गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये योगदान देणारे स्वातंत्र्यसैनिक
आज १९ डिसेंबर ‘गोवा मुक्तीदिन’!
त्या निमित्ताने…
गोवा हे पश्चिम भारतातील एक छोट्या किनारपट्टीवरील राज्यात ४५० वर्षांहून अधिक काळ पोर्तुगीजांची वसाहत होती. १९ व्या शतकाच्या मध्यापासून वर्ष १९६१ पर्यंत चाललेला गोव्याचा स्वातंत्र्यलढा हा राज्याच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या अनेक गोवावासियांच्या शौर्याचा आणि बलीदानाचा पुरावा होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या गतीशील नेतृत्वाखाली गोवा सरकारने प्रथमच या स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या योगदानाचे प्रतीक म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते १८ डिसेंबर २०२४ या दिवशी १५ हुतात्म्यांच्या पहिल्या पिढीपर्यंतच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात इतर अनेक स्वातंत्र्यसैनिकांसह महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्या १५ हुतात्म्यांचे योगदान, त्यांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये दाखवलेले शौर्य, त्याग आणि समर्पण हे गोव्यातील पिढ्यांसाठी प्रेरणा देणारे आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या या योगदानाविषयी आपण या लेखातून जाणून घेऊया.
१. बाळा राया मापारी
८ जानेवारी १९२९ या दिवशी बार्देश तालुक्यातील अस्नोडा येथे यांचा जन्म झाला. त्यांनी अस्नोडा येथील पोर्तुगीज पोलीस चौकीवर धाडी टाकण्यात प्रमुख भूमिका बजावली. पोलिसांची शक्ती अधिक होती आणि त्यांची सर्व शस्त्रे, दारूगोळा राष्ट्रवाद्यांनी कह्यात घेतला. फेब्रुवारी १९५५ मध्ये पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना अटक केली आणि क्रूर शारीरिक अत्याचार केले. मापारी यांनी त्यांच्या सहकार्यांविषयी कोणतीही माहिती उघड करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना निर्दयीपणे मारहाण करून त्यांचा छळ केला.
१८ फेब्रुवारी १९५५ या दिवशी पोलीस कोठडीत असतांना त्यांचे निधन झाले. ते गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील पहिले हुतात्मा होते.
२. कर्नल सिंग बेनिपाल
यांचा जन्म ८ जून १९३४ या दिवशी पश्चिम पाकिस्तानातील समुंद्री येथे झाला. ते विद्यार्थी नेते होते आणि राज्यातील माध्यमिक शिक्षकांच्या मागण्यांवर दबाव आणल्याविषयी त्यांनी शिक्षकांच्या संपाचे नेतृत्वही केले. ‘जी.व्ही.एस्.एस्.’( गोवा विमोचन साहाय्य समिती)च्या आवाहनानुसार गोव्यात सत्याग्रह करण्यासाठी स्वयंसेवकांची नोंदणी करण्यासाठी त्यांनी संपूर्ण पंजाबचा दौरा केला. १५ ऑगस्ट १९५५ या दिवशी बांदा येथे भारत-गोवा सीमेवरील मोर्चात सहभागी होऊन त्यांनी सत्याग्रह केला. पोर्तुगीज सैनिकांनी निःशस्त्र सत्याग्रहींवर मशीन गनने गोळीबार केला, तेव्हाचे नेते कॉ. चितळे यांना लक्ष्य करण्यासाठी चालवलेल्या गोळ्यांपासून त्यांना वाचवण्यासाठी पाठीमागून धावत ते चितळे यांच्यासमोर आले आणि स्वतः हुतात्मा झाले. १५ ऑगस्ट १९८० या दिवशी गोवा, दमण आणि दीव येथील स्वातंत्र्यसैनिक संघटनेने त्यांना मरणोत्तर सन्मानित केले.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी २७ सप्टेंबर २०२२ या दिवशी पंजाबमधील लुधियाना येथील हुतात्मा कर्नल सिंग बेनिपाल यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या वेळी डॉ. सावंत यांनी त्यांची पत्नी श्रीमती चरणजीत कौर यांना आर्थिक साहाय्य म्हणून १० लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला.
३. बसवराज हुडगी
यांचा जन्म वर्ष १९१८ मध्ये बिदर जिल्ह्यातील (कर्नाटक) वागडल या गावी झाला. ते एक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते होते. त्यांनी हैद्राबाद (भाग्यनगर) राज्य भारतीय संघराज्यात विलीन करण्याच्या मागणीसाठी झालेल्या लोकप्रिय चळवळीत सक्रीय भाग घेतला. त्या वेळी हैद्राबादच्या निजामावर बाँब फेकण्याविषयी कट रचल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. गोव्याच्या मुक्तीसाठीच्या वर्ष १९५५ च्या सत्याग्रह चळवळीत त्यांनी भाग घेतला आणि १५ ऑगस्ट १९५५ या दिवशी दूधसागर बोगद्यात सत्याग्रहींवर पोर्तुगीज पोलिसांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ते गंभीररीत्या घायाळ झाले. त्यांना रायबंदर रुग्णालयात नेण्यात आले आणि तिथेच त्यांचे १ महिन्यानंतर निधन झाले.
