्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) मोठ्या छायाचित्राकडे माझे लक्ष वेधले गेले. ‘त्या छायाचित्रातून गुरुदेवांमधील चैतन्याची स्पंदने मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होऊन संपूर्ण सभागृहात पसरली आहेत’, असे मला जाणवले.

१ इ. त्या सत्संगाला आरंभ होण्यापूर्वीच माझे अष्टसात्त्विक भाव जागृत झाले.

१ ई. हा सत्संग संपेपर्यंत संपूर्ण २ घंटे माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वहात होते.

२. ‘स्वतःच्या जीवनाचे सार्थक स्वतःमधील ‘स्वभावदोष आणि अहं’ यांमुळे करू शकणार नाही’, याची भक्तीसत्संगांमुळे जाणीव होणे

माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी बुद्धीच्या स्तरावर प्रयत्न होत असत. त्यामुळे मला माझ्यामधील ‘स्वभावदोष आणि अहंचे पैलू’ यांच्यावर प्रत्येक वेळी बुद्धीने मात करणे शक्य होत नसे. साहजिकच माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न वरवरचे होत आणि त्यांत सातत्यही रहात नसे. भक्तीसत्संगात सांगितलेल्या सूत्रांतून ‘मी माझ्या जीवनाचे सार्थक माझ्यामधील ‘स्वभावदोष आणि अहं’ यांमुळे करू शकणार नाही’, याची मला जाणीव झाली. स्वतःच्या स्थितीचे अवलोकन करतांना ‘मला पुष्कळ लांबचा पल्ला गाठायचा आहे’, हे माझ्या लक्षात आले, तरीही काही वर्षे माझ्याकडून अपेक्षित असे प्रयत्न होत नव्हते.

३. भक्तीसत्संगांमुळे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया भावाच्या स्तरावर करण्याचा प्रयत्न होणे आणि स्वतःमधील स्वभावदोष उफाळून येण्याचे प्रमाण उणावणे

आधी मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया वेगळी राबवत असे अन् भावाचे प्रयत्न वेगळे करत असे. त्यामुळे माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांना गती येत नव्हती. माझ्याकडून काही काळ प्रयत्न होत असत आणि नंतर माझ्यामधील स्वभावदोष अन् अहं उफाळून येत. भक्तीसत्संगांत सांगितलेल्या सूत्रांतून ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया भावाच्या स्तरावर कशी करायची ?’, ते मला शिकायला मिळाले. त्यामुळे माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया भावाच्या स्तरावर होऊ लागली. त्यामुळे माझ्यामधील स्वभावदोष उफाळून येण्याचे प्रमाण उणावत असल्याचे जाणवते.

४. भक्तीसत्संगांमुळे भावजागृतीच्या प्रयत्नांमध्ये वाढ होणे आणि त्याचे झालेले लाभ

श्रीमती अलका वाघमारे

४ अ. भावस्थितीत रहाण्याचे महत्त्व लक्षात येणे आणि तसे प्रयत्न केल्यावर भावस्थितीत रहाण्यातील आनंद अनुभवणे : भक्तीसत्संगांमुळे भावस्थितीत रहाण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले. ‘माझी भावस्थिती ढळू नये’, असे मला वाटू लागले. त्यासाठी मी भक्तीसत्संगांत सांगितलेल्या कथांचे स्मरण करणे, कथांमधील बोधामृत कृतीत आणण्याचा प्रयत्न करणे, गुरुस्मरण करणे, प्रार्थना आणि कृतज्ञता वारंवार करणे, प्रतिदिन आत्मनिवेदन करणे, क्षमायाचना करणे, येता-जाता देवाशी बोलणे, त्याला अनुभवण्याचा प्रयत्न करणे इत्यादी प्रयत्न करू लागले. अशा प्रकारे मी भावजागृतीच्या प्रयत्नांमध्ये जाणीवपूर्वक वाढ केली आणि तेव्हापासून मी भावस्थितीत रहाण्यातील आनंद अनुभवत आहे.

४  आ. भावस्थितीत राहिल्याने स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निवारण होण्यास साहाय्य होणे : ‘मी भावस्थितीत रहाण्याचा अवधी वाढावा’, यासाठी प्रयत्न केल्यानंतर मला जाणीव झाली की, ‘भावस्थितीत राहिल्याने माझ्यामधील स्वभावदोष आणि अहं यांचे निवारण होण्यासही साहाय्य होत आहे.’

४ इ. भक्तीसत्संगांतील भावजागृतीच्या प्रयोगांमुळे भगवंताला अनुभवण्याचे प्रयत्न होणे : प्रत्येक भक्तीसत्संगातील भावजागृतीचा प्रयोग मी तळमळीने करू लागले. माझे भावजागृतीच्या प्रयोगाच्या माध्यमातून भगवंताला अनुभवण्याचे प्रयत्न होऊ लागले. त्यामुळे मला भगवंताचे अस्तित्व सूक्ष्मातून अधिक प्रमाणात जाणवू लागले. नंतर ‘भक्तीसत्संग संपला, तरीही तो अनुभवत रहावा, भावावस्थेतच रहावे’, असे मला वाटू लागले आणि अजूनही वाटत आहे.

४ ई. जीवनातल्या कठीण प्रसंगांमध्ये स्थिर राहू शकणे : ‘भक्तीसत्संगात सांगितलेल्या कथांचे स्मरण करणे आणि कथांमधील बोधामृत कृतीत आणण्याचा प्रयत्न करणे’, यांमुळे प्रत्येक प्रसंगात सकारात्मक अन् शरणागत कसे रहायचे ? कृतज्ञता कशी आणि किती वाटायला हवी ?’, हे मला शिकायला मिळाले. भगवंत माझ्याकडून तसे प्रयत्न करून घेऊ लागला. ‘माझ्यात भगवंताप्रती श्रद्धा वृद्धींगत होत आहे’, असे मला जाणवते. त्याच्याच कृपेने मी जीवनातल्या कठीण प्रसंगांतही स्थिर राहू शकत आहे.

४ उ. गुणसंवर्धनासाठी प्रयत्न होणे : मला स्वतःकडून आणि इतरांकडून होत असलेल्या अपेक्षांचे प्रमाण न्यून होऊ लागले आहे. भगवंत माझ्याकडून गुणसंवर्धनासाठी प्रयत्न करून घेत असल्याने माझ्यामधील ‘स्वीकारण्याची वृत्ती, सकारात्मकता, अंतर्मुखता, शरणागती आणि कृतज्ञताभाव’ यांत वृद्धी झाली आहे’, असे मला जाणवते.

४ ऊ. गुरुदेव आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या कृपाशीर्वादाने मला अधिकाधिक वेळ भावस्थितीत रहाता येणे : सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या कृपाशीर्वादाने मला भक्तीसत्संगांशी संबंधित सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मला सप्ताहातील अधिकाधिक वेळ भावस्थितीत रहाता येत आहे.

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘भक्तीसत्संगांमुळे मला झालेले लाभ ही केवळ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची कृपा आहे’, त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.

‘भक्तीसत्संगांच्या माध्यमातून माझी भगवंतावरील श्रद्धा अधिकाधिक दृढ होवो’, अशी मी गुरुचरणी प्रार्थना करते.’

– श्रीमती अलका वाघमारे (वय ६६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१०.२०२४)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.