४. शेषनाथ वाडेकर
यांचा जन्म वर्ष १९१५ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक येथे झाला. ऑगस्ट १९५५ च्या पहिल्या आठवड्यात ‘जी.व्ही.एस्.एस्.’च्या आवाहनानुसार ते राजस्थानच्या पन्नालाल यादव यांच्यासह रत्नागिरीच्या शिरोडा येथील सत्याग्रहींच्या एका तुकडीसह सत्याग्रह चळवळीत सामील झाले. या सत्याग्रहींनी गोव्यातील पेडणे येथील पाली गावात प्रवेश केला आणि गावातील मंदिरासमोर देशभक्तीपर घोषणा देण्यास प्रारंभ केला. तिथे लोक जमले. पोर्तुगीज पोलिसांना ही बातमी समजताच ते तिथे पोचले आणि त्यांनी सत्याग्रहींना मारहाण करण्यास प्रारंभ केला. शेषनाथ वाडेकर आणि पन्नालाल यादव यांना तिरंगा (भारतीय ध्वज) खाली फेकून भारतीय सीमेवर परत जाण्यास सांगण्यात आले. त्यांनी नकार दिला आणि ते तिरंगा उंचावून देशभक्तीपर घोषणा देत राहिले. ३ ऑगस्ट १९५५ या दिवशी शेषनाथ वाडेकर आणि पन्नालाल यादव यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोर्तुगीज अधिकार्यांनी तेरेखोल किल्ल्याजवळ त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
५. तुळशीराम बाळकृष्ण हिरवे
यांचा जन्म महाराष्ट्रातील कुलाबा जिल्ह्यातील गोरभट, चिंचोळी येथे झाला. ते कुलाबा येथील सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सहभागी असत अन् त्या भागातील लोक त्यांचा आदर करत. ‘जी.व्ही.एस्.एस्.’च्या आवाहनावरून ते गोव्याच्या मुक्ती चळवळीत सक्रीयपणे सहभागी झाले.
१५ ऑगस्ट १९५५ या दिवशी त्यांनी १२७ सत्याग्रहींच्या तुकडीचे नेतृत्व केले आणि शिरोडा-रेडी मार्गे गोव्यात प्रवेश केला. त्यांनी तेरखोल किल्ल्यावर तिरंगा फडकावून राष्ट्रवादी घोषणा देत सत्याग्रह केला. पोर्तुगीज सैनिकांनी त्यांना माघारी जाण्याचे आदेश दिले. ते पुढे सरकत असतांना पोर्तुगिजांनी त्यांच्याकडून तिरंगा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांनी विरोध केल्याने त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्याच दिवशी ते हुतात्मा झाले. १८ जून १९८४ या दिवशी गोवा, दमण आणि दीव सरकारने त्यांना मरणोत्तर सन्मानित केले.
६. बाबुराव केशव थोरात
यांचा जन्म महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात झाला. ऑगस्ट १९५५ मध्ये ‘जी.व्ही.एस्.एस्.’च्या आवाहनावरून ते गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. त्यांनी सत्याग्रहींच्या गटाचे नेतृत्व केले आणि सातार्डामार्गे गोव्यात प्रवेश केला. ३ ऑगस्ट १९५५ या दिवशी ते पेडणे तालुक्यातील नयबाग येथे पोचल्यानंतर पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना परत जाण्याचे आदेश दिले. त्यांनी नकार दिल्यावर त्यांना इतकी मारहाण करण्यात आली की, त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.
७. सखाराम यशवंत शिरोडकर
हे गोव्यातील एकोशी गावातील होते. त्यांच्या घराचा वापर शस्त्रे आणि दारूगोळा साठवण्यासाठी केला जात असे. ते बंदुकांची दुरुस्ती करत असत. १३ ऑगस्ट १९५५ या दिवशी त्यांना कृष्णा शांबा शेट यांच्यासह अटक करण्यात आली. १४ ऑगस्ट १९५५ या दिवशी मांडवी नदीच्या किनार्यावर त्यांची गोळ्या घालून हत्या केल्याने ते हुतात्मा झाले.
८. रोहिदास पी. मापारी
यांचा जन्म १२ डिसेंबर १९२४ या दिवशी बार्देश तालुक्यातील अस्नोडा गावात झाला. ते ‘ए.जी.डी.’(आझाद गोमंतक दल)चे सदस्य होते आणि त्यांनी प्रभाकर सिनारी यांच्या नेतृत्वाखाली अस्नोडा येथील पोलीस चौकीवर केलेल्या धाडसी आक्रमणात प्रमुख भूमिका बजावली. तिथे पोलिसांवर मात करून त्यांची शस्त्रे आणि दारूगोळा कह्यात घेतला. नंतर पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना शिवोली येथे अटक केली आणि १८ महिने नजरकैदेत ठेवले. पोलिसांकडून वारंवार होणार्या शारीरिक छळामुळे २८ सप्टेंबर १९५६ या दिवशी आग्वाद तुरुंगात त्यांचे निधन झाले. केंद्र सरकारने त्यांना ‘मरणोत्तर ताम्रपत्र’ प्रदान केले आणि १८ जून १९८६ या दिवशी गोवा, दमण आणि दीव सरकारने त्यांना मरणोत्तर सन्मानित केले.
९. यशवंत सुखा आगरवाडेकर
यांचा जन्म १५ जानेवारी १९१८ या दिवशी बार्देश तालुक्यातील ओशेल, शिवोली येथे झाला. वर्ष १९५४ पासून ते ‘ए.जी.डी.’चे सदस्य होते आणि त्यांनी प्रभाकर सिनारी यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीज पोलीस अन् लष्कर यांच्या स्थानांवर केलेल्या अनेक सशस्त्र आक्रमणांमध्ये सक्रीय सहभाग घेतला. त्यांना पकडून देणार्याला
५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले. १७ डिसेंबर १९५८ या दिवशी पर्रा येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांशी झालेल्या चकमकीत ते हुतात्मा झाले.
१०. रामचंद्र नेवगी
यांचा जन्म वर्ष १९१० मध्ये डिचोली येथे झाला. ते ‘एन्.सी.जी.’चे सदस्य होते आणि त्यांनी पत्रके चिकटवणे, ती वितरित करणे यांसारख्या उपक्रमांमध्ये भाग घेतला. २० मे १९५६ या दिवशी त्यांच्या घरावर छापा टाकला गेला, ज्यामध्ये हस्तपत्रिका जप्त करण्यात आल्या आणि त्यांच्या दोन मुलांसह त्यांना अटक करण्यात आली. त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आणि त्यांची १४ सप्टेंबर १९५६ या दिवशी सुटका करण्यात आली. १० मार्च १९५७ या दिवशी रात्री, अस्नोडा चौकीवरील पोर्तुगीज पोलिसांनी ते जात असलेल्या टॅक्सीला संशयामुळे थांबवण्याचा प्रयत्न केला. टॅक्सी थांबली नाही; म्हणून पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि रामचंद्र नेवगी यांचा जागीच मृत्यू झाला.
११. बापू विष्णु गावस
यांचा जन्म वर्ष १९२७ मध्ये पेडणे तालुक्यातील चांदेल येथे झाला. त्यांनी सरकारी सेवेचे त्यागपत्र दिले आणि वर्ष १९५४ मध्ये ते ‘ए.जी.डी.’मध्ये रुजू झाले. २६ नोव्हेंबर १९५५ या दिवशी त्यांनी चांदेल पोलीस ठाण्यावरील आक्रमणात भाग घेतला. त्यांनी बाळा देसाईंसह हळ्ळी, पेडणे येथे पोलिसांच्या जीपवर आक्रमण केले. या आक्रमणामध्ये अनेक पोर्तुगीज सैनिक ठार झाले आणि कुख्यात पोर्तुगीज दलाल कास्मिरो मोंतेरो गंभीररीत्या घायाळ झाला. या चकमकीत बापू गावस गंभीररीत्या घायाळ झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह पोलिसांनी निर्घृणपणे एक मैल फरफटत नेला आणि नंतर जाळला. गोवा, दमण आणि दीव सरकारने १८ जून १९८३ या दिवशी त्यांना मरणोत्तर सन्मानित केले.
१२. बाबला धोंडो परब
यांचा जन्म पेडणे तालुक्यातील मोपा येथे झाला. ते ‘एन्.सी.जी.’(नॅशनल काँग्रेस गोवा)चे सदस्य होते. त्यांनी सीमावर्ती भागातून राष्ट्रवादी पत्रके आणून गोव्यात वितरित करण्यासह संदेश देण्याचे काम केले. एकदा त्यांना रंगेहात पकडून ३ महिने पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. त्यांनी अनेक सत्याग्रहींना गोव्यात प्रवेश करण्यास साहाय्य केले आणि वर्ष १९५५ च्या सत्याग्रह चळवळीच्या कालावधीत गोव्यातील वास्तविक परिस्थितीची माहिती सीमावर्ती भागातील ‘एन्.सी.जी.’ नेत्यांना दिली. त्यांना सप्टेंबर १९५६ मध्ये गोव्यात प्रवेश करतांना अटक करण्यात आली आणि पोलीस कोठडीत यातना देऊन ठार मारण्यात आले. १८ जून १९८६ या दिवशी गोवा, दमण आणि दीव सरकारने त्यांचा मरणोत्तर सन्मान केला.
१३. लक्ष्मण नारायण वेलिंगकर
यांचा जन्म २४ डिसेंबर १९२२ या दिवशी फोंडा तालुक्यातील वेलिंग गावात झाला. ते वर्ष १९४८ पासून ‘एन्.सी.जी.’शी संबंधित होते आणि डॉ. लोहिया यांच्यापासून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी राष्ट्रवादी कार्यात सक्रीयपणे भाग घेतला आणि जानेवारी १९५५ मध्ये त्यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. भूमीगत राष्ट्रवादी क्रांतीकारकांची माहिती त्यांच्याकडून मिळवण्यासाठी त्यांना निर्दयीपणे मारहाण करून त्यांचा छळ करण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या नातेवाइकांकडे सोपवण्यात आला नव्हता. १८ जून १९८६ या दिवशी गोवा, दमण आणि दीव सरकारने त्यांना मरणोत्तर सन्मानित केले.
१४. केशवभाई सदाशिव टेंगसे
यांचा जन्म वर्ष १९२६ मध्ये काणकोण येथे झाला. ते पैंगीण येथील एका मंदिरात पुजारी म्हणून काम करत होते. त्यांनी भूमीगत कार्यकर्त्यांना आश्रय दिला, तसेच काही वेळा क्रांतीकारकांना सुरक्षित ठिकाणी शस्त्रे आणि स्फोटके लपवून ठेवण्यासही साहाय्य केले. ते ‘ए.जी.डी.’मध्ये सामील झाले. वर्ष १९५० च्या मध्यात जेरोनिमो बार्रेटो या नगर हवेली येथील पोलिसाला स्वातंत्र्यानंतर तेथून हद्दपार करण्यात आले होते. हा पोलीस राष्ट्रवादी आणि स्वातंत्र्य चळवळीविषयी सहानुभूती असलेल्यांना त्रास देऊन नगर हवेलीच्या मुक्तीचा सूड घेत असे. सप्टेंबर १९५६ च्या सुमारास त्याने श्रीराममंदिराच्या गर्भगृहात बळजोरीने प्रवेश केला आणि मंदिराचे पुजारी परशुराम आचार्य यांना अटक केली. त्याच्या असभ्य वर्तनामुळे त्या परिसरातील भूमीगत कार्यकर्त्यांनी १७ सप्टेंबर १९५६ या दिवशी रो अर्धफोंड येथील त्याच्या घरावर धाड टाकली आणि त्याला गोळ्या घालून ठार केले. दुसर्या दिवशी संशयावरून टेंगसे यांना अटक करण्यात आली. त्यांना आणि परशुराम आचार्य यांना इतक्या निर्घृणपणे मारहाण करण्यात आली की, दोन दिवसांत, म्हणजेच २० सप्टेंबर १९५६ या दिवशी तुरुंगातच त्यांना मृत्यू आला. १८ जून १९८६ या दिवशी गोवा, दमण आणि दीव सरकारने त्यांना मरणोत्तर सन्मान केला.
१५. परशुराम श्रीनिवास आचार्य
यांचा जन्म वर्ष १९१६ मध्ये काणकोण तालुक्यातील पैंगीण येथे झाला. ते स्वातंत्र्यलढ्यात सक्रीयपणे सहभागी नसले, तरी गोव्याच्या मुक्तीसाठी त्यांनी सहानुभूती दर्शवली आणि पर्तगाळ पैंगीण येथील गोकर्ण मठात प्रमुख पुजारी म्हणून असतांना स्वतःला शक्य त्या पद्धतीने साहाय्य केले. राष्ट्रवाद्यांप्रती केलेल्या क्रूरतेविषयी ‘ए.जी.डी.’च्या कार्यकर्त्यांनी जेरोनिमो बार्रेटो याची हत्या केल्याप्रकरणी त्यांना १८ सप्टेंबर १९५६ या दिवशी अटक करण्यात आली. त्यांना बार्रेटो याच्या हत्येसाठी उत्तरदायी ठरवण्यात आले. त्यांची सुटका करण्यासाठी मठाच्या प्रमुख शिष्यांनी हस्तक्षेप केल्यानंतरही मडगाव पोलीस ठाण्यात त्यांचा छळ करण्यात आला. पोलीस ठाण्यात केलेल्या क्रूर अत्याचारांमुळे २० सप्टेंबर १९५६ या दिवशी त्यांचे निधन झाले. १८ जून १९८३ या दिवशी गोवा, दमण आणि दीव सरकारने त्यांना मरणोत्तर सन्मानित केले.